Press "Enter" to skip to content

‘जयंती २’ चित्रपटाचे पीव्हीआरमध्ये जास्तीत जास्त शो लावा; आरपीआय पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे


पनवेल दि. 12 (प्रतिनिधी):
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुरोगामी व प्रेरणादायी विचारांवर आधारित ‘जयंती २’ या चित्रपटाचे पनवेल येथील ओरियन मॉल मधील ‘पीव्हीआर सिनेमा’ येथे जास्तीत जास्त शो आयोजित करण्यात यावेत, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पनवेल शहराच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आरपीआयचे पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी पीव्हीआर सिनेमाच्या व्यवस्थापकांना निवेदन सादर केले.

शैलेश नरवडे यांचे दिग्दर्शन आणि लेखन असलेला ‘जयंती २’ हा चित्रपट शिक्षण व्यवस्थेतील राजकारण, कॉलेजमधील रॅगिंग, जातीभेद, आरक्षण आणि सामाजिक विषमता यांसारख्या गंभीर व ज्वलंत मुद्द्यांवर भाष्य करतो. एका आदिवासी विद्यार्थिनीने भेदभावाविरुद्ध आवाज उठवल्यामुळे तिला निलंबित केले जाते, तेव्हा संत्या आणि तनुजा यांच्यासारखे कार्यकर्ते या संस्थात्मक व सामाजिक अन्यायाविरुद्ध कसा लढा देतात, याचे प्रभावी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुरोगामी विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळेच या वैचारिक व सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटाचे अधिकाधिक शो पनवेलमधील पीव्हीआर चित्रपटगृहात उपलब्ध करून देऊन सहकार्य करावे, अशी अपेक्षा निलेश सोनावणे यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.