कापडे खुर्दचे चिंतामणी बावळेकर…बाप रे बाप ! बावीस मुलांचे बाप !
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
तालुक्यातील खुशमिजाज व्यक्तीमत्व असलेल्या चिंतामणी रामचंद्र बावळेकर यांना पंधरा वर्षांपूर्वी राज्यातील सर्वच वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिध्दी दिली होती ती ते तब्बल 22 मुलांचे बाप असल्याने आणि आता तर चिंतोबांनी वयाची शंभरी पार करताना त्यांचा परिवारदेखील मुलं, जावई, सुना, नातवंडं आणि पंतवंडांसह दीडशेपर्यंत वाढल्याने या व्यक्तीमत्वाची चर्चा तालुक्यात सर्वत्र होत आहे.
साधारणपणे 15 वर्षांपूर्वी पोलादपूर तालुक्यातील कापडे खुर्द येथील चिंतामणी रामचंद्र बावळेकर हे 82 वर्षे वयाचे उमदे हसतमुख व्यक्तीमत्व तालुक्यात प्रसिध्द आहे ते तब्बल बावीस मुलांचे बाप म्हणून… अशी बातमी नवाकाळसह राज्यातील प्रमुख अग्रगण्य दैनिकांनी प्रसिध्द केली होती. चिंतामणी बावळेकरांच्या 22 मुलांपैकी पाच जण या ना त्या कारणाने दगावली तरी दोन बायकांसह सात मुली आणि दहा मुले अद्याप हयात आहेत असताना चिंतामणी बावळेकरांचा परिवार प्रपंच वाढत राहिला. पंतवंडं अन् नातवंडं अगदी घरभर आणि या सर्व प्रपंचाची ख्याती साऱ्या तालुकाभर. त्यांच्या तरण्याबांड ऐटीत चालण्याच्या शैलीमुळे त्यांच्या पाठीमागे त्यांच्या या अजब कर्तृत्वाची कुजबूज सुरू असते. याही पलिकडे चक्क वाघाशी झुंज घेऊन त्याला ठार मारल्यानंतर बावळेकरांची पोलादपूरपर्यंत काढलेली मिरवणूक पोलीस ठाण्यात आल्यानंतर कशी धिंड ठरली, याच्या खुमासदार कथा तालुक्यात नेहमीच चर्चेच्या ठरल्या आहेत.

