Press "Enter" to skip to content

सिटी बेल प्रस्तुत आषाढी एकादशी स्पेशल “अभंग काव्य”

आषाढी एकादशीच्या औचीत्याने सिटी बेल वर संपूर्ण महाराष्ट्रातील कवींकडून विठूरायाच्या गुणगाणाची भक्तीमय काव्यपुष्पांची उधळण

आषाढी एकादशी या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे म्हणूनच हिला देवशयनी एकादशी, स्मार्ताची एकादशी, किंवा  भागवत एकादशी असे म्हणतात हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो.
महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात.हिलाच आषाढी वारी म्हणतात.चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
विविध भागातून आलेले हे सांप्रदाय पंथातील भाविक मंडळी    विठुमाऊलींच्या  भजनात न्हाऊन निघतात . म्हणूनच सिटी बेल कडून   सर्व भाविक भक्तांसाठी    खास आषाढी एकादशीच्या पावन दिनी संपूर्ण महाराष्ट्रातील काही कवी-कवियेत्रींच्या लेखनीने विठ्ठल भक्तीने  सजलेले अभंग -काव्य  सादर करत आहोत .

“आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो”

                   – अभंग


विठ्ठल सावळा l रखुमाईसंगे l
भजनात रंगे l भक्तांसवे ll

भजन, पूजन l टाळ नि अभंग l
भक्त सारे दंग l किर्तनात ll

तुळशीच्या माळा l घालुनीया गळा  
जणू दिसे मळा l भक्तीचा हा ll

तुझ्या दर्शनाने l होई मन शांत l
जीवाचा आकांत l लोप होई ll

होता पायी लीन l पुरे होई काम l
हेची चारधाम l पांडुरंग ll

देवा, विठुराया l सर्वांना तारणे l
एकची मागणे l तुजपाशी ll

विठू माझा सखा l विठ्ठल सोबती l
करूया आरती l जिवेभावे ll

पंढरपूरची l वारी भाविकांची l
कामना मनाची l पूर्ण करी ll

llजय जय विठ्ठल रखुमाई ll

                🙏🙏

सौ. संजना विद्याधर जुवाटकर
कळवा, ठाणे. ७७१०८३२२३०.

=======================


                  – वारकरी –
     उच्च नीच भाव
     आम्हां नच ठावे
    अठरापगड बंधू
     वारकऱ्यां  सवे
          परमार्थ भक्ती,एकसंग वारी
          फुटो मस्तक, तुटो तनू जरी
          नाम गजर ना सोडी वारकरी
          टाळमृदुंग गजरी, गुणगान करी
भक्ती नि शक्ती दोन्हींमध्ये हरी
जागराचा मंत्र , रामकृष्ण हरी
भगवी पताका घेई खांद्यावरी
वदे मुखी फक्त हरी हरी
            आषाढी कार्तिकी पंढरपुरी
             चंद्रभागेमाजी स्नान करी
             डोळाभर पाही माऊलीचे रूप
               अंतरंगी उजळे ज्ञानदीप
               नाम विठ्ठलाचे जीभेवरी
              तृप्त होऊन जाई वारकरी

                 राजाराम भगत
                  मोठे शहापूर, अलिबाग

=============≠=========


🚩 विठू कारभारी..

वारकरी सारे । करतात वारी
विठू कारभारी । पंढरीचा ।।१।।

शेकडो वर्षांची । आहे परंपरा
चालतसे धरा । सोबतीला ।।२।।

वाहे चोहीकडे । आनंदाचा पूर
नाही हुरहूर । जीवा आता ।।३।।

आषाढी वारीचा । महिमाच न्यारा
विठूचा देव्हारा । काळजात ।।४।।

विठू माझा बाप । विठू माझी माय
आता उणे काय । संसारात ।।५।।

युगे अठ्ठावीस । उभा एका जागी
सदा भक्तालागी । तारावया ।।६।।

होतो सदा लीन । अथांग सागर
भक्तीचा जागर । पंढरीत ।।७।।

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण


======================


                   व्वा- वारी –

जय राम कृष्ण हरी
जप याचा सदा मुखी
वारकरी वारीतला
दिसे मज फार सुखी..१

रंगे भक्तांचा सोहळा
वळे पाऊल तिकडे
सर्वधर्मसमभाव
याचे दर्शनही घडे..२

होई भजन कीर्तन
पांडुरंग पांडुरंग
दिंडी मध्ये वारकरी
भक्तिमय होई दंग..३

टाळ मृदंग नि वीणा
सोबतीला सारे वाद्य
एकात्मिक भावनेचे
दर्शनही होई आद्य..४

स्वस्थ बसूही देईना
विठूमाऊलीची ओढ
वारी सुलभ वाटते
श्रद्धा भक्ती देता जोड..५

सुचित्रा कुंचमवार
नवी मुंबई


======================


विठ्ठल नामाचा महिमा !

