Press "Enter" to skip to content

नागोठण्यातील “त्या” सर्व नागरिकांचे आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह

निधन झालेले पत्रकार नवीनचंद्र सोष्टे यांना डेल्टा प्लसची लागण झाल्याचे निष्पन्न : संपर्कातील ३० जणांची केली आरटीपीसीआर चाचणी

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार २२ जुलैला मृत झालेले नागोठण्यातील ज्येष्ठ पत्रकार नवीनचंद्र सोष्टे यांना डेल्टा प्लसची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर सोष्टे यांच्या जवळच्या संपर्कातील सुमारे ३० जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. या सर्वांचे चाचणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून सर्व ३० जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


रायगड जिल्ह्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचे प्रमाण कमी झालेले आहे. जिल्ह्यातील करोना रुग्णांची तपासणी करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा, पुणे यांनी दि.११ ऑगस्ट, २०२१ रोजी दिलेल्या अहवालानुसार दोन रुग्णांना डेल्टा प्लस विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले होते.

डेल्टा प्लस ची लागण व त्यातून बऱ्या झालेल्या तसेच मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार उरण तालुक्यातील श्रीमती करुणा उदय म्हात्रे (वय ४४) यांची दि. ५ जुलै, २०२१ रोजी आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणताही धोका नाही.

नागोठण्यातील ज्येष्ठ पत्रकार नवीनचंद्र नारायण सोष्टे (वय ६७) यांना अशक्तपणा, ताप व खोकला ही लक्षणे होती. दि. ५ जुलै २०२१ रोजी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्यांची दि. १५ जुलै, २०२१ रोजी आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. सर्वोतोपरी उपचारानंतरही त्यांचे २२ जुलै ला निधन झाले होते.

जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूचा शिरकाव झाला असला तरी यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनी घाबरुन न जाता कोविड-१९ संदर्भात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून नये, कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तात्काळ आरोग्य विभागाकडे संपर्क साधावा, जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात वारंवार स्वच्छ धुणे या बाबींचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर मोरे यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.