एनकाऊंटर मध्ये मारला गेला गँगस्टर विकास दुबे ###
वाचा संपूर्ण घटनाक्रम ###
सिटी बेल लाइव्ह / स्पेशल रिपोर्ट ###
उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबे याला ठार करण्यात आलं आहे. विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला चाललं होतं. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनचा अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि विकास दुबे यांच्यात चकमक झाली. यादरम्यान पोलिसांनी विकास दुबेला ठार केल्याचं सांगण्यात येत आहे. दुबेला उज्जैनवरुन रस्ते मार्गाने कानपूरला आणण्यात येत होतं. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजल्यापासून दुबेला घेऊन जाणारा ताफा उज्जैनवरुन निघाला. त्यानंतर काय काय घडलं पाहुयात.
त्या चौघांना ताब्या घेऊन गुरुवारी रात्री साडेनऊला ताफा निघाला
उत्तर प्रदेश पोलिसांनी रस्ते मार्गाने विकास दुबेला उज्जैनवरुन कानपूरला नेण्याचा निर्णय घेतला.
मध्य प्रदेश पोलिसांनी दुबे, त्याचे दोन वकील आणि दुबेच्या दारु कारखान्याचा संचालक अशा चार जणांना ताब्यात घेतलं. दारु कारखान्याचा संचालक आनंद हा दुबेचा खास मित्र असल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आलं होतं. याच आनंदने वकिलांना दुबेला सोडवण्यासंदर्भात काय करता येईल याबद्दल चर्चा करण्यासाठी उज्जैनला बोलवलं होतं. गुरुवारी रात्री साडे नऊच्या सुमारास पोलीस आणि एसटीएफचा (स्पेशल टास्क फोर्सचा) विशेष ताफा दुबे आणि आनंदला ताब्यात घेऊन उत्तर प्रदेशच्या दिशेने रवाना झाले.
रात्री साडेबाराला पोलीसांना अलर्ट
रात्री साडेबारा वाजता उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या रक्सा सीमेवर तैनात करण्यात आलेल्या पोलिसांना अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला. दुबे याला घेऊन जाणारा पोलिसांचा ताफा थोड्याच वेळात येथून जाणार असल्याचे सांगण्यात आलं. दुबेला घेऊन येणारी पोलीस आणि एसटीएफची टीम थोड्याच वेळात येथे पोहचणार असल्याचे सांगण्यात आलं. झाशी पोलीस दुबेला उरई सीमेजवळ सोडणार होती. रक्सा टोल नाक्यावर दुबेला घेऊन येणाऱ्या ताफ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं.
ताफ्याचे लोकेशन गायब
रात्री एकच्या आसपास शिवपुरी टोल प्लाजा येथून दुबेला घेऊन एसटीएफचा ताफा निघाला. दुबे स्कॉर्पियो गाडीमध्ये बसला होता. शिवपुरीवरुन निघाल्यानंतर एसटीएफ टीमचे लोकेशन अचानक गायब झालं. रक्सा टोल प्लाजावर या ताफ्याची वाट बघणाऱ्या पोलीसांनाही या ताफ्यासंदर्भात काहीच माहिती उपलब्ध होत नव्हती.
एका तासाचा रस्ता पण ताफा आलाच नाही
रात्री एक वाजल्यापासून एसटीएफच्या ताफ्याची वाट पाहणाऱ्या रक्सा टोल नाक्यावरील पोलिसांना वाट पाहतच उभे रहावे लागले. हा ताफा रात्री अडीच वाजले तरी रक्साला पोहचला नव्हता. खरं तर शिवपुरी मार्गे रक्सा ते झाशी हे अंतर अवघ्या एका तासाचे आहे. शिवपुरी आणि झाशीच्या दरम्यान एक रस्ता दतियाच्या दिशेने जातो. याच रस्त्याने एसटीएफचा ताफा दुबेला थेट कानपूरला घेऊन जात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
सव्वा तीन वाजता ताफा गेला मात्र प्रसारमाध्यमांना आडवण्यात आलं
मात्र रात्री सव्वा तीनच्या सुमारास रक्सा टोल नाक्यावरुनच एसटीएफचा ताफा दुबेला घेऊन कानपूरच्या दिशेने रवाना झाला. हा ताफा रक्सा टोल नाक्यावर आला तेव्हा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरक्षेच्या दृष्टीने येथील वाहतूक काही काळ थांबवू ठेवण्यात आली होती. झाशी पोलीस रक्सा टोल नाका ते उरई सीमेपर्यंत दुबेच्या ताफ्या सोबत असणार होते. पोलिसांनी दुबेला घेऊन जाणाऱ्या गाड्यांच्या पाठलाग करत असणाऱ्या प्रसारमाध्यमांनाही अडवले.
