पंतप्रधान मोदींचा आणखीन एक मास्टर स्ट्रोक
सिटी बेल लाईव्ह/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी कृषी इंफ्रास्ट्रक्चर फंडची घोषणा केली आहे. १ लाख कोटी रुपयांच्या या फंडामुळे शेती क्षेत्रात नवीन क्रांती होईल अशी अपेक्षा मोदी सरकारला आहे.
या फंडाचे मुद्दे पुढीलप्रमाणे :
१. शेतमाल साठवण, विपणन, प्रोसेसिंग व मार्केटिंग यासाठीच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी इंफ्रास्ट्रक्चर फंड घोषित करण्यात आलेला आहे.
२. सहकारी सोसायट्या, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, शेतकरी उद्योजक व शेती आधारित व्यवसाय आणि स्टार्टअप्स किंवा एग्री-टेक यांना याद्वारे अर्थसाह्य मिळणार आहे.
३.चालू आर्थिक वर्षात यंदा १० हजार कोटी, तर पुढील सलग तीन वर्षांमध्ये ३० हजार कोटी रुपये इतके पॅकेज दिले जाणार आहे.
४. या योजनेंतर्गत २ कोटी रुपयांचे अर्थसाह्य मिळू शकते. तसेच त्यासाठी ३ टक्के व्याज आकारले जाणार आहे.
५. देशातील शेतकऱ्यांना जागतिक स्पर्धेसाठी तयार करून देशातील शेतमाल निर्यात वाढवण्याच्या उद्देशाने ही नवी योजना जाहीर झालेली आहे.
१ लाख कोटी रुपयांच्या एग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर फंडची घोषणा करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यात त्यांनी युरिया या खताच्या बेसुमार वापराबद्दल चिंता व्यक्त केली.
मोदी म्हणाले की, युरिया खताच्या बेसुमार वापरामुळे शेतकऱ्यांचा अनावश्यक जास्त खर्च होत आहे. तसेच त्यामुळे शेतीतून निघणारे उत्पादन दर्जेदार राहत नाही. त्याचबरोबर युरिया खताचा जास्त वापर केल्याने पर्यावरण धोक्यात येत आहे.
एकूणच युरिया खत म्हणजे जादूची कांडी नसून त्याचा माफक प्रमाणात वापर करण्याचे आवाहन मोदींनी केले आहे.
Be First to Comment