Press "Enter" to skip to content

भेंडखळ मध्ये कामगार एकजुटीचा विजय

कामगार प्रतिनिधी, राजकीय प्रतिनिधी व पोलारिस कंपनी व्यवस्थापन अधिका-यांची बैठक यशस्वी

सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆

दि 27 फेब्रुवारी 2023 पासून भेंडखळ गावातील 502 स्थानिक भूमीपुत्रांनी आपल्या विविध मागण्यासाठी भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पोलारिस लॉजिस्टिक पार्क  (सी.डब्लू.सी) कंपनी समोर साखळी उपोषण सुरू केले होते. पोलारीस कंपनी प्रशासन कामगारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येताच कामगारांनी गेट बंद आंदोलन केले. सर्व कामगारांनी एकत्र येत सर्व ताकदिनिशी हा गेट बंद आंदोलन करण्यात आले.

रायगड श्रमिक संघटना व न्यू मेरिटाइम अँण्ड जनरल कामगार संघटन यांच्या नेतृत्वाखाली सी. डब्यू सी लॉजिस्टिक पार्क नोकरी बचाव कामगार समिती भेंडखळच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले. शिवाय सर्वच राजकीय पक्षाचा या आंदोलनाला जाहिर पाठिबा होता. सर्वच राजकीय पक्षाचे सहकार्य या आंदोलनाला मिळाले.विविध सामाजिक संस्था, संघटनांनी सुद्धा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला.

कामगारांच्या एकजुटीमुळे व गेट बंद आंदोलन केल्याने पोलारीस कंपनी शेवटी कामगारांसोबत चर्चेस तयार झाली. दिनांक 4 मार्च 2023 रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 03:30 या वेळेत पोलारीस कंपनीच्या हॉल मध्ये कंपनी प्रशासन, कामगार प्रतिनिधी, ग्रामस्थ, राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात महत्वाची बैठक संपन्न झाली.या बैठकीत जेकब थॉमस पोलारीस कंपनी डायरेक्टर, संतोष शेट्टी -पोलारीस कंपनी डायरेक्टर, काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, प्रशांत पाटील -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, भूषण पाटील -कामगार नेते, विकास नाईक -शेतकरी कामगार पक्ष तालुका चिटणीस, महादेव घरत -कामगार नेते,एल बी पाटील -जेष्ठ साहित्यिक, मनोज भगत -राष्ट्रवादी पार्टी उरण तालुकाध्यक्ष,मंजिता पाटील सरपंच ग्रामपंचायत भेंडखळ, कामगार प्रतिनिधी -लंकेश ठाकूर, राकेश भोईर, मिलिंद ठाकूर, किरण पाटील, किरण घरत, कृष्णा ठाकूर, संतोष पाटील यांच्यासह ग्रामपंचायत भेंडखळचे सदस्य, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली. विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कामगारांनी, भेंडखळ ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलारिस कंपनीला शेवटी एक पाऊल मागे घ्यावे लागले.कामगारांच्या मागणीचा विचार करत पोलारीस कंपनीने कामगारांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. भेंडखळ गावातील पूर्वी काम करत असलेल्या सर्व कामगारांना कामावर घ्यावे, कंपनी प्रशासन व कामगार प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीनुसार कामगारांना पगार देण्यात यावा, कामगारांच्या बदली कामगार घेण्यात यावे , उर्वरित कामगारांना कामावर टप्प्या टप्प्याने घेण्यात यावे अशा विविध मागण्या कंपनी प्रशासनातर्फे चर्चेअंती मान्य करण्यात आल्या.

साखळी उपोषण व गेट बंद आंदोलन सर्वपक्षीय असल्याने या आंदोलनाला इंटक चे राष्ट्रीय सचिव तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, माजी आमदार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना )पक्षाचे रायगड उपजिल्हा प्रमुख अतुल भगत, मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर , आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष शिवाजी ठाकूर,आम आदमी पार्टीचे उरण विधानसभा अध्यक्ष- संतोष भगत, भाजप कार्यकर्त्या तथा भेंडखळ ग्रामपंचातच्या विद्यमान सरपंच मंजिता पाटील, जेएनपीटीचे माजी विश्वस्त तथा कामगार नेते काँग्रेड भूषण पाटील, कामगार नेते महादेव घरत, ज्येष्ठ साहित्यिक एल बी पाटील , न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील,उरण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पाटील,पागोटेचे सरपंच कुणाल पाटील , सामाजिक कार्यकर्ते यशवंत म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे महिला तालुकाध्यक्ष सीमा घरत,उरण तालुका चिटणीस विकास नाईक यांच्या सह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते , विविध सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुरवातीपासूनच प्रत्यक्ष भेट देऊन या आंदोलनाला जाहिर पाठिंबा दिला होता.

न्हावा शेवा बंदराचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे व पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी यांनीही सदर कामगारांना न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.या सर्वांनी केलेल्या प्रयत्नामुळे कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. मागण्या मान्य झाल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केला. मागण्या मान्य झाल्याने कामगांरामध्ये आनंदाचे वातावरण होते. कामगारांनी सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते,पोलीस प्रशासन,ग्रामपंचायतचे सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे जाहीर आभार मानले. मागण्या मान्य झाल्याने कामगारांनी गावातून फेरी काढून सर्वांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.