4 वर्षाच्या शर्वीकाचे सह्याद्रीच्या भिंतीवर नाव : अत्यंत कठीण तैलबैला केला सर
सिटी बेल | अमूलकुमार जैन | अलिबाग |
अत्यंत कठीण व अवघड श्रेणीत गणला जाणारा, नैसर्गिक डाईक रचनेची कातळभिंत असलेला तैलबैला किल्ला. अलिबागची हिरकणी म्हणून प्रसिद्ध असलेली चिमुरडी शर्वीका म्हात्रे हिने हा किल्ला देखील सर केला आहे. मुळात अवघड गड किल्ले सर करण्यात शर्वीका हीच मोठा हातखंडा आहे. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर सहज बागडणारी शर्वीका हिने आजवर अनेक गड किल्ले सर केलं आहेत. तर नुकताच सगळ्यात उंचावर असलेला गिरनार देखील शर्वीकाने सर केला होता.
महाराष्ट्राला मुळातच नैसर्गिक सौंदर्य मोठ्या प्रमाणात लाभलेले आहे. या नैसर्गिक सौंदर्यामध्ये भर घालणारे डोंगर, नद्या, किल्ले, लेणी, मंदिरे ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात भटक्यांना आकर्षित करतात अशीच काही महत्वाची भौगोलिक आश्चर्य देखील महाराष्ट्रात आपल्याला आढळून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने पहिले नाव घेतले जाते मावळामध्ये सुधागडच्या अगदी तोंडावर आणि घनगडाच्या समोर एका तटस्थ पुराणपुरुषाप्रमाणे लाखोवर्षे उभ्या असलेल्या ‘तैलबैला’ या नैसर्गिक डाईक रचनेच्या कातळभिंतीचे. लोणावळा आणि मुळशीच्या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक परिसरात किल्ले आणि लेण्या या कायमच खुणावत असतात तसेच लोणावळ्याच्या परिसरात कायमच पर्यटकांची गर्दी असते परंतु या गर्दीकडे लक्ष न देता गिर्यारोहकांना कायम खुणावते ती ‘तैलबैला’ येथील कातळभिंत. कोरीगड किल्ल्याच्या पुढे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील ‘तैलाबैला’ या नैसर्गिक कातळभिंतीचा कडा गिर्यारोहकांना नेहमीच साद घालत असतो.
या कातळभिंतीची भुरळ अलिबागच्या छोट्या गिर्यारोहक असलेल्या शर्विका जितेन म्हात्रे हिला देखील पडली. जागतिक विक्रमवीर, बालगिर्यारोहक शर्विका जितेन म्हात्रे हिने नुकताच सलग चौथा विश्वविक्रम नोंदवून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता. महाराष्ट्रातील कठीण सुळका (कलावंतीण) आरोहण, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेर, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई ह्या तिच्या गाजलेल्या मोहिमांनंतर तिने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीची चुणूक दाखवून चौथ्या विक्रमांसोबत सलग अकराव्या रेकॉर्डस् बुक मध्ये आपले नाव नोंदविले होत.
कोजागिरी पौर्णिमा आणि हिरकणीचा इतिहास डोळ्यासमोर ठेऊन तिने कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने दिनांक १९ ऑक्टोबर २०२१ रोजी गुजरात मधील सर्वोच्च शिखर गिरनार सर करून एक नवा इतिहास महाराष्ट्राच्या नावावर नोंदविला होता. हा विक्रम होतो तोच तिने सह्यादीची कातळभिंत असलेला तैलबैला किल्ला तिने सर केला आहे. सह्याद्री पुत्र ट्रेकर ग्रुपचे सोमनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या इव्हेंटमध्ये शर्विकाने सहभाग घेतला होता.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे दिनांक 1 जानेवारी रोजी शर्विका व तिचे आईवडील यांनी अलिबाग सोडले. दुसऱ्या दिवशी किल्ल्यावर चढाई करायला सुरुवात केली. यादरम्यान शर्विका हीच उत्साह सगळ्यांना हुरूप देत होता. किल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणा शर्विका देत होती. आणि या चिमुरडीच्या घोषणांनी सहयाद्रीचा कातळ देखील स्फुरत दुमदुमून निघाला होता. तर सुरक्षा साधनांनी हा किल्ला सर करत तिने किल्ल्याच्या शिखरावर राष्ट्रध्वज आणि भगवा फडकवला आहे. हा किल्ला सर करणारी शर्विका ही सगळ्यात छोटी गिर्यारोहक असल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तैलबैला किल्याची समुद्र सपाटीपासुन उंची 3 हजार 332 फुट इतकी आहे. तैलबैला किल्याचा प्रकार हा गिरिदुर्ग असून, पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगर रांगेत हा किल्ला स्थित आहे. सह्याद्रीची रचना आणि ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्या लाव्हारसातून या डोंगरांची निर्मिती झालेली आहे. या लाव्हारसाचे थर थंड होताना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार होतात. त्यापैकी एक रचना म्हणजे डाईक तैलबैला उर्फ कावडीचा डोंगर. तैलबैलाची भिंत साधारणपणे 3310 फुट उंच असून उत्तर-दक्षिण अशी पसरलेली आहे.
Be First to Comment