विठ्ठल नामाचे । दैवत भूवरी ।
साक्षात श्रीहरी । भगवंत ।।

विठ्ठल नामाचा । महिमा अपार ।
होई बेडा पार । जपता ते  ।।

विठ्ठल नामाने । होई चित्त शुद्धी ।
राही नीट बुद्धी । सकलांची ।।

विठ्ठल नामाचा । होता तो गजर ।
चित्त थाऱ्यावर । कैसे राही ।।

विठ्ठल नामाची । असता शिदोरी ।
अध्यात्माची दोरी । मजबूत ।।

विठ्ठल नामाचा । करता तो जप ।
वसे विठु रूप । ध्यानी मनी ।।

विठ्ठल नामाचे । करता चिंतन ।
उल्हसती जन । अतरंगी ।।

विठ्ठल नामाचे । होता उच्चारण ।
हृदय स्पंदन । चाले नीट ।।

विठ्ठल नामाचा । घोष तो करता ।
मोद देहचित्ता । अपार तो।।

विठ्ठल नामाने । आनंदते मन ।
वाटे ते प्रसन्न । सदोदित ।।

विठ्ठल नामाने । संकट टळते ।
सारे क्षेम होते । श्रद्धाभाव ।।

विठ्ठल नामाचे । वेड लागता रे ।
भान नच उरे । देहाचेही ।।

विठ्ठल नामाची । लागता ती गोडी ।
आनंदाने उडी । आपसूक ।।

विठ्ठल नामाने । मिळे मन:शांती ।
आणि मोक्षप्राप्ती । जीवनांती ।।

विठ्ठल नामाचा । महिमा जाणावा ।
नि अनुभवावा । जीवनात ।।


..
प्रविण शांताराम,पनवेल

=======================


🙏सावळा विठ्ठल 🙏

सावळा विठ्ठल
भेटावा म्हणूनी
वारक-यां ओढ
लागे ध्यानीमनी.१.

माळ तुळशीची
गळ्यात घालूनी
वारीत चालती
निमग्न होऊनी.२.

भगवी पताका
असे खांद्यावरी
रंगूनीया जाती
नामाचे गजरी.३.

भेदभाव नसे
कोणी सानथोर
आतुरती सारे
गाठण्या माहेर.४.

स्वप्न ध्यानीमनी
नित्य एक असे
वाट चालताना
माऊलीच दिसे.५.

चंद्रभागे तीरी
स्नान करायचे
शुद्ध होऊनीया
दर्शन घ्यायचे .६ .

प्राणांच्या ज्योतींनी
देवा ओवाळाचे
संतृप्त ? माघारी जायचे.



  सौ.शर्मिला आ.जोशी          
श्रीवर्धन, रायगड

=======================


          परमार्थी गंगा –


पंढरीत वास| भक्तीचाच घास |
सावळ्याची आंस | वारी लागे ||१||

आषाढाची वारी | दर्शनाची बारी |
सान -थोर येती | राऊळासि ||२||

परमार्थी गंगा | करे पाप भंगा|
वीटेवर रंगा | उभा आहे ||३||

येथे नाही गर्व | आनंदाचे पर्व |
मोदे येती सर्व | पालखीस ||४||

बैल भाग्यवान | पालखीचा मान |
पूर्व जन्म धन | नशिबात ||५||

देवावं विश्वास | धीराचाच श्वास |
साकडे विठूस | पामरांचे ||६||

पाळू आम्ही धर्म | करू सतकर्म|
हेचि आहे मर्म | जीवनाचे ||७||

प्रकाश राजोपाध्ये खोपोली

======================


शिर्षक—जन्मासी येऊनि पहावी ही पंढरी*



*| पवित्र क्षेत्र पंढरी चंद्रभागा तीरी |*
*|| वसुंधरेवरी स्वर्गीय देवनगरी ||*

*| अपव्यय सव्य दोन्ही कर कटेवरी |*
*|| अठ्ठावीस युगे विठू उभा विटेवरी ||*

*| प्रतिवर्षी भक्तजन जे करती वारी |*
*|| जन्ममृत्यू फे-यांतूनी तो सोडवी तारी ||*

*| नित्य वदा विठ्ठल विठ्ठल जय हरी |*,
*|| नित्य वदा विठ्ठल विठ्ठल जय हरी ||*.

