सुनेच्या दोन्ही किडण्या निकामी ; सासऱ्याने किडणी दान करत ठेवला समाजापुढे आदर्श
सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •
२०११ साली स्नेहा सागर ठाकुर यांचे लग्न होवुन जसखार गावातुन धुतुम गावात ठाकुर कुटुंबियांची सुन म्हणुन आल्या. परंतु स्नेहा ठाकुर च्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यानंतर आपल्या जीवाची पर्वा न करता ६३ वर्षीय स्नेहाचे सासरे प्रभाकर ठाकुर ह्यानी सुन स्नेहा ठाकुर हिला आपली एक किडनी देऊन आयुष्य दिलं आहे.
उरण तालुक्यात धुतुम गावात ३५ वर्षीय स्नेहा सागर ठाकुर यांनी आपल्या आयुष्यात दुसऱ्यांदा बाप पाहिलाय. स्नेहा ला तीचे सासरे प्रभाकर ठाकुर ह्यानी किडनी देऊन जीवनदान दिले आहे. सासरा आणि सुनेच्या नात्याने समाजाला एक नवा आदर्श दिला आहे. ही हृदयस्पर्शी कथा आहे अपोलो हॉस्पिटलमधील. जिथे एक देवारूपात आलेले सासरे प्रभाकर ठाकुर ह्यानी आपल्या आजारी सुनेसाठी किडनी दान देऊन एक आदर्श ठेवला आहे.
रक्तगट विसंगत असतानाही डॉ रविंद्र निकालजे व डॉ अमोल कुमार पाटिल ह्यांच्या मार्गदर्शना खाली किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्न स्नेहा ठाकुर हिच्यावर गेल्या ८ महिन्या पासून डायलिसिस उपचार चालू होते. तिच्या या स्थितीमध्ये तिची मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली पाहिजे असे निदान रविंद्र निकालजे (मूत्रपिंड तज्ञ) यांनी केले. कठीण परिस्थितीत, स्नेहा ठाकुर हिचे सासरे प्रभाकर ठाकुर यांनी सुनेला मूत्रपिंड दान करण्याचा एक धाडसी आणि कौतुकास्पद निर्णय घेतला.
आपण अजूनही अशा समाजात रहातो जिथे आजही लग्नात हुंडा घेण्याची परंपरा अस्तित्वात आहे. परंतु एका सासऱ्यांनी सिद्ध केले की सर्व संबंध रक्ताच्या नात्यांनी बांधलेले नसतात आणि त्यांनी एक पाऊल पुढे येऊन आपल्या सुनेला मूत्रपिंड दान केले.हाच आदेश समाजात रूढ झाला तर सासू सून आणि सून सासरे हे नाते अधिक दृढ होईल.प्रभाकर ठाकूर यांनी किडनी दान करत सामाजिक आदर्शचा पाठ समाजासमोर ठेवला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Be First to Comment