मोफत रक्तगट तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
माजी आमदार स्वर्गीय तुकाराम सुर्वे प्रतिष्ठानच्या वतीने परफेक्ट लॅबरोटरी, कर्जत यांच्या सहकार्याने गौळवाडी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मोफत रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. 129 विद्यार्थ्यांनी रक्तगट तपासणी करून घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या गौळवाडी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मोफत रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगराव राठोड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश सुर्वे, सचिव मनीषा सुर्वे, स्मिता भोईर, दिपाली जाधव, पालक प्रतिनिधी विलास श्रीखंडे, जयवंत मसणे, शरद शेळके, श्रीकिशन बैकरे, रवींद्र माने, स्नेहल जाधव, अमर सावंत आदी उपस्थित होते.
श्रीखंडे यांनी प्रास्ताविक करताना, ‘1960 साली या भागात ही शाळा सुरू झाली. येथे शिकून अनेक उच्चपदस्थ अधिकारी तयार झाले. ग्रामीण भागात शाळा असूनही उच्च दर्जाचे शिक्षण येथे मिळत असते म्हणूनच या शाळेचा शंभर टक्के लागतो. माजी आमदार तुकाराम सुर्वे यांनी कर्जत तालुक्यात खूप विकास कामे केली आहेत. तालुक्यातील जनतेचे आरोग्य निरोगी रहावे असे त्यांचे स्वप्न होते. ते स्वप्न प्रत्यक्ष उतरविण्यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्य सुरु आहे.’ ६असे स्पष्ट केले. मुकेश सुर्वे यांनी, ‘विद्यार्थ्यांसाठी कोणतीही गरज लागल्यास आम्ही त्यासाठी सहकार्य करण्यास तयार आहोत. परीक्षेचे कोणतेही टेन्शन विद्यार्थ्यांनी घेऊ नये. प्रामाणिक पणे अभ्यास केल्यास चांगले गुण मिळू शकतील.’ असे सूचित केले. मुख्यध्यापक राठोड यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अमर सावंत यांनी तर आभार प्रदर्शन शरद शेळके यांनी केले.
याप्रसंगी परफेक्ट लॅबरोटरीच्या रवींद्र माने व स्नेहल जाधव यांनी अकरावी व बारावीच्या 127 विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना कोणता रक्तगट आहे याची लगेचच माहिती दिली.
Be First to Comment