महाविकास आघाडीच्या महामोर्चात नेत्यांनी साधला आमदार बालदी आणि ठाकुर कुटूंबावर निशाणा
सिटी बेल • पनवेल •
अनियंत्रित इंधन दरवाढ, स्वयंपाकाच्या गॅसचे गगनाला भिडलेले दर,केंद्र सरकारच्या कणाहीन अर्थविषयक धोरणामुळे निर्माण झालेला महागाईचा भस्मासुर आणि वाढत चाललेला बेरोजगारीचा दर या सगळ्यामुळे त्रस्त झालेल्या जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी बुधवार दिनांक १३ एप्रिल रोजी पनवेल उरण महा विकास आघाडीच्या वतीने महा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. रणरणत्या उन्हात देखील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

राधा कृष्ण कार्पोरेट पार्क समोरील मोकळ्या भूखंडावर शेतकरी कामगार पक्ष,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना आणि समाजवादी पार्टी चे कार्यकर्ते जमले.तेथून महामोर्चाला प्रारंभ झाला. एस टी स्टँड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पथावरून हुतात्मा हिरवे गुरुजी चौकातून मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला.त्या ठिकाणी महाराजांना अभिवादन करून पुढे टपाल नाक्यावरून महानगरपालिका कार्यालयासमोरून मोर्चा उप विभागीय कार्यालयावर थडकला.

नेते मंडळींच्या तोफा धडाडल्यावर शिष्टमंडळाने मोर्चाचे निवेदन सुपूर्द केले.केंद्र सरकारने लादलेल्या महागाईविरोधात दुचाकी आणि सिलेंडर च्या प्रातिनिधिक कलेवरावर लिंबू मिरचीचा हार यावेळी चढविण्यात आला. महा विकास आघाडीतील नेत्यांनी मोर्चा चे नियोजन महागाईविरोधात केले असले तरी सुद्धा भाषणाचा रोष हा भाजपा चे लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्यावरच होता. हे सगळेच “चोर” असल्याच्या घोषणा मोर्चात देखील दिल्या गेल्या.थोडक्यात काय तर महागाई विरोधाच्या मोर्चात बालदि आणि ठाकूर कुटूंबावर निशाणा साधण्याची संधी पनवेल-उरण महा विकास आघाडीतील नेत्यांनी साधली.
महागाई आणि पनवेल उरण च्या भाजप नेत्यांवर तोंडसुख या व्यतिरिक्त केंद्रीय सरकार तपास यंत्रणांचा करत असलेला गैरवापर, दुहेरी करा वर लागणारी शास्ती, महापालिका हद्दीतील पाण्याचे दुर्भिक्ष, सत्ताधारी नगरसेवकांचा सिडको ऑफिस वर पाण्यासाठी मोर्चा स्टंट अशा विषयांवर देखील महा विकास आघाडीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठविली होती.

पनवेल उरण महा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवसेना सल्लागार बबन पाटील, कोकण शिक्षक मतदार संघाचे महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणारे आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा आघाडीचे उद्योजक जे एम म्हात्रे, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तसेच इंटक चे राष्ट्रीय सचिव महेंद्रशेठ घरत, शिवसेना जिल्हाध्यक्ष शिरिष घरात, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, शेकापचे पनवेल शहर जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक गणेश कडू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील, शेकाप पनवेल शहर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा अनुराधा ठोकळ, नगरसेवक सतीश पाटील, काँग्रेस पक्षाचे पनवेल शहर जिल्हा सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड, रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमराज मात्रे, पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, जी आर पाटील, शंकर शेठ म्हात्रे, समाजवादी पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल नाईक, पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र पाटील, शेकापचे तालुका चिटणीस राजेश केणी यांच्यासह पाचही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी घरोघरी गेले पाहिजे आणि भाजपा करत असलेली पापं त्यांना सांगितले पाहिजे. आज तुम्ही कुठल्याही नाक्यावर जा 50 पैकी 45 लोक भाजपाला शिव्या देणारी आढळतात. अहो पूर्वी आपण गाडीच्या टाक्या फुल करायचो, हल्ली पन्नास आणि शंभर रुपयांचे पेट्रोल टाकायची पाळी आली आहे. मोदी महाशय वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याच्या बाता मारत होते, आज करोडो उन्नी लोक बेरोजगार झाले आहेत. भाजपाने महागाईचा भस्मासुर उभा करण्याचे पाप केल आहे. हा भस्मासुर भाजपा ला जाळल्या शिवाय शांत बसणार नाही. यांना लाथा घालून सत्तेतून हाकलण्यासाठी महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सज्ज राहिले पाहिजे.
महेंद्र घरत
रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष
काही काळ मोर्चात अग्रणी झाल्यानंतर मी मुद्दाम मोर्चाच्या शेवटी आलो. मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांचे प्रमाण पाहता हा मोर्चा 101% यशस्वी झाला आहे असे मला अभिमानाने सांगावेसे वाटते. महा विकास आघाडीचे नेते महा विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक ते तीनही घटक एकत्र आल्यामुळे केंद्र सरकार विरोधात असणारा रोष याठिकाणी अधोरेखीत होतो. महा विकास आघाडीने कोरूना कालखंडात देखील उत्तम कामगिरी करून दाखविली आहे. परंतु आता आपापसातील हेवेदावे विसरून एकत्र येत भाजपाच्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे.
– आमदार बाळाराम पाटील.
महाविकास आघाडीच्या तमाम नेतेमंडळींच्या मांदियाळीत काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष आर सी घरत यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. आर सी घरत हे जिल्हा परिषद गटनिहाय आणि महानगरपालिका विभागातील प्रत्येक बैठकांना हजर होते. पत्रकार परिषदेला देखील उपस्थित होते. परंतु मुंबई मध्ये अत्यंत तातडीचे काम आल्यामुळे त्यांना तिथे जावे लागले असे स्पष्टीकरण पनवेल-उरण महा विकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी दिले. पत्रकार मंडळींना उद्देशून ते मिश्किलपणे म्हणाले की तुम्ही सगळेजण उद्या चौकट कराल हे मला माहीत आहे म्हणून मी मुद्दाम तुमच्यासमोर हे जाहीर केले. पण सिटी बेल सुद्धा “पुष्पा” अटीट्युड बाळगून आहे. त्यामुळे झुकेगा नाही साला असे म्हणत चौकट केलीच !
















Be First to Comment