आमची विजय यात्रा निघेल किंवा अंत्ययात्रा निघेल
— उपोषणकर्त्यांचा ठाम निर्धार
सिटी बेल ∆ पनवेल ∆
पनवेल तालुक्यात २३ गावांमध्ये येऊ घातलेल्या नैना प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. नैना प्रकल्प पनवेल तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण पुकारले आहे. या आमरण उपोषणाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. ६ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या उपोषणादरम्यान मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या वेळी अनिल नामदेव ढवळे, दमयंती नामदेव भगत, जयराम धोंडू कडू, मधुकर महादेव पाटील, समीर पांडुरंग पारधी, रवींद्र विठ्ठल गायकर हे ६ जण आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यानंतर पुढे अनेक शेतकरी यात सहभागी होणार आहेत.
नैना प्रकल्प बाधित शेतक-यांचा नैना विरोधी सूर कायम आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मानगुटावर नैना नावाची मोठी राक्षसीण बसली असून तिचा नाश करायचा असून तिला तालुक्यातून हद्दपार करायची आहे, असा ठाम विश्वास व्यक्त करत हे शेतकरी बांधव उपोषण करत आहेत.
नैनाच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने भूखंड वाटप, शासकीय निमशासकीय गरचरण, गायरान, ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागा, गावकीच्या, मालकीच्या जागा, इतर शासकीय जागा व सामाजिक जागा चुकीच्या पद्धतीने सरकार सिडकोच्या घशात घालून स्थानिक ग्रामस्थांचे अधिकार हिसकावून घेत आहे. शेतकरी, बांधकाम व्यावसायिक आणि ग्रामस्थ यांना नैना प्रकल्प आम्हाला नकोच, आमच्या जमिनी फुकट घेणाऱ्या नैनाला आमचा विरोध आहे. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची या अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या आंदोलनाची सरकारला दखल नक्कीच घ्यावी लागेल, असा आत्मविश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
प्रकल्पाचे फायदे-तोटे न समजावता प्रल्कप लादण्याचे काम चालू आहे. स्थानिकांची घरे, चाळी, इमारती, फार्महाऊस व इतर बांधकामे बेकायदेशीर ठरवून त्यांना नोटीस व तोडण्याचे काम चालू आहे. नैना प्रशासन मोफत ६० टक्के जमीन घेऊन शेतकऱ्यांवर अन्याय करत असून, ही दडपशाही सहन केली जाणार नाही, असे या वेळी सांगण्यात आले.
आमच्या उपोषणाला विविध माध्यमातून भरघोस पाठिंबा मिळत असल्याचे मत यावेळी उपोषणकर्त अनिल ढवळे यांनी व्यक्त केले.
….. चला पाहुयात काय म्हणालेत अनिल ढवळे…
Be First to Comment