अति शीघ्र पावतो शंकरदेव भोळा
धरलेत जर तुम्ही सोमवार सोळा
देवांचा देव महादेव जितका क्रोधी तितकाच दयाळू , हा सर्वात लवकर प्रसन्न होतो म्हणून भोळेनाथ,आणि क्रोधीत होतो तेव्हा महाकाल बनतो.सोळा सोमवारांपैकी श्रावणातले चार सोमवार शंकराला अतीप्रिय आहेत ,तर चला पाहूया या सोळा सोमवारांची महती .
अहो ऐकलं का ! हा श्रावणातील शेवटचा सोमवार आहे, पुढील सोमवारी मला शिवमंदिरात सोळा सोमवारांच उद्यापन करायचंय विसरू नका .
मीः अरे हो, मना सारखा पती मिळावा म्हणून तू केलेले सोळा सोमवाराचे व्रत ना ?
तीः अहो असं काहीच नाही, मी पुत्रप्राप्ती आणि त्याच्या उदंड आयुष्याच्यासाठी व्रत केले
मीः काहीतरीच काय! माझ्या माहितीनुसार हे व्रत सुयोग्य वरप्राप्तीसाठी करतात ,कारण शंकराची पहिली पत्नी दक्ष प्रजापतीची मुलगी सती ही आपल्या बापाकडुन पतीच्या अपमानाने क्रोधीत होऊन यज्ञामध्ये स्वतःला भस्म करून घेते,पण जाताना विष्णू कडून शिवाच्या चरणी जन्मोजन्मी जागा मिळावी हा वर घेऊन जाते .
दुसऱ्या जन्मी ती हिमालयात पर्वतनरेश ह्यांची मुलगी होते म्हणून पार्वती .
ती उपवर झाल्यावर नारद तिच्या पित्याला सांगतात पार्वती सर्व गुण संपन्न आहे हीला शोभेल असा एकच पती देवाधी देव महादेव ,पण त्यांना मिळविण्यासाठी घोर तपश्चर्या करावी लागेल ,पार्वतीने निश्चय करून ३०००वर्ष तपश्चर्या करून महादेवाला प्राप्त केले ,तो कालावधी श्रावणातला होता ,म्हणून महादेवाला श्रावणातले सोमवार अतिप्रिय आहेत ,तसेच देवीच्या विनंतीने मानवाला हे व्रत सुलभ करता यावेत म्हणून सोळा सोमवार केले तरी चालतील असे वरदान दिले
सौः खरं आहे तुमचं पण माझ्या मते हे व्रत फक्त एकाच इच्छेसाठी नाही करत तर अनेक इच्छेने करतात तर ऐका ,
अमरावती नगरांत एक महादेवाचं देऊळ होत. एक दिवस शिवपार्वती फिरता फिरता त्या देवळात आली. करमणूक म्हणून दोघे सारीपाट खेळू लागली, “डाव कोणी जिंकला?” म्हणून पार्वतीनं पुजाऱ्या ला विचारलं. त्यानं शंकराचं नाव सांगितलं. पार्वतीला राग आला. पुजाऱ्याला “तूं कोडी होशील” म्हणून शाप दिला. तशा त्याला असह्य वेदना होऊं लागल्या. एकदा स्वर्गातल्या अप्सरा देवळात आल्या. त्यांनी पुजारी कोडी पाहिला. त्याला कारण विचारलं . पुजाऱ्यानं शाप सांगितला. त्या म्हणाल्या, “भिऊं नको. घाबरू नको. तूं सोळा सोमवारांचं व्रत कर, म्हणजे तुझं कोड जाईल.” पुजारी म्हणाला, “तें व्रत कसं करावं?” अप्सरांनी सांगितलं, “सारा दिवस उपवास करावा. संध्याकाळी आंघोळ करावी. शंकराची पूजा करावी. नंतर अर्धा शेर कणीक घेऊन त्यांत तूप गूळ घालावा व तें खावं. मीठ त्या दिवशी खाऊं नये. त्याप्रमाणं सोळा सोमवार करावे. सतरावे सोमवारी पांच शेर कणीक घ्यावी, त्यांत तूप गूळ घालून चूर्मा करावा. तो देवळीं न्यावा. भक्तीनं शंकराची षोडशोपचारें पूजा करावी. नंतर चूर्म्याचा नैवेद्य दाखवावा. पुढं त्याचे तीन भाग करावे. एक भाग देवाला द्यावा, दुसरा भाग देउळीं ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा, तिसरा भाग आपण घरी घेऊन जाऊन सहकुटुंबी भोजन करावं.” असं सांगून त्या नाहीशा झाल्या. पुढं पुजाऱ्यानं ते व्रत केलं, पुजारी चांगला झाला.
