अजयसिंह सेंगरवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा रस्त्यावर उतरु ः आरपीआय कोकण विभागीय अध्यक्ष जगदीश गायकवाड
सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |
महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांनी पनवेल येथील पृथ्वी हॉलमध्ये भारतीय संविधानाचा अवमान करून बेकायदेशीर वक्तव्य केल्याबद्दल सेंगर यांना येत्या दहा दिवसांत अटक करून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा अकराव्या दिवशी कळंबोली महामार्गावर चक्काजाम आंदोलन करू असा इशारा पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकण विभाग अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी दिला.

या निवेदनात म्हंटले आहे की, महाराष्ट्र करणी सेना अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांनी पनवेल येथील पृथ्वी हॉलमध्ये भारतीय संविधानाबाबत केलेले वक्तव्य बेकायदेशीर असून यामुळे समाजातील प्रत्येक जाती, धर्मामध्ये तेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. सदर कृत्य हे राष्ट्रद्रोहाच्या गंभीर गुन्हे अंतर्गत येत आहे.

भारतीय संविधानाने भारतातील प्रत्येक व्यक्तिला, जातीला समान दर्जा व समान अधिकार दिलेले आहेत. तसेच अजयसिंह सेंगर यांना कायद्याचे कुठलेही ज्ञान नसताना व भारतीय संविधानाबाबत अभ्यास नसताना भारतीय संविधान बदलून नवीन संविधान करण्याबाबत केलेले वक्तव्य हे भारतीय समाजामध्ये तेढ निर्माण करणारे असुन भारतातील तमाम नागरिकांचा अवमान करणारे शब्द उच्चारले गेले आहेत. तसेच अजसिंह सेंगर यांनी टिपु सुनलतान व अकबर या महापुरुषांची नावे घेऊन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.















Be First to Comment