Press "Enter" to skip to content

कोल्हापूर येथील ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिरा’त रणरागिणी बनण्याचा निर्धार !

कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव जिल्ह्यातील १ हजारहून अधिक युवतींचा सहभाग

कोल्हापूर : प्रतिनिधि

 समाजात रस्त्यावर अथवा अन्य कुठेही होणारी छेडछाड, गुंडांकडून होणारा त्रास यांसह कोणत्याही कठीण प्रसंगांना आत्मविश्‍वासाने तोंड देण्याचा आणि छत्रपती ताराराणींचा आदर्श ठेवत युवतींनी रणरागिणी बनवण्याचा निर्धार केला. हिंदु जनजागृती समिती, सव्यसाची गुरुकुलम् आणि भागीरथी महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिवप्रतापदिनाचे औचित्य साधून ७ डिसेंबर या दिवशी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, कोल्हापूर येथे शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिरात हा निर्धार व्यक्त करण्यात आला. या शिबिरात कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव जिल्ह्यातील एक हजारहून अधिक युवतींनी सहभाग नोंदवला. 

या प्रसंगी विविध कठीण प्रसंगांमध्ये युवती-महिलांनी स्वत:चा बचाव कसा करावा, यांविषयीची बचावांच्या सोप्या पद्धतीची प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली, तसेच कराटे आणि लाठी-काठी यांचेही प्रशिक्षण देऊन तेही त्यांच्याकडून करवून घेण्यात आले. सव्यसाची गुरुकुलम् मधील प्रशिक्षित वीर आणि वीरांगना यांनी दाखवलेल्या युद्धकालीन प्रात्यक्षिकांमुळे नवचैतन्य निर्माण झाले. सहभागी प्रत्येक युवतीला प्रशिस्तपत्रक देण्यात आले.

या शिबिरात ‘आंतरराष्ट्रीय नेमबाज’ तेजस्विनी सावंत, ‘आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर’ स्नेहांकीता वरुटे, ‘आंतरराष्ट्रीय आर्यनमॅन’ सौ. माहेश्‍वरी सरनोबत,  सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, सव्यसाची गुरुकुलम्चे प्रधान आचार्य श्री. लखन जाधव, उद्योजक श्री. नितीन वाडीकर, कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनामधील निर्भया पथकात कार्यरत श्री. बाबासाहेब कोळेकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. प्रारंभी दीपप्रज्वलन झाल्यावर श्री. सुनील घनवट, श्री. नितीन वाडीकर आणि श्री. लखन जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला.

क्षात्रतेजयुक्त आणि युवतींना दिशा देणारे मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन !

स्वरक्षण हा आपला अधिकार असून राष्ट्र प्रथम संकल्पनेसाठी कार्य करा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
स्वसंरक्षण, सामर्थ्य, स्वाभिमान निर्माण करण्यासाठी यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून याचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून तुमचे सामर्थ्य वाढेल. या प्रकारचे शिबिर यापुढील काळात देशभरात आयोजित केले जातील. युवतींनी यापुढील काळात त्यांच्यावर होणार्‍या आघातांसाठी लढायचे आहे, रडायचे नाही याचा ठाम निर्धार करावा. स्वरक्षण हा आपल्या प्रत्येकाचा अधिकार असून राष्ट्र प्रथम या संकल्पनेसाठी कार्य करा.’’

 श्री. लखन जाधव  म्हणाले, ‘‘हे शिबीर महाराणी ताराराणी आणि शक्तीपीठ असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या छत्रछायेखाली होत आहे. नवरात्रात ज्याप्रमाणे देवीने राक्षसांचे निर्दालन केले त्याचप्रमाणे आपणही आपल्यातील शक्ती जागृत करून हिंदु राष्ट्रासाठी कार्य केले पाहजे. आपल्या हातात जे येईल ते शस्र घेऊन, स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे.’’ श्री. नितीन वाडीकर म्हणाले, ‘‘केवळ शरीर सक्षम असून उपयोग नाही, तर मनही सक्षम असणे आवश्यक आहे त्यासाठी या शिबिराची आवश्यकता आहे.’’ 

सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासह भारतात अनेक शूरवीर वीरांगणा होऊन गेल्या आहेत. त्यांचा आदर्श आपण नेहमी ठेवला पाहिजे. स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतांना शारीरिक, मानसिक आणि आत्मबळाच्या स्तरावरही सक्षम व्हायला हवे. त्यासाठी आपल्या कुलदेवतेचा नामजप केला पाहिजे ज्यामुळे आत्मबळ वाढेल. युवतींनी कोणाशीही व्यवहार करतांना सतर्क रहावे. आपला मोबाईल नंबर किंवा हॅण्डसेट अनोळखी व्यक्तींना दिला जाणार नाही, याची काळजी घ्यावी, तसेच युवतींनी त्यांच्या पर्समध्ये सुरक्षिततेसाठी मिरची पूड, पेपर स्प्रेपण ठेवावा.’’निर्भया पथकाचे पोलीस हवालादार बाबासाहेब कोळेकर म्हणाले, ‘‘आज शिकवलेल्या शिबिरातून जर प्रत्येक युवतीने जर स्वरक्षण केले, तर समाजात घडणार्‍या अपप्रवृत्तींना निश्‍चित आळा बसेल ! पोलीस आणि कायदा तुमच्या पाठीशी असून निर्भया पथक २४ तास तुमच्या पाठिशी आहे. आज तुम्हाला जे प्रशिक्षण मिळाले आहे ते तुमचे भाग्य आहे, असे प्रशिक्षण प्रत्येक ठिकाणी होणे आवश्यक आहे.’’

तेजस्वीनी सावंत म्हणाल्या, ‘‘युवतींनो स्वसंरक्षण प्रशिक्षित होऊन स्वत:ला सक्षम बनवा. स्वरक्षण प्रशिक्षाच्या माध्यमातून युवतींचा आत्मविश्‍वास वाढतो आणि नवी ओळख निर्माण होते. प्रशिक्षित झाल्यास आपल्याला संकटांतून निभावून जाण्याचे बळ मिळते. आपण कोणत्याही क्षेत्रात असला, तरी राष्ट्रासाठी, देशासाठी काहीतरी चांगले कार्य करण्याची उम्मेद ठेवा. देशसेवा करता येणे हे अभिमानास्पद आहे. त्यामुळे मातृभूमीसाठी जगा.’’ स्नेहांकिता वरूटे म्हणाल्या, ‘‘युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. समाजाने ‘स्री’चा सन्मान केला पाहिजे. युवतींनो, समाजातील विघातक प्रवृत्तींपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घ्या. प्रशिक्षण म्हणजे कला नसून तो आत्मसंरक्षण आणि आत्मविश्‍वास वाढवणारी व्यवस्था आहे.

शिबिरातातील ठळक घडामोडी
१. शिबिरस्थळी ठेवण्यात आलेल्या ‘सेल्फी पॉईंट’द्वारे अनेक युवतींनी सेल्फी घेत लढण्याचा निर्धार केला.

२. यापुढील काळात ‘आम्ही अबला नाही, तर रणरागिणी बनू’, अशी प्रतिज्ञा प्रत्येक युवतीने घेतली.

३. पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या गडकरी सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांची माहिती देणारे क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शनही लावण्यात आले होते. येथे सव्यासाची गुरुकुलम वतीने ऐतिहासिक, दुर्मिळ शिवकालीन शस्रास्रांचे विशेष प्रदर्शन येथे लावण्यात होते. हे प्रदर्शन पाहून अनेकांनी जाज्वल्य इतिहासाचे स्मरण झाले असे सांगितले.

४. या शिबिरात हुबळी ते कोल्हापूर २३० किलोमीटर अंतर सायकलवरून पार करणारी आणि ‘ गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मिळवणारी कु. शौर्या शिंदे हिचा सद् गुरु स्वाती खाडये यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

उपस्थित मान्यवर – भाजपच्या वंदना बंबलवाड, वैद्या अश्विनी माळकर, पोलीस मित्र अर्चना गुरव, उद्योजक श्री. जयंतीलाल पटेल, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, हिंदू जागरणचे धर्मप्रचारक श्री. सनी पेनकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु महासभेचे श्री. विकास जाधव आणि श्री. प्रशांत पाटील, श्री. अमर जाधव, हिंदू एकता आंदोलनाचे शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव काशीद, मराठा तितुका मेळवावाचे श्री. योगेश केरकर, ‘इस्कॉन’चे श्री. दीपक खोत

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.