कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता विभागाद्वारे “राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे” आयोजन
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
राज्यातील कोविड संसर्गाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून राज्यात लॉकडाऊन करणे अनिवार्य झाले होते. त्याचा विपरीत परिणाम उद्योग / व्यवसाय यांच्यावर झाला होता. परंतू, आता राज्यातील उद्योग / व्यवसाय पूर्ववत कार्यरत होत आहेत किंबहुना काही उद्योग पुन्हा सुरु झालेही आहेत. त्यामुळे रोजगाराच्या पुन:श्च विविध संधी तसेच, विशेषत: कोविडच्या अनुषंगाने विविध क्षेत्रात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत.
या बाबींचा सर्वंकष विचार करुन अल्पसंख्यांक विकास व वक्फ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या निर्देशांनुसार राज्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रात या नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने, दि.12 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत भव्य “राज्यस्तरीय महारोजगार” मेळाव्याचे आयोजन, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
त्यानुषंगाने www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रोजगार मेळाव्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विविध नामांकित उद्योग / व्यवसाय या मेळाव्यामध्ये सहभागी होत आहेत. एलजी इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि., हायर ॲप्लायन्सेस, महिंद्रा सीआय ई ऑटोमोटीव्ह लि., फियाट इंडिया प्रा. लि., आरएसबी ट्रान्समिशन इं. प्रा. लि., ग्रॅव्हिटी कन्स्ल्टंटस प्रा. लि., इ. सारख्या नामांकित कंपन्यांसह महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमधील कंपन्या या मेळाव्यात वेगवेगळ्या प्रकारची रिक्त पदे नोंदवीत आहेत व अजूनही काही चांगल्या आस्थापना यामध्ये सहभाग नोंदविणार आहेत.
सर्वसाधारणपणे इयत्ता 9 वी पास पासून पुढे किंवा 10 वी व 12 वी, आय.टी.आय., डिप्लोमा तसेच बी.ई. व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या रिक्त पदांसह सहभागी होण्यासाठी या आयुक्तालयाच्या वतीने आवाहन करण्यात आले असून, विविध क्षेत्रातील साधारणत: किमान 25 हजार रिक्त पदे उमेदवारांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, या संधीचा लाभ घेण्यासाठी नोकरीस इच्छुक युवक-युवतींनी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. होम पेजवरील नोकरी साधक (Job Seeker) लॉग इन मधून आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉग इन करावे. त्यानंतर पंडित दीनदयाल उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करुन त्यातील “STATE LEVEL MEGA JOB FAIR 2021” या रोजगार मेळाव्याची निवड करावी. यानंतर उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घेऊन, उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पध्दतीने आपला पसंतीक्रम नोंदवून या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे.
तसेच इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस, दूरध्वनी, ई-मेल किंवा सोईच्या माध्यमाद्वारे यथावकाश कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.
तरी इच्छुक युवक-युवतींनी आपला पसंतीक्रम नोंदवून रोजगाराच्या या सूवर्ण संधीचा निश्चित लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्री.शा.गि. पवार यांनी केले आहे.






















Be First to Comment