*| तुझ्याप्रति भक्ती पुण्य रामकृष्ण हरी |*
*|| जन्मासी येऊनि पहावी ही पंढरी ||*

                     
*अजय शिवकर*
*केळवणे पनवेल*
*७९७७९५०४६४*








*शिर्षक – दर्शनाची आस*


तुझ्या दर्शनासी | आतुरले नेत्र |
जीवीचा तू मित्र | पांडुरंगा ||१||

अंतराची हाक | टाळ चिपळ्यांत |
उठे दिगंतात | नाम तुझे || २||

भेटी लागी जीवा | घेतलासे ध्यास |
तुझेच आभास | सर्वां ठायी ||३||

पावलांस साथ | मृदुंगाची थाप |
सरो भव-ताप | वारी योगे ||४||

किर्तनी फुलता | भक्तीचे आंगण |
जन्मांचे रिंगण | मिटो यावे ||५||

रूप मनोहर | पडावे ह्या दिठी |
घालू द्यावी मिठी | चरणांसी ||६||

विनवी आश्लेषा | हरावे विकार|
सगुण साकार | प्रकटावे ||७||

आश्लेषा निलेश राजे
ठाणे







आषाढी वारी     

वैकुंठ पंढरी | आषाढीची वारी |
भावे नेम करी | दर साल || १ ||

वाट पंढरीची | ओढ विठ्ठलाची |
साथ भाविकांची | मेळा चाले || २ ||

श्रद्धेचा मृदुंग | मनाचा अभंग |
संकीर्तनी दंग | नाम घेई || ३ ||

देहबुद्धी सोडी | लोभ माया तोडी |
अभंगाची गोडी | मना जडे || ४ ||

रिंगण जन्मांचे | धावणे मनाचे |
चंदन भक्तीचे | लावियले || ५ ||

वारीतले क्षण | जीवन शिक्षण |
संत शिकवण | मनी ठसे || ६ ||

पूर्व सुकृताची | वारी पंढरीची |
ध्वजा वैष्णवांची | फडकते || ७ ||

ज्योत्स्ना तानवडे.
वारजे,पुणे.५८





*आषाढीची वारी*

आषाढीची वारी l चालली पंढरी
चंद्रभागे तीरी l हरी नाम

भागवत धर्म l भगव्या पताका l
तालावर ठेका l हरी नाम

वैष्णवा दिवाळी l घालती फुगडी l
हरखते कुडी l हरी नाम

अमृताच्या सरी l दर्शनाची रांग l
कीर्तनात दंग l हरी नाम

पालखीच्या पुढे l अश्वाचे रींगण l
घडता दर्शन l हरी नाम

नामाचा महिमा l धन्य ती विठाई l
पुण्य प्राप्ती होई l हरी नाम

नित्य मुखी राहो l विठ्ठला भजावे l
आप्पा म्हणे घ्यावे l हरी नाम

विलास कुलकर्णी  ( आप्पा )
मीरा रोड
7506848664




*आषाढ वारी*
 

वारीचा सोहळा | भक्तीचा हा मळा |
विठ्ठलाचा लळा | लागलासे || १ ||

कुणा नसे तमा | ऊन पावसाची | विठ्ठल भेटीची | आस मनी || २ ||

अवीरत चाले | वारीची ह्या वाट | अवघड घाट | वारकरी || ३ ||

चिंपळ्यांची साथ | टाळ मृदंगाला | 
किर्तनी दंगला | हरी भक्त || ४ ||

घेवून पालख्या | साधु संत येती |
वारीची महती | दिगंतरी || ५ ||

विठुचा गजर | भजन किर्तन
फुगड्या, रिंगन | जागोजागी || ६ ||

सगुण सावळा | चंद्रभागे तीरी
रेखास पंढरी | सोडवेना || ७ ||

रेखा कुलकर्णी ©®
चिंचवड, पुणे.
८४११९५८२२६







मुखी नाम यावे..…



विठ्ठल विठ्ठल । मुखी नाम यावे ।
मजशी करावे । उपकृत ।।

देवा पांडुरंगा । मोक्ष नको मज ।
हाती तुझा ध्वज । मज हवा ।।

परमार्थ हवा । पण नको स्वार्थ ।
कळावे भावार्थ । विठुराया ।।

मोक्षप्राप्ती नाही । देवा तुज जर ।
आम्ही मरमर । कैसे करू? ।।

तुझ्याशी संबंध । मज जोडायचे ।
तुज जाणायचे । मायबाप ।।

मरण मजला । सेवेमध्ये यावे ।
मज प्राप्त व्हावे । सेवाधर्म ।।

परिवर्तनाची । माझी इच्छा फार ।
करण्या साकार । बळ द्यावे ।।

नको दिसू देऊ । अन्याय होताना ।
सज्जन जाताना । फासावर ।।

अजुचे जीवन । जनां यावे कामी ।
तुझ्या तीर्थधामी । येणे व्हावे ।।


©️®️शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७



आषाढीची वारी (अभंग)

