Press "Enter" to skip to content

पनवेलमध्ये राजकीय भूकंप; शेकापक्षाला मोठा हादरा

शेकापक्षाचे नेते विश्वास भगत यांच्यासह हजारो कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल

पनवेल (प्रतिनिधी) रायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यात राजकीय भूकंप घडला असून शेतकरी कामगार पक्षाला मोठा हादरा बसला आहे. पळस्पे जिल्हा परिषद गटातील उसर्ली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते विश्वास भगत यांनी आपल्या हजारो समर्थक व कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे.या भव्य पक्षप्रवेशामुळे पळस्पे मतदारसंघातील शेकापक्षाची संपूर्ण राजकीय घडी विस्कटल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. उसर्ली येथील दीप सिटी येथे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर व भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा जल्लोषात पार पडला.

           यावेळी विश्वास भगत यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य संजय भगत, अर्चना भगत, माजी सरपंच करुणा भगत, हरेश्वर भगत, राकेश भगत, अमित भगत, मोहन भगत, डेरवली पंच कमिटीचे अध्यक्ष संतोष शेळके, रामदास शेळके, विविध सोसायटींचे पदाधिकारी आणि हजारो शेकाप कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश करत शेतकरी कामगार पक्षाची दयनीय अवस्था केली. 

           यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांच्या घरांवर सिडकोकडून अन्याय होत असेल, तर तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. अन्यायाविरोधात कडाडून विरोध करण्याची आमची भूमिका पूर्वीपासूनच राहिली असून, त्यासाठी आम्ही व आमचे कार्यकर्ते पूर्णपणे सज्ज आहोत, असेही त्यांनी नमूद केले. वाढत्या नागरीकरणामुळे परिसरातील गावांचे स्वरूप बदलत असून, या भागात नैना प्राधिकरण येत आहे. त्या अनुषंगाने नागरिकांच्या हिताला बाधा पोहोचवणाऱ्या चुकीच्या निर्णयांना कायम विरोध केला जाईल, असे आमदार प्रशांत ठाकूर ठाकूर यांनी स्पष्ट केले. सिडकोकडून राहत्या घरांवर प्लॉट टाकण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे या प्रकल्पामुळे नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे सांगत अटल सेतू व विमानतळामुळे हा परिसर थेट मुंबईशी जोडला गेला असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबईपेक्षाही अधिक सुविधा या भागात उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचा विश्वास व्यक्त करत, येत्या निवडणुकीत नागरिकांनी आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. भविष्यातही नागरिकांच्या हिताचे संरक्षण करण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू, असे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले.

          पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी आपल्या मनोगतातून बोलताना शेकापची झालेली बिकट अस्वस्थेवर भाष्य केले. विश्वास भगत यांच्या भाजप प्रवेशामुळे शेकापला आता पोलिंग एजंट आणि बुथवर बसायला कार्यकर्ते मिळतील का ? अशी परिस्थिती या भागात झाली आहे, असा सणसणीत टोला शेकापच्या पुढाऱ्यांना लगावला. तसेच यापुढील काळात विश्वास भगत आमदार प्रशांत ठाकूर यांचे खंदे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणार आहेत, असेही त्यांनी अधोरेखित केले. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा सरचिटणीस व पनवेल महानगरपालिकेतील भाजप महायुतीचे गटनेते नितीन पाटील, माजी शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, नगरसेवक एकनाथ गायकवाड, अजय बहिरा, महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष  प्रभुदास भोईर, माजी नगरसेवक सुनिल बहिरा, प्रभाकर बहिरा, विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, जयवंत भगत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, अतुल घरत, माजी सरपंच अतुल तांबे, मच्छिंद्र पाटील, संजय भगत, नितीन भगत, हेमंत भगत, मुकेश भगत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.