मनोगत देवाचे….
मानवास गर्व जाहला आपुल्या बुध्दीचा
वेठीस धरोनी छळ मांडियेला त्याने निसर्गाचा
शतकानुशतके अपरिमीत हानी होत राही
भू,जल, आकाश प्रदुषणाच्या विळख्यात जाई
श्वास कोंडला चराचराचा उच्छृंखल वागण्याने
तमा न उरली संस्कारांची, कळस गाठला अनीतीने…
देवदर्शनासाठीही मांडला बाजार
भक्तीपेक्षा पैशाला येई मोल फार
कुटूंबापेक्षाही आभासी दुनियेत माणूस रमला
स्पर्धा, ईर्ष्या, विलासी जीवनाने साधेपणाही विसरला
पाहुनी -हास आपुल्या लेकरांचा देव दु:खी झाले
वठणीवर आणण्या त्यांना कोरोनाचे संकट धाडिले
ठप्प झाली जगरहाटी, माणसे घरात अडकली
हॉटेल, माॅल, सेल शिवायही साधे जगणे शिकली
पुन्हा एकदा सुरू झाले छंद, व्यायाम, परवचा, पाढे
परंपरा अन् संस्कारांचे बीज नकळत बालमनात रूजे
पटली महती नात्यांची अन् माणुसकीची
स्वतःची कामे स्वतः करत आत्मनिर्भर होण्याची
सण, उत्सव वा आषाढ वारीही घरी बसून केली
गरजूंना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकीही जपली
आता तरी व्हा शहाणे घेतलेल्या अनुभवातून
‘कशाचाही अतिरेक वाईटच’ मनाशी खूणगाठ घ्या बांधून..
वरदा जोशी, नवीन पनवेल






Be First to Comment