Press "Enter" to skip to content

पनवेल जिल्हा काँग्रेसवर मित्रांचे राज्य

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी सुदाम पाटील : कार्याध्यक्षपदी अभिजीत पाटील यांची नियुक्ती

अभिजीत व सुदाम पाटील यांच्यामुळे पनवेल काँग्रेसला उभारी मिळेल : नाना पटोले

सिटी बेल ∆ मुंबई ∆

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी सुदाम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून अभिजीत पाटील यांना कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नियुक्तीपत्र दिले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

पनवेल जिल्हा काँग्रेसवर मित्रांचे राज्य ! ‌ ‌ ‌ ‌नवनिर्वाचित अध्यक्ष सुदाम पाटील व कार्याध्यक्ष अभिजीत पाटील हे बंधुतुल्य मित्रवर्य आहेत. सुदाम पाटील यांचा तळागाळातील जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे आगामी पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील यांनी अध्यक्षपदाची धुरा सुदाम पाटील यांच्या खांद्यावर सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

६ जानेवारी रोजी पनवेलमध्ये इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन व काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष ताहीर पटेल, जिल्हा उपाध्यक्ष अमित लोखंडे, महिला जिल्हा कार्याध्यक्ष शशिकला सिंह, अस्मिता पाटील, हरपिंडर वीर, सुदेशना नारायते, विनीत कांडपिळे, जयश्री खटकाले, शिला घोरपडे, सुनीता माळी यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात घरवापसी केली.

यावेळी सुदाम पाटील यांना काँग्रेसमध्ये लवकरच मोठी जबाबदारी देणार असल्याचे आश्वासन यावेळी नाना पटोले यांनी दिले होते.

अध्यक्ष सुदाम पाटील व कार्याध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यावर दिलेली जबाबदारी ते योग्यप्रकारे निभावतील याची खात्री आहे. सुदाम पाटील यांच्या काँग्रेसमधील घरवापसीमुळे पनवेल काँग्रेसला मोठी ताकद मिळाली आहे. पक्षाच्या हितासाठी अभिजीत पाटील यांनी मनाचा मोठेपणा दाखवून स्वतःहून सुदाम पाटील यांच्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्याला अध्यक्ष करण्याची सूचना मांडली. त्यामुळे सुदाम पाटील यांच्या पाठीशी वेळोवेळी अभिजीत पाटील यांचे मोठे पाठबळ लाभेल यात तिळमात्रही शंका नाही. त्यामुळे येणाऱ्या पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला निश्चितच फायदा होणार असून मोठे यश मिळेल असा विश्वास यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

पनवेल जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे खरे दावेदार सुदाम पाटीलच होते, किंबहुना त्यांना ही जबाबदारी देण्यात उशीर झाला हे ही तितकेच खरे. मधल्या काळात प्रांताध्यक्ष नाना पटोले साहेबांनी मला अध्यक्षपदाची जबाबदारी देताना पनवेल काँग्रेसच्या झालेल्या वाताहतीबाबत चर्चा केली होती व मी त्यांना अश्वस्थ केले होते की काहीही नाराजीने इतर पक्षात गेलेले काँग्रेस नेते/पदाधिकारी यांची लवकरात लवकर घरवापसी करून घेईन व त्यांचे पुनर्वसन मानाच्या जागेत होईल. आज सुदाम पाटील यांच्या हातात अध्यक्षपदाची धुरा देताना पनवेल काँग्रेस येणाऱ्या महापालिका निवडणुकीत निश्चितच उसळी मारेल याबाबत तिळमात्र शंका नाही.
– अभिजीत पाटील, कार्याध्यक्ष, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस

राजकीय सारीपाटात प्रत्येकजण दुसऱ्याची खुर्ची आपल्याला कशी मिळेल या स्वार्थी हेतूनेच संघटनेत काम करतो. परंतु संघटना वाढीसाठी स्वतःची खुर्ची त्याग करून संघटनेला प्राधान्य देणारे जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील हे संपूर्ण देशातील पहिले उदाहरण असेल. अभिजीत पाटील यांनी केवळ संघटनेसाठी आपल्या अध्यक्षपदाचा त्याग केला व मला काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल अभिजीत पाटील व आमचे नेते नानाभाऊ पटोले यांचे मनपूर्वक आभार. माझ्यावर दिलेली जबाबदारी निस्वार्थीपणे पार पाडेन.
– सुदाम पाटील, अध्यक्ष, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.