
खोपोली : प्रतिनिधी
“चार भिंतीत अडकलेलं बालपण आणि मोबाईलच्या स्क्रीनवर चालणारे आभासी खेळ ही आजच्या पिढीसाठी धोक्याची घंटा आहे. मोबाइल गेमच्या व्यसनामुळे मुले एकलकोंडी, तणावग्रस्त होत आहेत. हे चक्र थांबवायचे असेल तर मैदानच त्यांची ‘लाइफलाइन’ ठरली पाहिजे,” असा वास्तववादी संदेश खोपोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांनी दिला. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या भव्य उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त आलेल्या पाहुण्यांचे दमदार स्वागत, विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन, खेळाडूंची प्रात्यक्षिके, ध्वजारोहण, ज्योत प्रज्वलन, मैदान पूजन अशा माध्यमातून जोशपूर्ण सुरुवात झाली. मंडळाच्या जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जनता विद्यालय प्राथमिक व पूर्वप्राथमिक शाळा, बी.एल. पाटील तंत्रनिकेतन के.एम.सी. कॉलेज, शिशुमंदिर गगनगिरी इंटरनॅशनल स्कूल या सर्व शाखांच्या एकत्रित क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. मैदानावर विद्यार्थ्यांची आणि क्रीडा प्रेमींची खूप मोठी उपस्थिती होती.
या वेळी मंचावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल आणि पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, संचालक दिनेश गुरव, दिलीप पोरवाल, भास्कर लांडगे, विजय चुरी, प्राचार्य के.एम. गोरे, प्रशांत माने, वर्षा घारे,डॉ. गौरव तिवारी, मुख्याध्यापिका जान्सी आँगस्टीन, समिक्षा ढोके,तसेच शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी स्पष्ट शब्दांत पालकांना इशारा दिला “शिक्षणाच्या स्पर्धेत पाल्यांना आपण मैदानापासून दूर खेचतो आणि त्यांची पावलं मोबाईल गेमकडे वळतात. मोबाईल स्क्रीनवरील विजय खरा नसतो, पण त्यातून निर्माण होणारा ताण मात्र खरा असतो! पालकांनी मुलांना मैदानावर खेळायला प्रोत्साहन देणं हीच खरी गुंतवणूक आहे.” त्यांनी मंडळाने साधारण कुटुंबातील मुलांसाठी दर्जेदार व परवडणारे शिक्षण उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष कौतुक केले.
उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांनी “खेळ विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाला धार लावतो. टीमवर्कची जाणीव, शिस्त, आत्मविश्वास, खिलाडू वृत्ती आणि पराभव स्वीकारण्याची ताकद हे गुण फक्त मैदानावरच शिकता येतात. इथूनच अधिकारी, नेते आणि सजग नागरिक घडतात.” असे प्रतिपादन करत मंडळाने ‘शिक्षणाची पंढरी’ उभारल्याबद्दल त्यांनी अध्यक्ष संतोष जंगम आणि संचालक मंडळाचे मनापासून कौतुक केले.
क्रीडा महोत्सवाचे प्रास्ताविक : प्राचार्य के.एम. गोरे यांनी, तर
पाहुण्यांचा परिचय डॉ. गौरव तिवारी आणि अमित विचारे यांनी केला. सूत्र संचालन डॉ. जयंत माने यांनी केले.




Be First to Comment