Press "Enter" to skip to content

सिंधुदुर्गातील गणेशभक्तांसाठी आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्याकडून विनामूल्य बससेवा रवाना

पनवेल : गणेशोत्सवानिमित्त कोकणातील आपल्या गावी जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित, सुखकर व आरामदायी व्हावा, या उद्देशाने मा. आमदार श्री. प्रशांतदादा ठाकूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन विनामूल्य एस.टी. बससेवा शनिवार, दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५. ०० वाजता पनवेल येथून सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना करण्यात आल्या.

या बससेवेचा शुभारंभ मा. आमदार श्री. प्रशांतदादा ठाकूर यांच्या शुभहस्ते होणार होता. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत महानगरपालिका प्रभाग क्रमांक ‘ड’ समितीचे सभापती श्री. अजय बहिरा आणि पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक श्री. संतोष शेट्टी यांच्या उपस्थितीत बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर दोन्ही बस सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना झाल्या.

ही विनामूल्य बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी संघाचे सदस्य तथा स्वाती ऑप्टिक्सचे मालक श्री. प्रल्हाद साटम आणि संघाचे उपाध्यक्ष श्री. संतोष चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच श्री. प्रदीप रावले, श्री. बाबाजी नेरुरकर आणि संघाचे सचिव श्री. रामचंद्र मोचेमाडकर यांनी पनवेल एस.टी. डेपोशी सातत्याने संपर्क साधून बस बुकिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

बससेवेच्या शुभारंभप्रसंगी संघाचे तरुण सदस्य संकेत पवार, नरहरी आंगणे, अभिषेक पालव तसेच ज्येष्ठ सदस्य मनोहर मराळ, अनिल नेमळेकर, विनोद परब, सुरेश पवार आणि गुरुदास वाघाटे उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम उत्साहात पार पडला.त्याप्रसंगी श्री प्रभाकर येरम यांनी कोकणातील सर्व देवताना आव्हान करून हा प्रवास सुरक्षित होईल यासाठी उत्तम गाऱ्हाणं घातला.

यावेळी बोलताना सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाचे अध्यक्ष श्री. केशव राणे म्हणाले, “गणेशोत्सवानिमित्त सिंधुदुर्गातील गणेशभक्तांना आपल्या गावी जाण्यासाठी आरामदायी, सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची सुविधा मिळावी, या उद्देशाने मा. आमदार श्री. प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी विनामूल्य बससेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ आणि सिंधुदुर्गातील सर्व गणेशभक्तांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.”

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक कोकणाकडे प्रवास करतात. अशा परिस्थितीत सिंधुदुर्गातील गणेशभक्तांसाठी दोन विनामूल्य बससेवा उपलब्ध करून दिल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून, आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणी सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाच्या सामाजिक बांधिलकीचेही सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.