Press "Enter" to skip to content

तब्बल १५३४ स्वयंसेवकांचा सहभाग ; एकूण ९७५० चौ.मी. परिसर केला स्वच्छ

पनवेल ग्रामीण भागात डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे “स्वच्छ-सुंदर माझे गाव ” राखण्यासाठी स्वच्छता अभियान

पनवेल दि.०१(वार्ताहर): डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या प्रेरणेने व डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, डॉ.सचिनदादा धर्माधिकारी मार्गदर्शनाखाली १ मार्च रोजी पनवेल तालुक्यातील नेरे, चेरीवली, वाकडी, रिटघर, दूंदरे, सुकापूर आणि कुडेवहाळ या गावांमध्ये व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमात तब्बल १५३४ स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेत एकूण ९७५० चौ.मी. परिसर स्वच्छ केला. शासकीय रुग्णालय, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, पोलिस चौकी तसेच स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करण्यात आली. मोहिमेदरम्यान सुमारे १९८३० किलो कचरा गोळा करण्यात आला. संबंधित गावांचे सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक पोलीस पाटील, डॉक्टर आणि स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

ही मोहीम केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नसून सामाजिक बांधिलकीची जाणीव जागृत करणारी ठरली. प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती अभियान, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, आरोग्य जनजागृती, शिक्षणविषयक मार्गदर्शन आणि आपत्तीग्रस्तांना मदत अशा विविध उपक्रमांतून समाजहिताचे कार्य सातत्याने राबवत आहे. “स्वच्छता हीच सेवा” मानत प्रतिष्ठानचे दास यांनी शिस्तबद्ध व संघटित पद्धतीने समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ग्रामीण भागात स्वच्छतेची सवय रुजविणे, नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करणे आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणे हेच या अभियानामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ होण्याबरोबरच नागरिकांमध्ये “स्वच्छ- सुंदर माझा गाव ” प्रेरणादायी समाज प्रबोधनयुक्त स्वच्छता अभियान दिसून आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.