Press "Enter" to skip to content

भोंदू बाबांचा पर्दाफाश !

भगतगिरी करणाऱ्यांची झाली पळापळ, एक जण थेट नाशिकला पळाला, तर दुसरा पुण्याला !

बालसई येथे मामा-भाचे मिळून करतात भगतगिरी, अंधश्रद्धेने गुरफटलेल्या लोकांची होतेय लुटमार!

गुरूवारी पुन्हा भगतगिरीचा दरबार भरण्याची शक्यता

सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे |

नागोठणे परिसरातील बालसई येथे भगतगिरी-बुवाबाजीचे प्रकार घडत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारची भिती दाखवून भगतगिरी द्वारे त्यांची संकटातून सुटका करण्याचे आमीष दाखवून भोंदू बाबांनी त्यांची आर्थिक लुबाडणूक सुरू ठेवल्याचे उघडकीस आलेले आहे. येथे लोकांचा अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्याकडून ५०० रूपये घेतले जातात आणि एखाद्या समस्येवर भगतगिरीद्वारे तोडगा काढण्यासाठी ५ ते १० हजार आणि एखादा ‘श्रीमंत बकरा’ सापडल्यास ५० हजारांची मागणी करून लोकांची लुबाडणूक केली जात आहे.

बालसई येथे दोन ठिकाणी भगतगिरीचे चाळे सुरू आहेत. एक मामा आणि दुसरा भाचा अशा दोघांनी हे माकडचाळे सुरू ठेवलेले आहेत! प्रसारमाध्यमांनी याविरूद्ध आवाज उठविल्यानंतर येथील भोंदू बुवांची चांगलीच पळापळ उडाली. यांतील एक जण तर थेट नाशिकला पळाला, तर दुसरा पुण्यात जाऊन थांबल्याची माहिती हाती आली आहे.

हा भगतगिरीचा धंदा इथे पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली असून येत्या गुरूवारी येथील बंगल्यात पुन्हा भगतगिरीचा दरबार भरणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण जर इथे पुन्हा भगतगिरी सुरू झाली तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते यांच्यावर झडप घालणार असल्याने या भगतांची वरात येथून निघेल, यात शंकाच नाही !

एक गंमतीचा विषय म्हणजे दुसऱ्यांचे भविष्य सांगणाऱ्यांना स्वतःचेच भविष्य पाहता येत नाही. कारण या भोंदू बाबांवर पळापळ होण्याची वेळ येईल हे त्यांनाच कसे कळले नाही ? त्यामुळे यांच्याकडे कोणताही चमत्कार नाही हे सिद्ध झालेय.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.