कानपूरपासून सव्वा तासांवर असताना.
पहाटे सव्वाचारच्या सुमारास एसटीएफचा ताफा उरईमधील एट टोल नाक्यावर दुबेला घेऊन पोहचला. एसटीएफच्या सहा गाड्या या ताफ्यात होत्या. या ठिकाणाहून सव्वा तासाच्या अंतरावर कानपूरची सीमा सुरु होते. कानपूरच्या सीमेजवळील बारा टोल नाक्यावरुन हा ताफा प्रवेश करणार होता.
यमुना पुलावरुन कानपूरमध्ये प्रवेश असल्याने.
झाशी-कानपूर महामार्गावर एसटीएफचा ताफा आटा टोल प्लाजावरुन कालपी यमुना पुलावरुन कानपूरमध्ये प्रवेश करण्यासाठी बारा टोल नाक्यावरुन जाणार असल्याचे निश्चित करण्यात आलं होतं. त्यामुळे आटा आणि कालपी यमुना पुलावरही मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जोरदार पाऊस.
एट टोल प्लाजापासून ४२ किमी अंतरावर असणाऱ्या जालौन जिल्ह्यातील आटा टोल प्लाजावरुन दुबेला घेऊन येणारा ताफा पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी निघाला. एक तासापासून सुरु असणाऱ्या पावसामुळे सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांनाही अडचणींचा सामाना करावा लागला. आटा टोल नाक्यावरुन दुबेला घेऊन जाणारा ताफा निघाल्यावर वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली.
कानपूरमध्ये प्रवेश
जालौन जिल्ह्यातील आटा टोल नाक्यावरुन निघालेल्या या ताफ्याने पहाटे ५ वाजून ३८ मिनिटांनी कालपी येथील यमुना पूल ओलांडून कानपूरच्या सीमेमध्ये प्रवेश केला.
कानपूर नगरमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय
दुबेला घेऊन एसटीएफची टीम आणि पोलीस कानपूरमध्ये पोहचले. सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी एसटीएफचा ताफा दुबेला घेऊन बारा टोल कानपुरमधून कानपूर नगर येथे घेऊन जाण्यासाठी निघाला. पहाटे ६ वाजून ३४ मिनिटांनी देहात सीमेजवळ ताफ्याने कानपूर नगर परिसराच्या सीमेत प्रवेश केला. माती मुख्यायलयापासून दुबेला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येत होते.
गाडीचा अपघात
कानपूर नगरमध्ये प्रवेश केल्यानंतर एसटीएफच्या गाडीतील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडीचा अपघात झाला. गाडीमधील पोलीस कर्मचारी जखमी झाले. याच गाडीमध्ये दुबेही होता. गाडी पलटल्यानंतर दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.
दुबेने पिस्तूल खेचलं अन्.
गाडी पलटल्यानंतर बाहेर येताना दुबेने एका पोलीस कर्मचाऱ्याचे पिस्तूल खेचून पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला थांबवण्यासाठी आणि स्वत:च्या संरक्षणार्थ गोळीबार केला. यामध्ये दुबे गंभीर जखमी झाला.
दुबेला रुग्णालयात नेण्यात आलं पण.
जखमी अवस्थेत दुबेला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला.
दुबेच्या मृत्यूची घोषणा
एसटीएफ आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुबे हा चकमकीमध्ये मारला गेला.
Be First to Comment