भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा काल वाढदिवस झाला. त्या निमित्ताने सिटी बेल वृत्तसमूहाचे समूह संपादक मंदार मधुकर दोंदे यांनी “माही” वरती लिहिलेला विशेष अग्रलेख.
त्याने प्रवेश केला तेव्हा तो एम एस होता. सम वयस्कांचा माही होता,नंतर तो ज्युनियर लोकांचा माही भाई झाला.आज त्याने खुंटीला बूट टांगलेत पण फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधूनच,कारण तो क्रिकेट तर खेळणार आहे आणि त्याला फक्त बॅटिंग करतानाच नाही तर गेम प्लॅन करताना बघणं ही एक पर्वणी असते.
फार मागे श्रेयस तळपदे चा “इक्बाल” बघितला होता,काल्पनिक चित्रपट असला तरी इक्बाल चा बेवडा कोच एक मस्त लॉजिक शिकवायचा…दिमाग का खेल दीलसे! माही चे गेम प्लॅन्स पाहिल्यावर मात्र हा पठ्ठ्या दिल का खेल दिमाग से…या लॉजिक ने खेळायचा यावर सर्वांचाच विश्वास बसेल.समोरच्याचे कच्चे दुवे हेरायचे की मोठ्यातला मोठा स्टार खेळाडू जाळ्यात सापडतो यावर त्याचा अगम्य विश्वास.फिटनेस फर्स्ट,ट्रस्ट युवर सेल्फ …हे त्याचे घोकायचे गुरुमंत्र.प्रचंड हिम्मत आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्वतःचे स्थान निर्माण केलेला हा खेळाडू म्हणजे सच्या टीम प्लेअर !
सौरव गांगुली ने जर आपल्या टीम ला जिंकायची सवय लावली तर धोनी ने चॅम्पियन बनायची सवय लावली.मिस्टर कुल ही बिरुदावली मिरवत असताना वर वर शांत दिसत असणाऱ्या या खेळाडू च्या डोक्यात मात्र विचारांची वादळे घोंघावत असायची. त्याच्या निवृत्तीवर तातडीने काहीही न लिहिता थोडा अवधी घेऊन लिहीत आहे. तो किती सुंदर खेळायचा, त्याच्यात कशी विजिगीषू वृत्ती होती, त्याने कुठल्या कुठल्या स्पर्धा जिंकून दिल्या, त्याचे विश्वविक्रम काय आहेत यावर बरेच लिहून येईल… मला मात्र या सगळ्यात त्याच्या कणखर आणि खंबीर भूमिकांबद्दल पुन्हा एकदा लिहावेसे वाटते.
मध्यंतरी माझ्या एका कॉर्पोरेट गुरुने मला WIN म्हणजे काय हे शिकवले होते.To win you must know WIN…यातील दुसरा win म्हणजे what’s important now? जिंकण्यासाठी आत्ता या क्षणी काय महत्वाचे आहे हे जाणणे महत्वाचे,नेमक्या याच सिद्धांताने धोनी खेळायचा.पुढच्या पाच ओव्हर चा विचार करायचा,मोठ्या ध्येय्याचे छोटे छोटे तुकडे करत त्यासाठी प्लॅनिंग करायचा.यात सगळ्यांना सोबत घ्यायचा. टीम मधल्या प्रत्येकाची बलस्थाने,कच्चे दुवे यांचा अभ्यास करायचा.त्याचे डोंगराएवढ यश हे या सगळ्याचा परिपाक आहे.
सचिन,सेहवाग,गांगुली,युवराज,द्रविड,लक्ष्मण,कुंबळे हे कितीही मोठे स्टार असले तरी त्यांचा आत्ताचा परफॉर्मन्स महत्वाचा आहे हे निवड समितीला ठणकावून सांगणे नक्कीच कठीण होते. पण याने ते सांगितले.विश्वविक्रम रचले असले तरीही आज तो खेळाडू संघासाठी काय योगदान देतोय? हे प्रत्येक खेळाडूच्या बाबतीत तपासणे तो महत्वाचे समजायचा.वेळप्रसंगी कटुपणा घ्यावा लागला,याने तो आनंदाने घेतला.त्याच्या बाबतीत सुद्धा ही वेळ येणार आहे याचे त्याला भान होते. individual skills पेक्षा collective skills याला तो प्राधान्य द्यायचा.
कुठलेही वलय नाही,मोठ्या शहराचा बडेजाव नाही,पाठीशी गॉड फादर नाही अशात छोट्या शहरातला एक गरीब घरचा तरुण भारतीय क्रिकेट क्षेत्रात अधिराज्य गाजवून गेला …ही खरे तर एक परीकथा वाटावी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीच्या कारकिर्दीचा विचार केल्यास त्याने स्वतःच्या विकेट कीपिंग स्किल्स डेव्हलपमेंट मध्ये जी भरारी घेतली त्याला तोड नाही. यश मिळवणे सोपे असते पण टिकवणे मात्र कठीण. या पठ्ठ्याने यश टिकवले सुद्धा आणि पचवले सुद्धा.
लोकप्रियतेच्या शिखरावर असून सुद्धा त्याचे पाय जमिनीवर असतात. विश्वविक्रमाचे गाठोडे डोक्यावर घेतलेले खेळाडू फिल्डिंग करताना लपवावे लागत असतील असले दिग्गज माझ्या संघात नकोत असे ठणकावून सांगणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला प्रसिद्धीमाध्यमांनी सुद्धा गरम तव्यावर ठेवले होते. निवोदितांना हाताशी घेत भारतीय संघाने भल्याभल्यांना पाणी पाजले तेव्हा हीच माध्यमे त्याचे गोडवे गाऊ लागली होती. खरे सांगायचे तर जेव्हा दिग्गज खेळाडूंना सुट्टीवर वर पाठवून धोनी च्या ताब्यात क किंवा ड दर्जाची टीम दिली गेली तेव्हाच याचा राजकीय बळी दिला जाणार की काय अशी शंका डोकावत होती. टी-ट्वेंटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा तेव्हा नुकताच उदय झाला होता. संकटात सुद्धा संधी शोधणाऱ्या धोनीने या संधीचे अक्षरशः सोने करून दाखवले.
निवृत्ती चे टायमिंग आणि संकल्पना यात सुद्धा त्याने “कुलनेस”जपला. आय पी एल मध्ये तो नक्कीच पाहायला मिळेल तिथे तो कॅप्टन सुद्धा असेल …दिल का खेल दिमाग से…सुद्धा बघायला मिळेल पण त्याच्या अंगावर टीम इंडिया ची निळी जर्सी नसेल….त्याची जागा घेणारे शेकडो आपल्या कडे तयार होतील,नव्हे रांगेत उभे आहेत.लेकीन माही जैसा कोई नही….
Be First to Comment