Press "Enter" to skip to content

७ ऑक्‍टोबर २०२१ पासून शिर्डीचे श्री साईबाबा समाधी मंदिर खुले

साईंचे दार भक्तांसाठी होणार खुले : वाचा काय आहेत नवे नियम

सिटी बेल | शिर्डी | सुनिल ठाकूर |

राज्‍य शासनाने दिनांक ०७ ऑक्‍टोबर २०२१ पासून महाराष्‍ट्रातील सर्व धार्म‍िकस्‍थळे खुले करण्‍याचे आदेश दिलेले आहेत. त्‍यानुसार श्री साईबाबा समाधी मंदिरात दररोज १५ हजार साईभक्‍तांना दर्शनाचा लाभ दिला जाणार असून १० वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया, ६५ वर्षावरील व आजारी व्‍यक्‍ती तसेच मास्‍क न वापरणा-या साईभक्‍तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही अशी माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्‍यश्री बानायत यांनी दिली.

श्रीमती बानायत म्‍हणाल्‍या, जगभरात, देश व राज्‍यात आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून दिनांक ०५ एप्रिल २०२१ पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले होते. दिनांक २४ सप्‍टेंबर २०२१ रोजी राज्‍य शासनाने दिनांक ०७ ऑक्‍टोबर २०२१ पासून घट स्‍थापनाच्‍या मुहुर्तावर महाराष्‍ट्रातील सर्व धार्म‍िकस्‍थळे खुले करण्‍याचे आदेश दिलेले आहेत.

दिनांक ०७ ऑक्‍टोबर २०२१ रोजीच्‍या काकड आरतीनंतर समाधी मंदिर दर्शनाकरीता खुले करण्‍यात येणार असून सकाळी ०६.०० ते रात्रौ १०.०० यावेळेत मंदिर खुले राहणार असून दिवसभरात १५ हजार भाविकांना दर्शनाकरीता प्रवेश दिला जाईल. यापैकी १० हजार ऑनलाईन पास (०५ हजार सशुल्‍क व ०५ हजार निशुल्‍क), व ०५ हजार निशुल्‍क व सशुल्‍क ऑफलाईन पासेस असतील. प्रत्‍येक तासाला ११५० साईभक्‍तांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. साईभक्‍तांना दर्शनाकरीता online.sai.org.in या संकेतस्‍थळावर ऑनलाईन दर्शन पासेची बुकींग करावी लागेल. तसेच जे साईभक्‍त शिर्डी येथे येतील अशा साईभक्‍तांना ऑफलाईन दर्शन पासेस बुकींग करावी लागेल. या ऑफलाईन दर्शन पासेस बुकींग करीता संस्‍थानच्‍या सर्व निवासस्‍थान येथे काऊंटरची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहेत.

सकाळी ०५.०० ते रात्रौ १०.०० यावेळेत संस्‍थानचे साईआश्रम ०१, श्री साईबाबा भक्‍तनिवास्‍थान (५०० रुम), व्‍दारावती भक्‍तनिवासस्‍थान, श्रीराम पार्कींग, साई कॉम्‍प्‍लेक्‍स व शिर्डी बसस्‍थानक येथील दर्शन पास काऊंटर वरुन दिले जातील. तसेच प्रत्‍येक आरतीकरीता एकुण ८० साईभक्‍तांना आरतीसाठी प्रवेश देण्‍यात येईल. त्‍यापैकी प्रत्‍येक आरतीस प्रथम येणा-या शिर्डी ग्रामस्‍थांना १० पासेस देण्‍यात येतील. ग्रामस्‍थांना १० आरतीपासेस हे साईउद्यान निवासस्‍थान येथुन तर दर्शनाचे पासेस मारुती मंदिराशेजारील १६ गुंठे शताब्‍दी मं‍डप येथील काऊंटरवर दिले जाणार असून ग्रामस्‍थांना मतदान ओळखपत्र व आधारकार्ड शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच ऑनलाईनव्‍दारे २० आरती पासेस, महत्‍वाचे व अतिम‍हत्‍वाचे मान्‍यवर आणि देणगीदार साईभक्‍तांकरीता ५० आरती पासेस दिले जातील.

सशुल्‍क दर्शन पासेस गेट नंबर ०१ शेजारील दर्शनरांगेतील पास वितरण काऊंटरवरुन दिले जातील. सर्व साईभक्‍तांनी दर्शनाकरीता जाताना मास्‍कचा वापर करावा व सामाजिक अंतराचे (०६ फुट अंतर ठेवुन आखणी करणेत आलेले मार्कींग प्रमाणे) पालन करावे. मास्‍कचा वापर न करण्‍या-या साईभक्‍तांना तसेच १० वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया, ६५ वर्षावरील व्‍यक्‍ती व आजारी व्‍यक्‍तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय मंदिरात फुलं, हार व इतर पूजेचे साहित्‍य नेण्‍यास मनाई आहे. तसेच गर्दी टाळण्‍याकरीता सुरुवातीचे काही दिवस दर गुरुवारची नित्‍याची पालखी बंद राहील. याबरोबरच मंदिरातील साई सत्‍यव्रत पुजा, अभिषेक पुजा, ध्‍यान मंदिर व पारायण हॉल बंद राहतील.

दर्शनासाठी भाविकांना गेट नंबर ०२ मधुन प्रवेश दिला जाणार असून व्‍दारकामाई मंदिरातून समाधी मंदिरामधुन दर्शन घेऊन गुरुस्‍थान मंदिर मार्गे ०४ व ०५ नंबर गेटव्‍दारे बाहेर पाठविले जाईल. दर्शनरांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग व पाय धुण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे. तसेच ज्‍या साईभक्‍तांना ताप असेल अशा साईभक्‍तांना तात्‍काळ उपचाराकामी कोवीड केअर हॉस्पिटलमध्‍ये तपासणी व उपचारासाठी दाखल करण्‍यात येईल. तसेच मंदिर व मंदिर परिसरात धुम्रपान करणे, थुंकणेस बंदी आहे. त्‍याचे उल्‍लंघन करणा-यावर दंडात्‍मक कार्यवाही करण्‍यात येईल असे श्रीमती बानायत यांनी सांगितले.

ज्‍या साईभक्‍तांचे दर्शनाकरीता ऑनलाईन बुकींग निश्चित झालेली असेल अशाच साईभक्‍तांनी शिर्डी येथे दर्शनाकरीता यावे अन्‍यथा गैरसोय होऊ शकते. याबरोबरच जे साईभक्‍त आजारी आहेत अशा साईभक्‍तांनी दर्शनाकरीता येऊ नये. दर्शन पासेस वरील नमुद वेळे प्रमाणेच (स्‍लॉट नुसार) भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार असून नमुद वेळेचे १५ मिनीटे अगोदर प्रवेशव्‍दारावर उपस्थित रहावे. तसेच सर्व साईभक्‍तांनी व ग्रामस्‍थांनी संस्‍थानला सहकार्य करावे, असे आवाहन ही श्रीमती बानायत यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.