काँग्रेसने जे देशासाठी कमावलं ते तुम्ही विकताय : महेंद्र घरत यांची भाजपवर टीका
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसवर टीका केल्याने राज्यभर काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यामुळे अलिबाग शहरातील भाजपच्या कार्यालयासमोर काँग्रेसने निदर्शने केली. यावेळी काँग्रेसने ७० वर्ष काय केलं असे पंतप्रधान मोदी विचारतात मात्र काँग्रेसने जे ७० वर्षात कमावलं ते मोदी साहेब तुम्ही विकताय अशी जळजळीत टीका काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरातील भाजप कार्यालयाच्या समोर जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष घरत म्हणाले कि, राज्यात कोविडची लाट असताना गेले २ वर्ष हे संकट निवारण्यासाठी राज्य सरकार झटत होत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे संकट व्यवस्थित हाताळलं, गोरगरीब, वंचित, मजूर यांना प्रत्येक घटकाला साथ देत अन्नदान करण्याचं काम केलं. अनेक रुग्णलय अद्यावत करत काहींची नव्याने निर्मिती करत सामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम केलं त्यांच्यावर जर लांछनास्पद आरोप केले जात असतील तर आरोप करणार्यांना त्यांची लाज वाटली पाहिजे.
अशांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज काँग्रेस कार्यकर्ते जमले आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध विविध घोषणाबाजी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. काँग्रेसवर आरोप करणाऱ्या मोदींचा धिक्कार असो, मोदी ‘तेरी तानशाही नाही चलेगी, मोदी सरकार हाय हाय अशा घोषणा देण्यात आल्या. तर काँग्रेसला संपवणारे अनेक आले मात्र ते संपले पण काँग्रेस काही संपली नाही. देशाचे गृहमंत्री हे तडीपार होते. या लोकांनी विकासाच्या केवळ भूलथापा दिल्या आणि जनतेला हे सत्य आता उलगडत आहे.
आता पंजाब हरियाणा आदी निवडणुकांमध्ये भाजपच्या नेत्यांना लोक फिरकू देत नाहीत त्यामुळे त्यांना माघारी फिरावं लागत आहे. तेव्हा २०२४ मध्ये भाजपला जनता सत्तेतून पायउतार करेल असे टीकास्त्र सोडतानाच यापुढे असे बेताल वक्तव्य कराल तर भाजपच्या लोकांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा गंभीर इशारा महेंद्र घरत यांनी यावेळी दिला.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, काँग्रेस रायगड जिल्हा महिला अध्यक्ष श्रद्धा ठाकूर, जेष्ठ नेते जे. टी.पाटील, रायगड जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी, तालुकाध्यक्ष योगेश मगर, हर्षल पाटील यांसह मोठ्या प्रमाणात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Be First to Comment