Press "Enter" to skip to content

१७ गुन्हे आणि १४३ मिसिंग प्रकरणांचा निपटारा; १०७ तोळे सोने, ७ वाहने अन् १४३ मोबाईल नागरिकांना परत


पनवेल, दि. १२ (संजय कदम) : गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून जप्त मुद्देमाल मूळ मालकांपर्यंत पोहोचविण्यात पनवेल पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पनवेल शहर, पनवेल तालुका आणि खांदेश्वर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल २ कोटी ७ लाख ५७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल संबंधित तक्रारदार आणि नागरिकांना परत करण्यात आला.

पनवेल विभागातील प्रलंबित मुद्देमालाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तो विनाविलंब संबंधितांच्या स्वाधीन करण्याचे निर्देश परिमंडळ-३, पनवेलच्या पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त मयुर भुजबळ यांना दिले होते. त्यानुसार तीनही पोलीस ठाण्यांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत मुद्देमाल निर्गतीची कार्यवाही केली.

या कारवाईत १७ गुन्हे आणि १४३ मिसिंग प्रकरणांतील मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला. यामध्ये १०७ तोळे सोने, ७ वाहने, १४३ मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच अन्य मौल्यवान साहित्याचा समावेश आहे.

मुद्देमाल परताव्यात पनवेल शहर पोलीस ठाण्याने १ कोटी ८५ लाख ३४ हजार ५० रुपये, पनवेल तालुका पोलीस ठाण्याने १९ लाख ६ हजार ६५० रुपये, तर खांदेश्वर पोलीस ठाण्याने ३ लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल संबंधितांच्या स्वाधीन केला.

शनिवारी (दि. १२ सप्टेंबर) पनवेल येथील मंथन हॉलमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त मयुर भुजबळ यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना त्यांचा मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला. यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे आणि खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुद्देमाल मिळविण्यासाठी नागरिकांना विविध कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी एकाच ठिकाणी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्यांना मालमत्ता सुपूर्द करण्यात आली. त्यामुळे तक्रारदारांची पायपीट वाचली आणि पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले.

गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयीन बाबींची पूर्तता करत जप्त मुद्देमाल संबंधितांच्या हक्काच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याची ही कारवाई पनवेल पोलिसांच्या कार्यक्षम तपास यंत्रणेचे आणि नागरिकाभिमुख पोलिसिंगचे उदाहरण ठरली आहे. मौल्यवान वस्तू पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी पनवेल पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.