Press "Enter" to skip to content

सोनारी येथे पॅनेशिया हॉस्पिटल

कुठलेही पाठबळ नसताना डॉक्टर सुभाष सिंग यांनी उभारलेले कार्य कौतुकास्पद : पॅनेशिया हॉस्पिटल 2.0 च्या उद्घाटन प्रसंगी उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आशिष सिंग पटेल यांनी काढले गौरवोद्गार

सिटी बेल ∆ उरण – सोनारी ∆

सर्वोत्कृष्ट रुग्णसेवेसाठी प्रचलित असणाऱ्या पनवेलच्या डॉ सुभाष सिंग संचलित पॅनेशिया
हॉस्पिटल ने उरण तालुक्यातील सोनारी येथे आपल्या विस्तारित शाखेचा शुभारंभ केला आहे. गुरुवार दिनांक १ जून रोजी उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आशिष सिंग पटेल यांच्या शुभहस्ते सदर रुग्णालयाचे लोकार्पण संपन्न झाले. या शुभप्रसंगी महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्पेशल सिक्युरिटी विभागाचे पोलीस महासंचालक बिपिन कुमार सिंग, माजी आमदार बाळाराम पाटील, सुप्रसिद्ध उद्योगपती तथा शेकाप नेते जे एम म्हात्रे,निवृत्त भा.प्र.से. अशोक सिन्हा,निवृत्त भा.प्र.से.रंजना सिन्हा, सोनारीच्या सरपंच पूनम कडू आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री महोदय आशिष सिंग पटेल यांच्या शुभहस्ते फित कापून रुग्णालयाचे उद्घाटन संपन्न झाले. विधिवत केलेल्या पूजा अर्चेचे तसेच होमहवनाचे दर्शन घेतल्यानंतर मान्यवर व्यासपीठावर विराजमान झाले. आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना माजी आमदार बाळाराम पाटील म्हणाले की, मी डॉक्टर सुभाष सिंग आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो कारण अपघात प्रवण क्षेत्रामध्ये अशाप्रकारे बहुविध सुविधा देणारे इस्पितळ उभारून अपघातग्रस्त रुग्णांच्या गोल्डन आवर मध्ये वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी सोनारी येथील हॉस्पिटल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. मी स्वतः संपूर्ण हॉस्पिटलची इमारत निरीक्षली आहे. अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असे हे हॉस्पिटल योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी रुग्णसेवेत रुजू झाल्याबद्दल समाधान वाटते.

पोलीस महासंचालक बिपिन कुमार सिंग आपल्या मनोगतात म्हणाले की, मी आणि डॉक्टर सुभाष सिंग अशा आमच्या दोघांची मूळ गावे उत्तर प्रदेशात अगदी बाजू बाजूला आहेत. एवढ्या दुरून येऊन गेली जवळपास पावणेतीन दशके येथे रुग्णसेवा देत असताना डॉक्टर सुभाष यांनी येथील जनमानसासोबत आपली नाळ घट्टपणे रुजवली आहे. ही गोष्ट निश्चितच कौतुकास्पद आहे. रुग्णसेवा देत असताना डॉक्टर सुभाष हे सेवाभावी वृत्तीने झोकुन देऊन काम करतात याचा मला अभिमान वाटतो. डॉक्टर बिपिन कुमार सिंग यांनी मनोगत व्यक्त करताना हिंदी आणि मराठी भाषेचा सुंदर मिलाप साधत उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपस्थित असणारे उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आशिष सिंग आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, सगळ्यांना सोबत घेऊन अत्यंत मितभाषी स्वभावाने, सेवाभावी वृत्तीने रुग्णसेवा देणारे डॉक्टर सुभाष सिंग हे एक वेगळे व्यक्तिमत्व आहे. आज या ठिकाणी पॅनेशिया हॉस्पिटलची दुसरी शाखा सुरू होत आहे. अशा अनेक शाखा रुग्णसेवेमध्ये त्यांच्याकडून निर्माण केल्या जावो ही माझी मनोमन सदिच्छा. डॉक्टर सुभाष सिंग यांनी निस्वार्थ वृत्तीने रुग्णसेवा करण्याचे मिशन सुरू केले आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे त्यांचा नावलौकिक त्रिखंडात गाजेल याबाबतीत जराही दुमत नाही.ते एक उत्तम डॉक्टर तर आहेतच पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते उत्तम माणूस आहेत. संघर्षात सुद्धा सक्षम राहत त्यांनी प्रगतीची कास सोडली नाही. अत्यंत खडतर परिस्थितीत देखील रुग्णसेवा हीच केंद्रस्थानी मानून ते आपले कर्तव्य बजावत राहिले. उत्तर प्रदेश आणि बिहार मधील गरीब गरजू बांधवांना रुग्णसेवा देताना त्यांच्याकडून शक्य तितके कमी शुल्क डॉक्टर सुभाष सिंग यांनी आकारावे अशी मी नम्र विनंती करतो. तसेच वर्षातले साडेअकरा महिने त्यांची कर्मभूमी असलेल्या पनवेलमध्ये,उरण मध्ये रुग्णसेवा देऊन किमान पंधरा दिवस त्यांनी आपली जन्मभूमी असलेल्या मिर्झापूर येथील गावी रुग्णसेवा प्रदान करावी अशी इच्छा मी प्रकट करतो.

पॅनेशिया हॉस्पिटलच्या सोनारी येथील विस्तारित शाखेच्या शुभारंभाच्या वेळी डॉक्टर सुभाष सिंग यांना शुभेच्छा देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट च्या विश्वस्त तथा संचालिका नूतन पाटील, जे एन पी टी रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर हिंगोरानी,रोटरी प्रांत ३१३१ चे प्रांतपाल तथा सुप्रसिद्ध डॉ.गिरीष गुणे, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त तथा मराठा समाजाचे कोकण प्रांत अध्यक्ष विनोद चव्हाण,अखिल भारतीय कुणबी समाज च्या मुंबई विभागाचे अध्यक्ष बाबूलाल सिंग, हरीश वर्मा आदी मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली.

मंत्री महोदय आशिष सिंग पटेल म्हणाले की कुठलेही पाठबळ नसताना उत्तर प्रदेशातील एका गावातून येणाऱ्या सुभाष सिंग यांनी ज्या पद्धतीने आपल्या कर्तुत्वाने समाजात स्थान निर्माण केले आहे ते प्रशंसनीय आहे. त्यांचे सुपुत्र डॉक्टर क्रीतेय हे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अस्थिव्यंग शल्यचिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. ज्या पद्धतीने डॉक्टर सुभाष सिंग यांनी नावलौकिक कमाविला आहे त्याच पद्धतीने डॉक्टर क्रितय हे सुद्धा त्यांचा आणि सोनारी येथील पॅनेशिया हॉस्पिटलचा नावलौकिक कमावतील यात जराही शंका नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.