

तर येत्या काळात जिल्हा परिषदेचे काम महाराष्ट्रात नंबर एकचे असेल — सभापती वैकुंठ पाटील
पेण, ता. 12 (वार्ताहर) : आपल्या या भूमीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यासह अनेक संतांनी रचलेला पाया हा महाराष्ट्राच्या हितासाठी प्रेरणादायी असून आजही लाखो सांप्रदायातील भाविक पंढरपूर, आळंदी या संतांच्या भूमीत जाऊन तल्लीन होतात म्हणून हा इतिहास येणाऱ्या तरुण पिढीच्या स्मरणात रहावा जेणेकरून आता डीजे बंद होत चालला आहे मात्र भजन कधीही बंद होणार नाही असे वक्तव्य आमदार रवींद्र पाटील यांनी केले.
रायगड जिल्हा परिषद अंतर्गत पेण, पाली- सुधागड पंचायत समितीच्या विद्यमानाने संत गाडगेबाबा महाराज यांच्या 150 जयंतीनिमित्त्याने ग्रामीण भागातील भजनी मंडळांना भजन साहित्य वाटपाचा कार्यक्रम मराठा समाज हॉल गणपती वाडी येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला आमदार रवींद्र पाटील, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी अध्यक्ष निलिमा पाटील, सभापती वैकुंठ पाटील, सदस्य प्रभाकर म्हात्रे, जनार्दन भस्मा, ताई दरवडा, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, जागृती मानकर, शर्मिला बोडके, उपसभापती संजय डंगर, पंस.गटनेते विवेक म्हात्रे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष रघुनाथ दळवी, गटविकास अधिकारी गजानन लेंडी, के.डी.म्हात्रे, शोमेर पेणकर, जोमा दरवडा आदिंसह पेण, सुधागड- पाली तालुक्यातील असंख्य भजनी मंडळ उपस्थित होते.

यावेळी सभापती वैकुंठ पाटील यांनी सांगितले की जिल्हा परिषदेने या सहा महिन्याच्या कालावधीतच वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे काम करत सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका ठेवली असून गणेशोत्सवाच्या या सणांमध्ये भजनी मंडळांना कोणती उणीव भासू नये याकरिता जिल्ह्यातील भजनी मंडळांसाठी 6 कोटी रुपयांची तरतूद करत पुढील वर्षी तरुणांच्या खेळ वृतीकडे लक्ष देत त्यांच्यासाठी खेळरत्न पुरस्काराने जाहीर करणार आहोत. आजपर्यंत अनेक योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असून या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देणार आहोत त्यामुळे येत्या काळात जिल्हा परिषदेचे काम हे महाराष्ट्रात नंबर एकचे असेल असे त्यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्याच्या या पावनभूमीत जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यापासून सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही सर्वजण काम करत आलो आहोत येथील प्रत्येक नागरिकाला पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत आज जवळपास 1200 भजनी मंडळांना टाळ आणि मृदुंग वाटप केला आहे या साहित्याच्या माध्यमातून त्यांचे विचार गावागावात पोहोचणे आवश्यक आहे.जिल्ह्यात 1800 गावे आहेत सर्वांचा विचार करता येणाऱ्या काळात राहिलेल्या सर्व भजन मंडळींना अधिकची तरतूद करत साहित्य भेट देणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सांगितले.



Be First to Comment