Press "Enter" to skip to content

पोलादपूर शहरात बालीकेवर अत्याचार

डीवायएसपी तांबे यांनी पोक्सो गुन्हा दाखल करण्यासाठी दिली पोलादपूर पोलीस ठाण्याला भेट ; आरोपीला अटक

प्रकरण दाबले जाऊ नये म्हणून काँग्रेस – भाजप आक्रमक

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

पोलादपूर शहरामध्ये घडलेल्या बालिका अत्याचाराच्या घटनेतही प्रकरण दाबले जाण्याची शक्यता वाटल्याने काँग्रेस व भाजपाच्या महिला आक्रमक झाल्या. या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिक्षक आयपीएस निलेश तांबे यांनी पोलादपूर पोलीस ठाण्याला भेट देऊन केलेल्या मार्गदर्शनानुसार सदर आरोपी व्यक्तीविरूध्द पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन रात्री उशिरा अटक करण्यात आल्याची माहिती पोलादपूर पोलीस ठाण्यातून देण्यात आली.

पोलादपूर शहरातील उत्तरवाहिनी सावित्री नदीच्या पुरामुळे उदध्वस्त झालेली पोस्ट ऑफिसची जुनी इमारत मोडकळीस आली असून सध्या वापरात नाही. पोलादपूर शहरातील गंगामाता सभागृहाच्या रस्त्याच्या प्रारंभी असलेल्या मराठी मुलांची शाळा तसेच कन्या शाळेलगत एक टपरी आहे. या टपरीचालकाने एका 10 वर्षे 25 दिवस वयाच्या अल्पवयीन मुलीचा बळजबरीने तोंड दाबून जुन्या पोस्ट ऑफिसच्या इमारतीमध्ये नेले आणि एकदा तिला स्वत:च्या अंगाखाली घेऊन तर दुसऱ्यावेळी तिला स्वत:च्या अंगावर ओढून विनयभंग केल्याचे दुष्कृत्य दुपारी एक वाजता या इमारतीमध्ये केले.

यावेळी मुलीच्या आरडाओरडीमुळे टपरीचालकाच्या वाईट कृत्याकडे परिसरातील लोकांचे लक्ष जाऊन लोकांनी त्या मुलीला नराधमाच्या हातून सोडविले आणि त्यानंतर दिवसभर पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये राजकीय आखाडा होऊन सदर मुलीच्या बाजूने तसेच काहींनी त्या टपरीचालकाला वाचविण्याच्या हेतूने प्रयत्न सुरू केले.

यामुळे शहरामध्ये काही तास हे प्रकरण मिटविले जाण्याच्या शक्यतेमुळे नैराश्यपूर्ण संताप व्यक्त होत असताना या सर्व प्रकरणामध्ये होणारा विलंब लक्षात घेऊन महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस निलेश तांबे यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यास भेट देऊन या तपासकामी मार्गदर्शन केले.

सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव यांनी याप्रकरणी स्वत: तपास हाती घेऊन टपरीचालक आरोपी अनंत यशवंत दरेकर (वय 63, रा.भैरवनाथनगर, पोलादपूर) याच्याविरूध्द लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार भा.दं.वि. 354, 354 (ब) (ड) नुसार गुन्हा र.नं. 092022 प्रमाणे गुन्हा नोंदविला. याप्रकरणातील आरोपी अनंत दरेकर याला रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे.

सदर पिडीत बालिकेची आई घरकाम मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवित असून तिचे कुटूंब अनुसुचित जमातीचे आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपीविरूध्द पोक्सोप्रमाणे ऍट्रॉसिटीचा गुन्हादेखील दाखल होण्याची आवश्यकता असल्याचे स्थानिक लोकांचे मत आहे. दरम्यान, आरोपीची पोलादपूर शहरातील मुलांची शाळा आणि मुलींच्या शाळेजवळील टपरी हटविण्याची मागणी शहरवासियांमधून होत असून त्यासाठी स्वाक्षरी मोहिम सुरू करण्यात येणार असल्याचे काही राजकीय संघटनांकडून सांगण्यात आले आहे.

या घटनेतील आरोपी हा नवनिर्वाचित नगरसेविकेच्या तसेच सोशल मिडियामुळे विविध सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संपर्कातील व्यक्तीच्या नात्यातील असल्याने सदरचा गुन्हा दाखल न होता दडपला जाईल, अशी साशंकता व्यक्त होत असताना महाडचे डीवायएसपी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनामुळे पोलादपूर पोलीसांनी कोणताही विरोध अथवा प्रभाव न जुमानता आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करून निष्पक्षपातीपणाचे उदाहरण शहरवासियांना दिले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.