Press "Enter" to skip to content

भव्य महारांगोळी ठरणार रायगड विभागाचे विशेष आकर्षण

खासदार शरद पवार यांच्या ८२ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने रयत तर्फे कृतज्ञता सप्ताहाचे आयोजन

सिटी बेल ∆ कामोठे ∆

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्र पवार यांचा १२ डिसेंबर रोजी ८२ वा जन्मदिवस साजरा करण्यात येणार आहे. दुग्ध शर्करा योग म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सभासदत्व शरद पवार साहेब यांना प्राप्त झाल्याला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष फोफावण्यामध्ये पवार साहेबांचे अनन्यसाधारण योगदान आहे. म्हणूनच रयत शिक्षण संस्थेच्या पाचही विभागांच्या वतीने पवार साहेबांच्या जन्मदिनाच्या औचीत्याने कृतज्ञता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव गणेश ठाकूर यांनी दिली.ते कामोठे येथील रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित पत्रकार परिषदेस संबोधित करत होते.

यावेळी रायगड विभागीय चेअरमन आमदार बाळाराम पाटील, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल मेंबर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जनरल बॉडी सदस्य जे एम म्हात्रे,दिलीप पाटील आदी मान्यवरांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला.

कृतज्ञता सप्ताहाचे विशेष आकर्षण म्हणजे पवार साहेबांच्या विविध भाव मुद्रा दर्शविणारी भव्य महारांगोळी असणार आहे.तब्बल ४० हजार स्क्वेअर फूट आकारमान असणाऱ्या या कलाकृतीकरता सहा हजार किलो वॉटरप्रूफ रांगोळी मागविण्यात आली आहे.कामोठे येथील माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मंगेश खुटारकर, रमेश खुटारकर आणि चेतन भोईर हे सुप्रसिद्ध रंगावली कलाकार ही कलाकृती साकारणार आहेत. कृतज्ञता सप्ताह मध्ये दिनांक ६ ते ८ डिसेंबर दरम्यान नावडे येथील प. जो. म्हात्रे विद्यालय यामध्ये क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सांघिक आणि वैयक्तिक अशा दोन मुख्य गटांच्यात या क्रीडा स्पर्धा पार पडतील. ७ डिसेंबर रोजी गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी पारगाव दापोली येथील अनंत पांडुरंग भोईर विद्यालयात निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ८ डिसेंबर रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज कामोठे येथे भव्य विज्ञान प्रदर्शन संपन्न होणार आहे.९ डिसेंबर रोजी कामोठे न्यू इंग्लिश स्कूल येथे तज्ञ मंडळींचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. याच दिवशी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल कामोठे येथे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्पर्धांचे नियोजन करण्यात आलेले आहे. ९ डिसेंबर रोजी भव्य महारांगोळी पाहण्याची पर्वणी नागरिकांना मिळणार आहे. पनवेलच्या महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात नऊ ते दहा डिसेंबर दरम्यान वक्तृत्व स्पर्धा,महाविद्यालयीन गटा करता निबंध स्पर्धा आणि आंतर महाविद्यालयीन महिला कबड्डी स्पर्धांचे नियोजन करण्यात आले आहे. ११ डिसेंबर रोजी वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,फुंडे येथे अर्ध मॅरेथॉन पार पडणार आहे. यामध्ये रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनव्यतिरिक्त खुल्या गटातील स्पर्धक देखील भाग घेऊ शकतात. पवार साहेबांच्या जन्मदिनाच्या दिवशी अर्थातच १२ डिसेंबर रोजी रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागातील विविध शाखांच्या मुख्यालयात वृक्षारोपण,आरोग्य शिबिरे आणि स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.१७ डिसेंबर रोजी वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात विभागीय स्पर्धांचे पारितोषिक वितरण संपन्न होणार आहे. यावेळी रघुनाथ माशेलकर,अनिल काकोडकर अशा दिग्गजांचे विचार ऐकण्याची पर्वणी उपस्थितांना मिळणार आहे.

१५ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीमध्ये शरद पवार साहेबांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने कृतज्ञता सप्ताह साजरा करण्याचे एकमताने ठरले होते. रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागांतर्गत रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई व पालघर जिल्हा या ठिकाणच्या शाळा समाविष्ट होतात. रायगड विभागाचे पोलादपूर गट, उरण गट, पनवेल गट, मुंबई गट आणि मोखाडा /डोळखांब गट असे वर्गीकरण करण्यात येते. येथील सर्व शाळांतील विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहेत. पवार साहेब म्हणजे हिमालयाच्या उंचीच्या व्यक्तिमत्वाचे विचार,त्यांचे कार्य, शिक्षण क्षेत्रातील त्यांचे अनन्यसाधारण योगदान, प्रगतीवादी विचारांची कास धरत साधलेले विकास पर्व ! हे सारे घडणाऱ्या पिढ्यांना कळावे या उद्देशाने कृतज्ञता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व स्पर्धांकरता आकर्षक स्वरूपाची रोख पारितोषिके आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत. भव्य दिव्य रकमांच्या या स्पर्धांच्या नियोजना करता मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी २५ लाख रुपयांची देणगी रयत शिक्षण संस्थेला दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.