चंद्रभागे तीरी । सावळा तो हरी ।
आषाढीची वारी । पंढरीची ।।

दिंडीत चालतो । संसार सोडूनि ।
हव्यास गाडूनी । तुझ्या पायी ।।

अनवानी पाय । चाले तुझी वाट ।
पंढरीत थाट । हरीचाची ।।

तुळशीची माळ । हातामंदी टाळ ।
अभंगाची लाळ । मुखामंदी ।।

दर्शनाची आस । भेटीचा हा ध्यास ।
अट्टहास खास । वारीचाची ।।

मुखी तुझे नाम । भजन कीर्तन ।
माऊली रिंगण । सुंदरची ।।

देव माझा काळा । तुझाचिरे लळा ।
वारकरी गोळा । वाळवंटी ।।

चंद्रभागे तीरी ।  सज्जनांचा मेळा
भक्तीचा सोहळा ।  शोभिवंत ।।

ज्ञाना तुका नामा ।  भेटती रे संत ।
नाही आता खंत ।  कशाचीही ।।

युवा आला भेटी।  तुलाच शरण।।
धरतो चरण  । पांडुरंगा ।।

              कवि
श्री. युवराज गोवर्धन जगताप
        (काटेगाव ता.बार्शी)
         8275171227






आजच्या पांडुरंगमय वातावरणात  साखरेहून गोड कविता 


*लक्ष्मीची ‘ सावली*.

विठोबाही रुकिमणीला
       खूप कामे सांगतो ,
अन्  तिच्यावर थोडा
    रूबाब गाजवतो .

सकाळीच म्हणाला विठुराया
     रुक्मिणी,’ जरा आज
नीट कर सडा -सारवण
आपल्याकडे येणार भक्त सर्वजण

विठोबा म्हणतो रुक्मिणीला ,
‘ भक्तांची विचारपूस
    जरा अगत्याने कर ,
अगं हे तर त्यांच माहेरघर ‘.

विठोबा म्हणतो , ‘ जनीची
    कर  ना तू वेणी -फणी ‘
अगं एकटी आहे अगदी
तिला या जगी नाही कुणी .

रुक्मीणी, उद्या तर घाल तू
     पुरणा -वरणाचा घाट
उदया आहे बार्शीच्या
भगवंताच्या स्वागताचा थाट

एका मागोमाग सूचना ऐकून
    रुक्मिणी आता रुसली
आणि रागा- रागाने जाऊन
    गाभाऱ्या बाहेर बसली .

सारखंच याचं आपलं
       भक्त अन् भक्त
मी काय आहे
          कामालाच फक्त ?
 
भोवती तर याच्या सारखा
      भक्त आणी संत मेळा
काय तर म्हणे _
     विठु लेकुरवाळा .

भक्तांनाही कांही
       माझी गरजच नाही
कारण तोच त्यांचा बाप
    अन् तोच त्यांची आई .

कधीतरी माझी ही
      कर जरा चौकशी
भक्तांच्या सरबराईत
     दमलीस ना जराशी .

मी आता मुळी
     जातेच कशी इथुन
बाहेर जाऊन याची
      गंमत बघते तिथुन

आता तरी याला
       माझी किंमत कळेल
अन् मग हळूच
     नजर इकडे वळेल

विठू जरी आहे
      साऱ्यांची माऊली
भगवंतांच्याही मागे असते
     ‘ लक्ष्मीची ‘ सावली.



