Press "Enter" to skip to content

उरणमध्ये कोरोनाची स्फोटक आकडेवारी ; ८४ पॉजेटीव्ह तर २ मयत

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।

उरणमध्ये कोरोनाची आकडेवारी कमी जास्त येत होती. मात्र लॉकडाऊन असूनही कालच्या स्फोटक आकडेवारीत ८४ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर २ मयत झाले आहेत.यामुळे उरणमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याला सर्वस्वी नियमांचे होत असलेले उल्लंघन जबाबदार असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उरणमध्ये ही याचा प्रत्यय येत आहे. आजच्या कोरोना रिपोर्टमध्ये ८४ रुग्ण कोरोना पॉजेटीव्ह, उपचार करून घरी सोडलेले ४१ तर कोटनाका व बोकडविरा येथील प्रत्येकी १ असे एकूण २ मयत दाखविले आहेत.

उरणमध्ये शासकीय यंत्रणा गावोगावी उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याने तसेच एखाद्याचा कोरोना टेस्ट झाल्यानंतर रिपोर्ट ३ ते ४ दिवसांनी येतो त्यामध्ये जो पॉजेटीव्ह येतो तो मात्र रिपोर्ट येईपर्यंत इतरांना तिर्थप्रसाद देऊन येतो. यामुळेच उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याची जनतेत चर्चा सुरू आहे. आजच्या घडीलाही काही पॉजेटीव्ह रुग्णाचे नातेवाईक बाहेर फिरत असल्याचे नागरिक सांगतात.
लॉकडाऊन असले तरी उरणमधील गावोगावी बहुतेक ठिकाणी सर्व सुरू आहे. एवढेच नाहीतर दारुसुद्धा जादा दराने मिळत असल्याने ती गावोगावी दारू विक्रते आपल्या खासगी किंवा इतर गाड्यांमधून घरपोच करीत असल्याचे समजते. तसेच गुटखा सुद्धा खुलेआम विकला जात असल्याने सायंकाळ नंतर मध्यरात्री पर्यंत गावोगावचे धाबे, हॉटेल व चायनीज गाड्यांवर ग्राहकांची गर्दी होत असल्यानेच गावोगावी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. तसेच शहरात ही छुपी दारूची चढत्या भावाने विक्री होत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची नागरिकांत चर्चा सुरू आहे.

तसेच लसीकरण केंद्रावर ही गर्दी होऊन नियमांचे उल्लंघन होताना दिसते. उरण तालुक्यात अवघे ३ लसीकरण केंद्र असल्याने लोकसंख्येच्या मानानी कमी पडत आहेत. ती तालुक्यात वाढवत प्रत्येक पंचायत समिती मतदारसंघा वाईज ठेवण्यात यावे जेणेकरून लसीकरण केंद्रावर गर्दी कमी होईल. तसेच कोरोनाने मयत झालेल्यांचे शव नातेवाईकांच्या ताब्यात देऊन त्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अंत्यसंस्कार करण्यास सांगितले जात आहे. तसेच अंत्यसंस्कार करणारे ग्रामपंचायत कर्मचारी अथवा मयताचे नातेवाईक यांना कोणतीच सुरक्षित साधने न वापरता अंत्यसंस्कार करीत असल्याने तसेच सामाजिक कार्यक्रम, देव देवांच्या जयंत्या व लग्न समारंभ आदी ठिकाणी होणारी गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लॉकडाऊन असूनही कोरोनाची आकडेवारी एवढी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शासकीय यंत्रणा अपुरी ठरत असल्याचे उघड होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पुन्हा लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढविला आहे. परंतु लॉकडाऊन वाढवून त्याची अंमलबजावणी ठोस होत नाही. फक्त कागदावर लॉकडाऊन राहून बाकी छुप्या पद्धतीने सुरू रहात असल्यानेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तरी घेतलेल्या नियमांची अंमलबजावणी झाली तरच कोरोना आटोक्यात येईल अन्यथा ही आकडेवारी वाढतच राहण्याची शक्यता प्रशासनाच्या काही अधिकारी वर्गांनी नाव न छापण्याच्या अटीवर आमच्या प्रतिनिधीला दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.