काही दिवसांनी शंकरपार्वती पुन्हां त्या देउळात आलीं. पार्वतीनं पुजाऱ्याला कुष्ठरहित पाहिलं. तिनं विचारलं, “तुझं कोड कशानं गेलं?” त्याने सांगितलं, “मी सोळा सोमवारांचं व्रत केलं, त्यानं माझं कोड गेलं.” पार्वतीला आश्चर्य वाटलं. तिनं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिकस्वामी परत यावा म्हणून हें व्रत केलं. समाप्तीनंतर कार्तिक-स्वामी लागलीच येऊन भेटला. दोघांना आनंद झाला. त्यानं आईला विचारलं, ” आई, मी तर तुझ्यावर रागावून गेलो होतो, आणि मला पुन्हां तुझ्या भेटीची इच्छा झाली, याचं कारण काय?” पार्वतीनं त्याला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. पुढें कार्तिकस्वामीनं तें व्रत केलं.
त्याचा एक ब्राह्मण मित्र फार दिवस देशांतराला गेला होता त्याची व ह्याची सहज रस्त्यात भेट झाली. पुढे कार्तिकस्वामीनं हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं. त्यानं लग्नाचा हेतु मनांत धरला. मनोभावे सोळा सोमवारांचं व्रत केलं. समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला. फिरता फिरता एका नगरात आला. तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते. लग्नाची वेळ झाली होती , राजानं हत्तिणीच्या सोंडेत माळ दिली. हत्तीण ज्याच्या गळ्यांत माळ घालील, त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता. तिथं आपला हा ब्राह्मण ती मौज पहायला गेला होता. पुढं कर्मधर्मसंयोगानं ती माळ हत्तिणीनं ह्याच ब्राह्मणाच्या गळ्यांत घातली, तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली. दोघांचं लग्न लावलं .
दोघं नवराबायको एके दिवशी खोलीत बसली होती, तसं बायकोनं नवर्याला विचारलं, “कोणत्या पुण्यानं मी आपणांस प्राप्त झालें?” त्यानं तिला सोळा सोमवारांच्या व्रताचा महिमा सांगितला. तीने त्या व्रताची प्रचीति पाहण्याकरितां पुत्रप्राप्तीचा हेतु मनात धरला व तें व्रत करूं लागली. तसा तिला सुंदर मुलगा झाला. तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं की, “मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालों?” तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला. त्यानं राज्यप्राप्तीची इच्छा मनांत धरली. तो व्रत करू लागला व देशपर्यटनाला निघाला. इकडे काय चमत्कार झाला? फिरता फिरता तो एका नगरांत गेला. त्या राजाला मुलगा नव्हता. एक मुलगी मात्र होती. तेव्हां कोणीतरी एखादा सुंदर व गुणवान नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी, व राज्यही त्यालाच द्यावं, असा त्यानं विचार केला. अनायासं त्या पुत्राची गांठ पडली. राजानं त्याला पाहिलं तोच राजचिन्हं त्याच्या दृष्टीस पडलीं. राजानं त्याला आपल्या घरी आणलं, कन्यादान केलं व त्याला आपल्या गादीवर बसवलं.
