आपले आयुष्य घडविण्यात शिक्षकांचे योगदान महत्वाचे : अनिल घेरडीकर
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
आपले आयुष्य घडविण्यात शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे, शिक्षकांनी कोरोना महामारीत आदिवासी वाड्या -पाड्यातील मुलांना शिक्षणाचे धडे दिले,अश्या शिक्षकांना कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले ही कौतुकास्पद बाब आहे असे प्रतिपादन कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांनी केले.
कोरोना महामारीत ऑन लाईन शिक्षण सुरू होते, मात्र कर्जत तालुक्यातील आदिवासी दुर्गम वाड्यातील मुलांकडे मोबाईल नसल्याने ते शिक्षणा पासून वंचित होते, अश्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून तालुक्यातील काही शिक्षकांनी आदिवासी वाड्या-पाड्यावर जाऊन मुलांना शिकवले अश्या शिक्षकांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून कर्जत मधील इनरव्हील क्लबच्यावतीने शिक्षकांचा गौरव समारंभ रॉयल गार्डनच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर, कर्जत पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की उपस्थित होत्या. इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा करुणा पराडकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

पाहुण्यांची ओळख सेक्रेटरी मोनिका बडेकर यांनी करून दिली. कर्जत तालुक्यातील शिक्षक,शिक्षिका, अंगणवाडी सेविका अश्या 21 जणांना कोरोना योद्धा म्हणून व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी आपल्या आयुष्यातील शिक्षकांचे महत्व काय असते ते सांगितले. सूत्रसंचालन शिल्पा दगडे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष उत्तरा वैद्य यांनी मानले.

याप्रसंगी माजी अध्यक्षा प्राची चौडीए, अवंतिका गायकर, आरती भोईर,ज्योत्स्ना शिंदे,वनिता सोनी, साक्षी अडसुळे, शीला गुप्ता, सुप्रिया गिरी, सरस्वती चौधरी, दिपा देशमुख, भाग्यश्री शेळके, वैशाली दांडेकर, जयश्री जोशी आदी सदस्या उपस्थित होत्या.













Be First to Comment