प्रस्तुत प्रतिनिधीला चिंतामणी बावळेकर हे साधारणत: 15 वर्षांपुर्वी पोलादपूर तहसिल कचेरीजवळ भेटले असता त्यांनी आपल्या पुरूषार्थाची दखल वृत्तपत्रांनी घेतली नसल्याची खंत व्यक्त केली आणि प्रतिनिधीने दखल ठरविले आणि बावळेकरांनी प्रसन्न मुद्रेत छायाचित्र काढण्यासाठी तयारी दर्शविली.
चिंतामणी रामचंद्र बावळेकरांनी शेती व्यवसायात उदरनिर्वाह करताना खुपच अडीअडचणी येतात. त्यांना सामोरे जाताना संसार वाढत गेला आणि अडचणींना सरावलो. बावळेकरांच्या दोन्ही बायका एकमेकींच्या सख्ख्या बहिणी. एकीचे नांव भागाबाई तर दुसरीचे चंद्राबाई. भागाबाई गरोदर असताना पाहुणी आलेली विवाहित मेहुणी चंद्राबाई हिचे पती नोकरीनिमित्त तिच्यापासून दूर राहात असत. तिला मूलबाळ नव्हते. बावळेकरांनी तिलाही पत्नीप्रमाणे नांदविले आणि संसार दुहेरी वाढू लागला. दोन्ही बायका सख्ख्या बहिणी असल्यामुळे वाद झाला नाही. दोघींनाही नांदविण्यास बावळेकर सक्षम असल्याने संसारवेलीवर जणू एकामागून एक असा मुलांचा बहरच आला. कधी भागाबाई तर कधी चंद्राबाई अशी बाळ-बाळंतीणीची चढाओढ सुरू झाली.
भागाबाईला विठोबा, लक्ष्मण, सुमन, सखुबाई, सुशिला, सखाराम, पांडुरंग तर चंद्राबाईला दत्ता, अशोक, चंद्रकांत, राजू, चंद्रु, तुकाराम, हौसी, मंदा, वासंती, आणि नंदा अशा सतरा अपत्यांचे पिता चिंतामणी झाले. पाच मुले बाळंतपणानंतर काही महिन्यांत दगावली पण बावळेकरांचे घरच बालदरबार असल्याने निवर्तलेल्या मुलाचे दु:ख करण्यास फुरसत नसे.
पावसाळी शेती करणारे चिंतामणी बावळेकर हिवाळी-उन्हाळी इतर जोडधंदे करीत. एकदा त्यांच्यासमोर एक ढाण्या वाघ उभा ठाकला आणि चिंतामणींनी त्याच्यासोबत झुंज देत त्याला अक्षरश लोळवित यमसदनी धाडले. कापडे आड, पायटे परिसरात बावळेकरांचे नांव आधीच पुरूषार्थाने गाजले होते. त्यात ढाण्या वाघाला लोळविण्याचा पराक्रम पाहून ग्रामस्थांनी त्या वाघाच्या मृत शरीरासह कापडयापासून पोलादपूर पोलीस ठाण्यापर्यंत बावळेकरांची वाजत गाजत मिरवणूक काढली. काोलीस ठाण्यात आल्यावर वाघ मारणे हा गुन्हा असल्याचे समजले आणि बावळेकरांची मिरवणूक धिंड ठरली. ठाणे अंमलदारांनी शिव्यांची लाखोली वाहिली. सत्कार होईल असे गावकऱ्यांना वाटले होते आणि हा प्रकार झाल्याने बावीस मुलांच्या बापाचा वाघ मारण्याचा पराक्रमही खुसखुशीत चर्चेचा विषय झाला.
चिंतामणी बावळेकरांना स्वत:च्या मोठया कुटूंबाची गुजराण करण्यासाठी कापडे बुद्रुकहून पायटयापर्यंत खांद्यावरून तांदळाची गोण न थांबता नेण्याची पैज जिंकताना लहानग्यांचे भुकेलेले चेहरे नजरेसमोरून हटत नव्हते, हे सांगताना बावळेकरांच्या सुरकुतलेल्या पापण्यांचा कडा काहीशा ओलावल्या.
कुटूंबनियोजनाबद्दलचे गैरसमज आजही त्यांच्या मनात भिती निर्माण करून असल्याचे जाणवते. कुटूंबकल्याणाचा प्रसार खेडोपाडी न झाल्याने एवढया मुलांचा बाप व्हावे लागले. मात्र, पुढे खुपच ओढाताण सुरू झाली.

चिंतामणी बावळेकर कुटूंबाची चिंता वाहताना जरी चेहऱ्यावर हास्य आणत असले तरी बावीस मुलांचा बाप होण्याच्या या पराक्रमाची कोणीतरी दखल घेईल, नांव होईल, कोणी पैसा देईल, ही आशा अद्याप पूर्ण होत नसल्याची खंतही चिंतामणी बावळेकर यांना सतावतेय. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड असो वा गिनीज बुक कोठेतरी आपली दखल घेतली जाईल,या अपेक्षेने बावळेकरांनी आपल्या सहाफूटी देहाला सुहास्यवदन मुद्रेत कॅमेऱ्यासमोर आणले.
पोलादपूर तालुक्यातील सर्वात जास्त चर्चेतील कुटूंब आणि व्यक्तीमत्व असलेल्या चिंतोबांचे वय आता शंभरीपार चालले असून पंतवंडं, नातवंड आणि मुलं, मुली, जावई, सुना असा परिवार तब्बल दीडशतकी झाला आहे. पोटासाठी राजकीय पक्षांमधून फिरलेले चिंतोबा अलिकडे भगव्या शालीमध्ये काळा गॉगल लावून त्याच रूबाबात आपल्या मोठया परिवारामध्ये रमलेले दिसून येतात. 2021 वर्ष सरताना चिंतोबांच्या एका नातीचे लग्न लागले त्यावेळी चिंतोबांनी सहकुटूंब सहपरिवार फोटो काढून खुशमिजाज व्यक्तीमत्व कायम असल्याची जाणीव करून दिली.



















Be First to Comment