एन. डी. स्टुडिओत रंगणार महाराष्ट्राच्या महान परंपरेचा महाउत्सव
सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •
चौक येथील एन. डी. स्टुडिओच्या सुमारे ४७ एकरच्या विशाल प्रांगणात दिनांक २८, २९, ३० एप्रिल २०२२ आणि १ मे २०२२ या चार दिवसात हा महोत्सव होणार असुन महामेळा, महाकला, महाखेळ, महासंस्कृती, महास्वाद, महाव्यवसाय आणि महागौरव असे महाराष्ट्राच्या महान परंपरेचे सप्तरंगी इंद्रधनुष्य महाराष्ट्रात अवतरणार आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन घडवणारे, मराठ्यांची गौरवगाथा, मायमराठी लोककला उत्सव, महालावणी उत्सव, बॉलीवुड घराणा, फ्युजन वाद्यसंगीत अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल होणार असुन “महामेळा” अंतर्गत राज्याच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन तसेच विक्री होणार असुन राज्यभरातुन शेकडो छोटे व्यावसायिक आणि दुकानदार यांनी नोंदणी केली आहे.
“महाकला” उपक्रमाद्वारे राज्यातल्या विविध लोककलांचे मनोहारी दर्शन घडणार असुन गोंधळ, जागरण, भारुड, आदिवासी कला, धनगरी नृत्य, मर्दानी कला यांचे दर्शन घडवण्यासाठी १०० हून अधिक पारंपारिक कलावंत या महोत्सवात सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार, छायाचित्रकार यांच्या कलाकृतींची दालने तसेच ललित कलेची प्रात्यक्षिके आणि कार्यशाळा देखील महाउत्सवाचे वैशिष्ट्य आहे.
“महाखेळ” अंतर्गत महाराष्ट्राची कुस्ती आणि कबड्डीचे स्पर्धात्मक सामने होणार असुन त्यातही १०० हुन अधिक क्रीडापटु आपलं कौशल्य पणाला लावणार आहेत.
“महासंस्कृती” द्वारे महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारे पारंपारिक व्यवसाय, बारा बलुतेदार, कारागिर यांचे दर्शन घडणार आहे.
“महास्वाद” अंतर्गत राज्यभरातल्या वैविध्यपुर्ण रुचकर पदार्थांवर खवय्यांना ताव देखील मारता येणार आहे.
“महाव्यवसाय” अंतर्गत राज्यातले विविध व्यावसायिक एकत्र येणार असुन उद्योगांपुढचे प्रश्न, आगामी काळातल्या जागतिक संधी, प्रतिमा संवर्धन, ‘ब्रँडिंग’ अशा विविध विषयांवर विचारमंथन आणि तरुण पिढीला मार्गदर्शक ठरतील अशी चर्चासत्रे, परिसंवाद होणार आहे.
“महागौरव” उपक्रमांतर्गत राज्यातल्या विविध क्षेत्रातल्या गुणवंतांचा गौरव होणार आहे. एन.डी. स्टुडिओतल्या रायगड दरबार, शिवनेरी, रॉयल पॅलेस, लाल किल्ला, तसचं मुंबईची खाऊ गल्ली, चोर बाजार मार्केट अशा उभारलेल्या आकर्षक सेटसवर तसेच विविध पुरस्कार सोहळ्याचे आयोजन होणाऱ्या मेगा फ्लोअर, टॅलेंट हंट फ्लोअर आणि भव्य खुल्या रंगमंचावर होणारे सांस्कृतिक कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहेत.
या “महाउत्सवा”तल्या महामंचावर चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके, गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि रमेश देव यांना समर्पित विशेष कार्यक्रम तसेच महाराष्ट्राचे “महाराजे” छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित महानाट्याचा समावेश आहे.
या महोत्सवात काही विश्वविक्रम घडणार असुन त्यामध्ये पाच हजार शालेय विद्यार्थी रुबिक्स क्युब सोडवुन शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा साकारणार आहेत. एक नवे महाराष्ट्र गीत देखील या वेळी रसिकांना अर्पण केले जाणार आहे. महाराष्ट्राच्या महान परंपरेचा आम्ही मांडलेल्या या “महाजागरा” मध्ये केवळ मराठीच नव्हे तर महाराष्ट्र कर्मभूमी असलेल्या, महाराष्ट्र समजून घेण्याची इच्छा असलेल्या सर्व भाषिक, सर्व प्रांतीयांनी सहभागी व्हावं. अशी विनंती “एन.डी. फिल्म वर्ल्ड” तर्फे आयोजक नितीन चंद्रकांत देसाई यांनी केली आहे.
Be First to Comment