सुखाची सावली
माझे माझे हे घरकुल
नाही चिरेबंदी वाडा
मायेने लिंपल्या भिंती
येतो झुळझुळ वारा
माझे माझे हे घरकुल
घर आहे चंद्रमौळी
माजघरात सुखाची
नित्य फुलते दिवाळी
माझे माझे हे घरकुल
आहे समुद्राची गाज
बने केतकीची दाट
गर्द हिरवा सुरु साज
माझे माझे हे घरकुल
घरी येतात पाहुणे
“अतिथी देवो भव”
नाही आतिथ्याला उणे
माझे माझे हे घरकुल
सडा रांगोळी दारात
हंबरे गाय वासरू
जणू गोकुळ गोठ्यात
माझे माझे हे घरकुल
शांती सुखाची सावली
पाहे सर्वांची वाटुली
होऊन मायेची माऊली
सुजाता खरे, नवीन पनवेल







Be First to Comment