नवी मुंबईला मुंबई शहराशी जोडणारी महागडी वाॅटर टॅक्सी प्रवाशांच्या आवाक्याबाहेर
सिटी बेल • नवी मुंबई • घनश्याम कडू •
दिवसांपूर्वी नवी मुंबईला मुंबई शहराशी जोडणार्या वॉटर टॅक्सी सेवेला मोठ्या धूमधडाक्यात सुरुवात झाली असली तरी, या प्रवासाचे असलेले दर पाहता ही वॉटर टॅक्सी सेवा सर्वसामान्यांपासून दूरच राहणार असल्याचे चित्र आहे.
अनेक जण मोठ्या उत्साहाने या वॉटर टॅक्सी सेवेचा लाभ घेण्यासाठी बेलापूर जेट्टीवर येत आहेत, मात्र येथील प्रवासीभाडे ऐकून त्यांचा हिरमोड होत असून ते माघारी परतत आहेत. त्यामुळे ही वॉटर टॅक्सी सेवा सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांसाठी नसल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. ती मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात यावी, यासाठी प्रवासभाडे कमी करावे, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी प्रवासी सुविधेला 17 फेब्रुवारी रोजी सुरुवात करण्यात आली. त्यामुळे मुंबईतून थेट नवी मुंबईला जाण्यासाठी जलवाहतुकीची सेवा उपलब्ध झाली आहे. बेलापूर जेट्टीवरून सुटणारी ही वॉटर टॅक्सी भाऊचा धक्का आणि एलिफन्टा या दोन मार्गांवर जाणार आहे. ही वॉटर टॅक्सीसेवेचे बुकिंग ऑनलाइन पद्धतीने करावयाचे आहे. सध्या तरी ऑनलाइन बुकिंगची सुविधा ’माय बोट राइड’वर उपलब्ध आहे. मात्र बेलापूर ते भाऊचा धक्का यासाठी 1200 रुपये आणि घारापुरीसाठी 660 रुपये तिकीटभाडे आहे. बेलापूर ते मुंबई मासिक पास तर 12 हजार रुपयांचा आहे. त्यामुळे हे प्रवासभाडे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचेच आहे.
या जलमार्गाने भाऊच्या धक्क्यापर्यंत 30 ते 35 मिनिटांत पोहोचता येते. तर, घारापुरी बेटावर केवळ 15 मिनिटांत पोहोचता येते. त्यामुळे ही सुविधा वेळेच्या दृष्टीने सोयीची असली तरी जलप्रवासासाठी इच्छुक असणार्यांचा अवाजवी तिकीटदरामुळे हिरमोड होत आहे.
…तर तिकीटदरही कमी होतील
या संदर्भात मेरिटाइम बोर्डाच्या संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी सध्या काही मोजक्या स्वरूपात ही सेवा सुरू असल्याचे सांगितले. तीन-चार आठवड्यांनंतर लोकांचा प्रतिसाद वाढला की फेर्या वाढतील. तसेच, आणखी काही ऑपरेटर उपलब्ध होण्याची शक्यताही आहे. त्यामुळे प्रवासी बोटीही वाढतील आणि कालांतराने तिकीटदर कमी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Be First to Comment