Press "Enter" to skip to content

प्रदुषणाचे खापर फक्त आमच्या माथी का ?

धुळीच्या प्रदूषणाला केवळ दगडखाण क्रशर कारणीभूत नाहीत : सुनील धनाजीशेठ भोईर

श्री कान्होबा दगड खाण आणि क्रशर चालक मालक सामाजिक संस्थेच्या अध्यक्षांनी मांडली रोखठोक भूमिका

पहा काय म्हणतात सुनील भोईर 👇

सिटी बेल • पनवेल •

पनवेल उरण जुन्या रस्त्यावर ओवळे ते जासई या पट्ट्यामध्ये अनेक दगड खाणी व त्यातून निघणाऱ्या दगडांना फोडण्यासाठी क्रशर कार्यरत असतात.गेल्या दोन ते तीन दिवसात अचानक पणे या दगड खाणी आणि क्रशर यांतून निघणाऱ्या धुळीमुळे नागरिक त्रस्त झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या.याबाबत श्री कान्होबा दगड खाण आणि क्रशर चालक मालक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनील धनाजी शेठ भोईर यांनी आपली भूमिका प्रसिद्धी माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे.

अधिक माहिती देताना सुनील भोईर म्हणाले की, या परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले की त्याचे खापर दगडखाण मालक आणि क्रशर मालक यांच्या माथ्यावर फोडून मोकळे होण्याचा जणू काही एक रिवाजच पडला आहे. वस्तुस्थिती कुणीही लक्षात घेत नाही याचा खेद वाटतो. मुळात गेल्या काही दिवसांपासून विमानतळाच्या कामास जोरदार सुरुवात झाली आहे. होणारे धुळीचे प्रदूषण हे मुख्यत्वाने नवी मुंबई विमानतळाच्या कामामुळे होत आहे. परंतु काही वृत्त संस्था हेतुपुरस्सरपणे त्या कामाकडे डोळेझाक करतात आणि काही विशेष हेतू मनात ठेवून केवळ दगड खाण मालक आणि क्रशर मालक यांना टार्गेट करत असतात.

सुनील भोईर यांनी येथील प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमिपुत्र असणाऱ्या दगडखाण मालक आणि चालक यांच्या पाठीमागचा इतिहास विशद केला. ते म्हणाले की येथील प्रकल्पग्रस्तांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी लोकनेते माजी खासदार दिवंगत दि बा पाटील यांनी जीव तोडून मेहनत केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या 1984च्या आंदोलनाला रक्तरंजित किनार देखील लाभली आहे. त्यामध्ये आमच्या पाच भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त बांधवांना हकनाक जीव गमवावा लागला होता. अखेरीस प्रशासनाला प्रकल्पग्रस्त बांधवांच्या समोर झुकावे लागले आणि त्या वेळी स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकनेते दि बा पाटील यांनी प्रकल्पग्रस्त उत्कर्षासाठी एक उत्कृष्ट त्रिसूत्री मनवून घेतली होती. ती म्हणजे भूमिपुत्रांना संपादित केलेल्या जमिनीच्या साडेबारा टक्के विकसित भूखंड परतावा देणे. प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरी हक्क प्राप्त करून देणे. आणि आणि तिसरे सूत्र म्हणजे दगडखाण यांसारख्या नैसर्गिक स्त्रोत मार्गांतून प्रकल्पग्रस्त बांधवांना उदरनिर्वाहाचे व्यवसाय साधन प्राप्त करून देणे. त्यामुळे आमच्या व्यवसायाला नियमबाह्य म्हणणाऱ्या मंडळींना मी एवढेच निक्षून सांगतो की हे व्यवसाय आम्ही आमच्या प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र म्हणून मिळालेल्या हक्काच्या माध्यमातून करत आहोत.

सुनील भोईर पुढे म्हणाले की, या संघटनेचे मी गेली आठ वर्षे नेतृत्व करत आहे. आम्ही सातत्याने दर महिन्याला सदस्यांची बैठक घेतो. त्यामध्ये प्रदूषण रोधक तत्वांचे बाबत त्यांना अवगत करतो. तसेच वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यासाठी प्रेरित करून त्या स्वरूपाचे कार्यक्रम सातत्याने घेत असतो.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.