इतकं होतं आहे तों त्या ब्राह्मणाचा सतरावा सोमवार आला. ब्राह्मणपुत्र देऊळी गेला. घरीं बायकोला निरोप पाठविला की, पांच शेर कणकीचा चुर्मा पाठवून दे. राणीनं आपला थोरपणा मनांत आणला. चुर्म्याला लोक हसतील, म्हणून एका तबकांत पांचशें रुपये भरून ते पाठवून दिले. चुर्मा वेळेवर आला नाहीं, व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला. त्याने राजाला दृष्टांतदिला. तो काय दिला? राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील. दारिद्र्यानं पिडशील. असा शाप दिला. ही गोष्ट राजानं प्रधानाला सांगितली. तो म्हणाला, महाराज, “राज्य हें तिच्या बापाचं. आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील, याकरितां असं करणं अयोग्य आहे. राजा म्हणाला, ईश्वराचा दृष्टान्त, अमान्य करणं हेंही अयोग्य आहे. ” मग उभयतांनी विचार केला. तिला नगरांतून हाकलून लावलं.
पुढं ती दीन झाली, रस्त्यानं जाऊं लागली. जातां जातां एका नगरात गेली. तिथल्या एका म्हातारीने तिला आश्रय दिला. खाऊंपिऊं घातलं. एके दिवशीं म्हातारीनं तिला चिवटं विकायला पाठवलं. दैवाची गति विचित्र आहे! बाजारांत ती चालली. मोठा वारा आला, सर्व चिवटं उडून गेलीं. तिनं घरीं येऊन म्हातारीला सांगितलं. तिनं तिला घरातून हांकलून लावलं. तिथून निघाली तो एका तेल्याच्या घरी गेली. तिथं तेलाच्या घागरी भरल्या होत्या. त्यांवर तिची नजर गेली. तसं त्यांतलं सगळं तेल नाहीसं झालं. म्हणून तेल्यानं तिला घालवून दिलं. पुढं तिथून निघाली. वाटेनं जाऊ लागली. जातां जातां एक नदी लागली. नदीला पाणी पुष्कळ होतं. पण तिची दृष्टि गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं. थोडया अंतरावरपुढं एक सुंदर तळं लागलं पण तिची दृष्टि जाताच पाण्यांत किडे पडून पाणी नासून गेलं. रोजच्यासारखे तळ्यावर गुराखी आले. घाण पाणी पाहून मागे परतले. गुरंढोरं तान्हेली राहिली. एक गोसावी आला. त्यानं तिला पाहिलं. कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली. तिनं सगळी हकीकत सांगितली. गोसाव्यानं तिला धर्मकन्या मानलं व आपले घरी घेऊन आला. तिथं राहून ती कामधंदा करू लागली. ज्यांत तिची दृष्टि जाई त्यांत किडे पडावे, कांही जिनसा आपोआप नाहीशा व्हाव्या, असा चमत्कार होऊ लागला. मग गोसाव्यानं विचार केला, अंतदृष्टि लावली. तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आहे असं त्यानं जाणलं. तें नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टि चांगली होणार नाहीं हे त्यांच्या लक्षात आले. गोसाव्यानं राणीसाठी शंकराची प्रार्थना केली. तिला सोळा सोमवारांचं व्रत करायला सांगून देव अंतर्धान पावले. पुढं सोळा सोमवारांचं व्रत केल्यामुळे परमेश्वराचा कोप नाहींसा झाला.
तिच्या नवर्याला तिच्या भेटीची ओढ लागली. दूत चोहीकडे शोधासाठी पाठवले. शोधता शोधता तिथं आले. गोसाव्याच्या मठात राणीला पाहिलं. राजाला जाऊन सांगितलं. त्याला मोठा आनंद झाला. राजा प्रधानासह गोसाव्याकडे आला. गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला. वस्त्रप्रावर्ण देऊन संतोषित केलं. गोसावी म्हणाला, राजन ही माझी धर्मकन्या. मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतली होती, ती तुझी स्त्री आपले घरी घेऊन जा, व चांगल्या रीतीनं पाणिग्रहण करून सुखानं नांद.” राजानं होय म्हटलं. गोसाव्याला जोड्यानं नमस्कार केला व राणीला घेऊन आपल्या नगरी आला. पुढं मोठा उत्सव केला. दानदक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले. राजाराणी आनंदानं राज्य करूं लागलीं.
