तहसीलदार विजय तळेकर यांनी आदिवासी कुटुंबाला दिली नवसंजीवनी
मौजे हेदूटने तालुका पनवेल येथील कानी बाळ्या पोकला ह्या कुटुंबाला त्यांची 32 गुंठे जागा परत मिळवून दिली
आज त्या आदिवासी कुटुंबाला सदरहू 32 गुंठे जमिनी साठी 45,000/- रुपये दर महा विक्रमी भाडे झाले चालू
सिटी बेल ∆ पनवेल ∆ विठ्ठल ममताबादे ∆
मौजे हेदूटने तालुका पनवेल येथील सर्व्हे नंबर 123/1/ब ह्या आदिवासी कुटुंबाच्या 32 गुंठे जमीन मिळकती वर एका परप्रांतीय व्यक्तीने अवैध्य पद्धतीने कब्जा केला होता. त्या संदर्भात तहसीलदार पनवेल विजय तळेकर यांच्या कोर्टात दाद मागितली होती. सदरहू प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आवश्यक त्या चौकशी आणि सुनावण्या घेवून, फक्त तीन महिन्यात ती जमीन आदिवासी कुटुंबाला परत मिळवून दिली आणि तसे आदेश निर्गमित केले.
जी जमीन मालकीची असून ही त्यातून 1 रुपया चे उत्पन्न न मिळणाऱ्या पोकला कुटुंबीयांना दिनांक 10/04/2023 रोजी दर महा 45,000/- रुपये भाडे मिळणार आहे. ह्या पैश्यामुळे आदिवासी कुटुंबाची आर्थिक अडचण कायम स्वरुपी मिटणार आहे. तसेच त्या जमिनी संदर्भातील इतर विषय देखील मार्गी लागणार आहेत. हे सर्व प्रकरण आणि झालेल्या अन्याया विषयी अनंता बाळ्या पोकला याने त्यांचे चिरनेर आश्रम शाळेचे शिक्षक श्री डोईफोडे सरांना सांगितले. डोईफोडे सरांनी त्यांना मार्गदर्शन केले की तुम्ही उरण सामाजिक संस्थेची मदत घ्या आणि त्याकरिता प्रा राजेंद्र मढवी सरांना भेटा. उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, चिटणीस संतोष पवार, नामदेव ठाकूर, दत्ता गोंधळी, सुनील जोशी, मनीष कातकरी यांनी सदर प्रकरणात मार्गदर्शन केले. आणि प्रत्येक वेळेस कोर्टात बाजू देखील मांडली. प्रा राजेंद्र मढवी यांनी सदर मिळणारे भाडे हे मुलांच्या शिक्षणासाठी वापरावे आणि कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये अशी सूचना त्या आदिवासी कुटुंबास केली आहे.पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी हे प्रकरण अतिशय संवेदनशील पणे हताळल्यामुळेच हे शक्य झाल्याचे प्रा राजेंद्र मढवी यांनी सांगितले.
आदिवासी समाजातील लोकांसाठी हे एक चांगले उदाहरण असून जर एखाद्या आदिवासी व्यक्तीची जमीन शासनाची परवानगी न घेता भाडे तत्वावर किंवा खरेदी खत करून हडपली किंवा कब्जा केला असेल तर सदर जमीन त्या आदिवासी खातेदारांना परत मिळू शकते आणि त्या जागेचे दर महा भाडे सुद्धा मिळू शकते. पोकला ह्या आदिवासी कुटुंबीयांनी सर्व आदिवासी समाजातील लोकांना आवाहन केले आहे की अश्या कोणत्याही प्रकारे अन्याय झालेल्या आदिवासी लोकांनी पुढे येवून उरण सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांना भेटावे तसेच आमच्या प्रकरणात एकही रुपया न घेता उलट सर्व खर्च उरण सामाजिक संस्थेने केला.
उरण सामाजिक संस्था ही एक प्रामाणिक संस्था असून ते नक्कीच न्याय मिळवून देतील परंतु आदिवासी लोकांनी शेवट पर्यंत ठाम राहिले पाहिजे. ह्या प्रकरणात पनवेल ग्रामीण पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कोरडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच टाइम्स ऑफ इंडिया चे पत्रकार उमेश परिडा, पत्रकार विठ्ठल ममताबादे आणि इतर सर्व पत्रकारांनी आदिवासी कुटुंबाची बाजू चांगल्या प्रकारे मांडली त्यांचेही आदिवासी कुटुंबाने आभार मानले .
पनवेल चे तहसीलदार विजय तळेकर यांच्या सारखे कर्तव्य दक्ष अधिकारी सर्व तालुक्यांना मिळाले तर गोर गरीब जनतेला नक्कीच न्याय मिळेल आणि न्याय व्यवस्थेवर चा विश्वास दृढ होईल.असा आत्मविश्वास प्रा राजेंद्र मढवी उपाध्यक्ष उरण सामाजिक संस्था यांनी व्यक्त केला.
Be First to Comment