अनामिक
👣👣👣👣👣👣👣




अभंग – पंढरीची वारी
     

आषाढ महिना । भक्तिचाच मास।
लागतसे आस  । पंढरीची।।१।।

विठू- रखुमाई   । पहावे नयनी।
हेची ध्यानीमनी । सकळांच्या।।२।।

जेथे जेथे असे  । संतांचेच स्थान।
तेथून  प्रस्थान  । पालखिंचे।।३।।

विठ्ठल विठ्ठल  । नामाचा गजर।
घुमे वाटेवर     । जागोजागी।।४।।

भक्तांचा हा मेळा। चालला पंढरी।
त्यात वारकरी  ।  पुण्यवान।।५।।

ज्यांचे लागतील। चरण पंढरी।
तयांना उद्धरी  । पांडुरंग।।६।।

जाता  एकवेळ । पंढरीच्या वारी।
विठू उभा दारी । राही सदा।।७।।

टाळ मृदुंगाच्या। गजरात दंग।
होई  पांडुरंग  । भिमातिरी।।८।।

आषाढ-कार्तिकी। एकादशी दिशी।
मिळे पुण्यराशी। पंढरीत।।९।।

विठू तुझ्या भेटी। लागले हे ध्यान।
होई सत्यवान  । कासावीस।।१०।।


रचना :- सत्यवान शांताराम घाडी.
दिवा

=======================

बा विठ्ठला…….

युगे अठठावीस। चंद्रभागेतीरी।
उभा माझा हरी। पांडूरंग ॥१॥

पुंडलीक भक्त।  त्याच्या विटेवरी।
कर कटेवरी।  ठेवूनिया ॥२॥

पंढरीची वारी।  पाऊले चालती।
आनंदे डोलती ।भक्तजण॥३॥

करुनी रिंगण। शुभ्र अश्व धावे।
लाखो भक्ता सवे।  मनोभावे॥४॥

टाळ न मृदंग। विठ्ठल गजरी।
पंढरी नगरी। दुमदुमे ॥५॥

करीती साजरा। देखणा सोहळा।
वैष्णवांचा मेळा। जमलासे॥६॥

एकादशी दिनी। दर्शनाची आस।
लागली भक्तास। नित्यनेमे॥७॥

सह्याद्रीकन्या                                डॉ शीतल शिवराज मालूसरे
महाड-रायगड

=======================

विश्‍व विधात्या विठ्ठला…

विश्‍व विधात्या विठ्ठला
पामराने काय मागावे तुला?
भक्तीचा नसावा देखावा
यात तेवढे लक्ष घाल बाबा
बाकी कळावे लोभ असावा…

विश्‍व विधात्या विठ्ठला
पामराने काय मागावे तुला?
परमार्थाचा नसावा कांगावा
यात तेवढे लक्ष घाल बाबा
बाकी कळावे लोभ असावा…

विश्‍व विधात्या विठ्ठला
पामराने काय मागावे तुला?
सत्तेचा माज जरा उतरावा
यात तेवढे लक्ष घाल बाबा
बाकी कळावे लोभ असावा…

विश्‍व विधात्या विठ्ठला
पामराने काय मागावे तुला?
नात्यांमध्ये रुजावा गोडवा
यात तेवढे लक्ष घाल बाबा
बाकी कळावे लोभ असावा…

विश्‍व विधात्या विठ्ठला
पामराने काय मागावे तुला?
भुकेल्यांना घास मिळावा
यात तेवढे लक्ष घाल बाबा
बाकी कळावे लोभ असावा…

विश्‍व विधात्या विठ्ठला
पामराने काय मागावे तुला?
नागड्यास कपडा मिळावा
यात तेवढे लक्ष घाल बाबा
बाकी कळावे लोभ असावा…

विश्‍व विधात्या विठ्ठला
पामराने काय मागावे तुला? ‌ बेघरास निवारा मिळावा
यात तेवढे लक्ष घाल  बाबा
बाकी कळावे लोभ असावा…

विश्‍व विधात्या विठ्ठला
पामराने काय मागावे तुला?
नीतिमत्तेस थारा मिळावा
यात तेवढे लक्ष घाल बाबा
बाकी कळावे लोभ असावा…

विश्‍व विधात्या विठ्ठला
पामराने काय मागावे तुला?
भक्तगणास न्याय लाभावा
यात तेवढे लक्ष घाल बाबा
बाकी कळावे लोभ असावा…

विश्‍व विधात्या विठ्ठला
पामराने काय मागावे तुला?
निसर्गाचा तोल सांभाळावा
यात तेवढे लक्ष घाल बाबा
बाकी कळावे लोभ असावा…

विश्‍व विधात्या विठ्ठला
पामराने काय मागावे तुला?
भेदाभेदास अंत असावा
यात तेवढे लक्ष घाल बाबा
बाकी कळावे लोभ असावा…

विश्‍व विधात्या विठ्ठला
पामराने काय मागावे तुला?
माणूस माणसात राहावा
यात तेवढे लक्ष घाल बाबा
बाकी कळावे लोभ असावा…


कवयित्री,
डॉ. संगीता गोविंदराव आवचार,
परभणी   9767323290

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.