मीः खरचं आपण ऐकू तितक्या पुराणातील कथा कमीच आहेत. मी अस ऐकलंय महादेवाला एक पुत्री सुद्धा आहे
सौः अहो काही तरीच काय बोलता
शिवपार्वतीना दोन मुले गणेश आणि कार्तिकेय .
इतक्यात आई आली
आईः अरे काय वाद चाललाय तुमचा ? सर्व ऐकून घेतल्यानंतर आई म्हणाली,” तुम्हा दोघांचेही बरोबर आहे”. पण पुराणात अजून चार मुले आणि एक मुलीचा उल्लेख आहे ,ती असा की, पार्वतीने अंगावर लावलेल्या चंदन मिश्रित उटण्यापासुन झाला गणेश.
दुसरा कार्तिकेय हा सहा गर्भातून जन्मला.
तिसरा सुकेश हा राक्षस विद्युतकेश व त्याची व्यभिचारी पत्नी सालकटंकटा यांनी फेकलेला अनाथ मुलगा .
चौथा जालंधर पतीव्रता वृंदाचा (तुळशीचा) पती ,जेव्हा शिवाने आपले तेज समुद्रजलात फेकले तेव्हा उत्पन्न झाला तोच असूर शिवपुत्र जालंधर.
पाचवा विष्णूच्या मोहिनी रुपावर भाळुन शंकरांना झाला तो अय्यपा.
सहावा शिवाच्या अंगातून दाह (घाम) निघाला त्याचे तीन थेंब भूमीवर पडले त्यातून जन्मला तो भूमा आणि तशीच एक मुलगी ही झाली ती अशोकसुंदरी
मीः मग आई शंकराची उत्पत्ती कसी झाली ?
आईः बाबानो देव एकच आहे ,त्याचेच सर्व अंश आहेत.
देवी दुर्गा (अष्टांगदेवी)आणि शिवस्वरुप ब्रह्मा यांच्या योगाने त्रिमुर्तीची निर्मिती झाली ब्रम्ह -उत्पत्ती ,विष्णू -पालण आणि शंकर -संहार ही कार्य दिली ,ब्रह्म म्हणजे कालसदाशिव यांना पाच मुखे आहेत
एक आकार (अ)
दोन उकार (उ)
तीन मकार(म)
चार बिंदू (.)
पाच नाद (शब्द ) याच अक्षरातून ओम तयार होतोय आणि हाच मूलमंत्र आहे
काशीखंडात अशीच एक कधा आहे ,अमरपुर नगरात एक शिवभक्त सावकार होता ,पुत्रप्राप्तीसाठी त्याने खूप व्रत -उपवास केले पण मूलबाळ होईना ,पार्वतीच्या अती आग्रहाने शंकराने त्यास फक्त सोळा वर्ष आयुष्य असणारा मुलगा होण्याचा वर दिला. पुढे त्या सावकाराला मुलगा झाला त्याचे नाव अमर ठेवले, अमरला पंधराव्या वर्षी आपला मामा दिपचंद सोबत वाराणशी येथे शिक्षणासाठी पाठविले .अमर आणि दिपचंद रात्री जेथे मुक्काम करत तेथे यज्ञ करत, असेच एका नगरात पोहचतात ,त्या नगरातील राजकुरीला पाहण्यासाठी मुलगा येणार असतो ,पण तो मुलगा डोळ्यांनी काणा असल्यामुळे वरपित्याला लग्न मोडण्याचे भय असते ,अमरला पाहून त्याला एक युक्ती सुचते ,दिपचंदला पैशाचे मोह देऊन अमरला काण्या मुलाच्या जागी बसवून लग्न लावण्तात येते ,नंतर मुलगा बदलणार असतो,पण अमर लग्नाच्या वेळी नवरी चंद्रिकेच्या पदरावर लिहून जातो “माझं लग्न तुझ्याशी झालंय पण आता मला बदलून काण्या मुलासोबत तुला जावे लागेल ,मी विद्येसाठी वाराणसीला जात आहे .चंद्रिकेने हे आपल्या पित्याला सांगितले ,राजाने मुलीची पाठवणी न करता काण्या मुलासोबत बापाला हाकलून लावले.
