Press "Enter" to skip to content

चैत्र पौर्णिमेचा चंद्र असेल “गुलाबी सुपरमून”
खगोलशास्त्राची माहिती

आपल्या खिडकीतून आकाशाकडे बघा : आजचा चंद्र आहे गुलाबी

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

येत्या सोमवार- मंगळवार या रात्रीचा चंद्र असेल “सुपरमून”. या दिवशी चंद्र पृथ्वीपासून सुमारे ३ लाख ५७ हजार ३७८ किलोमीटर अंतरावर येणार आहे. या दिवशीचे चंद्रबिंब नेहमीपेक्षा मोठे म्हणजेच १४ टक्के मोठे व ३० टक्के अधिक तेजस्वी दिसेल अशी खास खगोलियन माहिती मिळाली आहे .

२६-२७ तारखेला संपूर्ण रात्रभर सुपरमून पहायला मिळेल, अशी माहिती ग्लोबल मिशन ॲस्ट्रोनोमी अँड रिसर्च सेंटर पुणे चे अध्यक्ष व खगोलशास्त्रज्ञ विशाल कुंभारे यांनी दिली.

सुपरमून म्हणजे काय ?

चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लाख ८४ हजार किलोमीटर इतक्या अंतरावर असतो. पण, चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने भ्रमण करीत असल्यामुळे कधी पृथ्वीच्या जवळ (perigee) तर कधी दूर (apogee) जातो. ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या सर्वात कमी अंतरावर येतो तेव्हां त्या घटनेला सुपरमून असे म्हंटले जाते. अश्या स्थितीत चंद्र नेहमीपेक्षा आकाराने मोठा व तेजस्वी दिसतो. वर्षातून काहीवेळा अश्या खगोलीय घटना घडत असल्याचे कुंभारे यांनी सांगितले आहे .

पिंक सुपरमून म्हणजे काय ?

पिंक सुपरमून हे फक्त एक नाव आहे, त्यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही. अमेरिका आणि कॅनडामध्ये या हंगामात फ्लॉक्स सुबुलाटा नावाच्या फुलाचा बहर येतो, या फुलामुळे आज दिसणाऱ्या चंद्राला पिंक सुपरमून म्हटले जाते. हे फुल गुलाबी रंगाचे असते. त्यामुळे यादिवशी दिसणाऱ्या सुपरमून ला पिंक सुपरमून म्हटले जाते .

सन १९७९ मध्ये पृथ्वीजवळ आलेल्या पौर्णिमेच्या चंद्राला रिचर्ड नोले यांनी सुपरमून असे नाव दिले.

चंद्र उगवताना क्षितिजापासून थोडा वरती आल्यावर व मावळताना क्षितीजाच्या जवळ चंद्र आकाराने मोठा झालेला दिसतो, त्याला “चंद्राचा आभास” (Moon illussion) असे म्हणतात.

सुपरमून चा समुद्राच्या लाटांवरती होणारा परिणाम

सुपरमून च्या वेळी चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर कमी असते, चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे समुद्रातील पाणी नेहमीपेक्षा थोडे जास्त खेचले जाते, त्यामुळे नेहमीच्या भरतीच्या लाटांपेक्षा यावेळीच्या लाटांची उंची २ इंचांनी अधिक असते.

कसा पाहता येणार सूपरमून ?

सुपरमून पाहण्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणांची आवश्यकता लागत नाही. दुर्बीण अथवा टेलिस्कोप असेल तर उत्तम. आपण आपल्या घराच्या अंगणातून, बाल्कनी किंवा टेरेसवरून देखील पाहू शकतो.

या वर्षी ३ सुपरमून दिसतील, त्यातील पहिला २६-२७ एप्रिल ला, दुसरा २६ मे तर तिसरा आणि या वर्षातील शेवटचा सुपरमून २४ जून ला दिसेल.

खगोलप्रेमींना हे चंद्राचे नयनरम्य दृश्य अनुभवता येईल आणि सामान्य लोकांना हे दृश्य पाहून खगोलशास्त्र शिकावेसे वाटेल. सर्वांनी हा सुपरमून पहावा व खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा असे आवाहन खगोलशास्त्रज्ञ विशाल कुंभारे यांनी करत शेवटी सांगितले आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.