गव्हाण विभागात उभा राहणार शिव छत्रपतींचा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा !
पहा कसे असेल हे भव्य शिव स्मारक 👇
सिटी बेल • उलवे •
स्व. जनार्दन भगत यांच्या संकल्पनेतून १९८१ साली महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा उभारला गेला व तत्कालीन विरोधी पक्षनेते शरद पवार यांच्या शुभहस्ते, तसेच लोकनेते दि. बा. पाटील, दत्तूशेठ पाटील, एन. डी. पाटील यांच्या उपस्थितीत अर्धपुतळ्याचे अनावरण संपन्न झाले होते. या पुतळ्यास आता तब्बल ४१ वर्ष होत आहेत.
गव्हाण विभागातून एस्सार, ओ. एन. जी. सी. माझगांव डॉक, १९८४ सालचा गौरवशाली – शौर्यशाली लढा व अनेक लढ्यांचे नेतृत्व करताना स्व. जनार्दन भगत यांनी कोपर फाट्यावरील शिव छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करून अनेक लढे यशस्वी केले व कष्टकरी, शेतकरी, कामगारांना न्याय मिळवून दिला.
अनेक लढ्यांचा साक्षीदार असलेल्या पुतळ्याची ४१ वर्ष सातत्याने ऊन – पावसाचा परिणाम होऊन क्षति झालेली आहे. म्हणून गव्हाण विभागातील शिवछत्रपती स्मारक व उत्सव समितीचे नेते रामशेठ ठाकूर, महेंद्र घरत यांनी छत्रपतींचा भव्यदिव्य – अश्वारूढ पुतळा नव्याने विकसित होत असलेल्या उलवा नोड मध्ये उभा करण्याचा संकल्प मांडला व सिडको व्यवस्थापनाबरोबर अनेक वर्ष संघर्ष करून खारकोपर स्टेशन समोर सव्वा सहा एकर जागा मंजूर करून घेतली.
यामधे तत्कालीन चेअरमन म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांचा सिंहाचा वाटा आहे. शिवछत्रपतींचा हा अश्वारूढ पुतळा व शिवसृष्टी मुंबईतील सर्वात मोठा कोकणासाठी नव्याने निर्माण होत असलेल्या न्हावा – शिवडी लींक समोर उभारला जात आहे.
Be First to Comment