इकडे अमर वाराणसीला एक यज्ञ करताना मूर्छित होऊन पडला आणि गतप्राण झाला,मामा दिपचंदला याची कल्पना नव्हती तो जोरजोराने विलाप करू लागला ,त्याच वेळी शंकर-पार्वती त्याच रस्त्याने जात होते ,पार्वती महादेवाला म्हणाली “देवा काहीही करा पण ह्याला जिवंत करा अन् हा विलाप थांबवा मला सहन होत नाही ,
देव म्हणाले अगं याचं आयुष्यच इतकं आहे पण देवी मानली नाही , शेवटी देवानं अमरला जिवंत केलं .
विद्याभ्यास पूर्ण केल्यावर अमर आपल्या नगरी निघाला रस्त्यात त्याला चंद्रिकेचे नगर लागले ,तिच्या वडिलांनी त्याला ओळखून खुप धन-संपत्ती सोबत मुलीची पाठवणी केली.
इकडे अमरच्या आई-वडिलांनी स्वतःला अन्न पाण्यावाचून कोंडुन घेतलं होतं ,आता सोळा वर्ष पूर्ण झाली होती, मुलगा परत आला नाही तर आपणही जीव देऊ पण मुलासोबत सून म्हणून चंद्रिकेला पाहून आनंदी झाली ,मग त्यांनी सर्वांनी मिळून महादेवाची मनोभावे पुजा केली ,आणि खूप वर्ष सुखाने राज्य केले.
हे शंकराचे व्रत शीघ्र फलदायी आहे, असे सांगितले जाते. श्रद्धाळू लोक हे व्रत, सौख्य-संपत्ती मिळविण्यासाठी, दु:ख-दारिद्र्य रोगराई जाण्यासाठी, मनीची कोणतीही सदिच्छा पूर्ण होण्यासाठी करतात.
व्रत करणाऱ्या स्त्री वा पुरुषाने व्रताच्या दिवशी मनाने व शरीराने शुद्ध व स्वच्छ असावे .
व्रताची सुरुवात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करतात. त्यानंतर पुढील प्रत्येक सोमवारी व्रत करणेचालू ठेवतात. १६ सोमवार व्रत केल्यावर येणाऱ्या १७व्या सोमवारी व्रताचे उद्यापन करतात. १७व्या सोमवारी उद्यापन करणे जमले नाही तर पुढे कोणत्याही महिन्यातल्या सोमवारी व्रताचे उद्यापन करता येते.
व्रत करणारा दिवसभर उपास करतो. ज्याला उपास जमत नाही त्याने शिरा, खीर कींवा गहू, गूळ व तूप मिळून तयार केलेले पदार्थ खाल्ले तरी चालते.
व्रत करणारा संध्याकाळी आंघोळ करून शंकराच्या मूर्तीची किंवा चित्राची बेलाच्या पानांसह पंचमोपचार पूजा करतो व सोळा सोमवार कथा.”(कहाणी) किंवा ‘सोळा सोमवार माहात्म्य ‘ ही पोथी वाचतो. नंतर ‘शिवस्तुती’ म्हणून आरती करतो. त्यानंतर कणकेच्या चूरम्याचा प्रसाद वाटतात. ह्याच गोष्टी लागोपाठच्या सोळा सोमवारी करतात.
अजय शिवकर
केळवणे पनवेल
७९७७९५०४६४











Be First to Comment