Press "Enter" to skip to content

विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी युवासेनेची ठाम भूमिका; विल्फ्रेड महाविद्यालय प्रशासनाला ७ दिवसांचा अंतिम अल्टिमेटम!

पनवेल तालुक्यातील शेडूंग येथील विल्फ्रेड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या गंभीर तक्रारींची दखल घेत युवासेना लोकसभा अध्यक्ष पराग मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालय प्रशासनाची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर समाधानकारक कार्यवाहीसाठी प्रशासनाला ७ दिवसांचा अंतिम अल्टिमेटम देण्यात आला.

विद्यार्थ्यांनी मांडलेल्या तक्रारींमध्ये प्रवेश माहितीपत्रकाचा अभाव, शुल्क संरचनेतील अस्पष्टता, विद्यार्थी परिषद व वैधानिक समित्या कार्यरत नसणे, महिला विकास कक्षाचा अभाव, तक्रार निवारण यंत्रणेतील त्रुटी, संकेतस्थळ अद्ययावत नसणे, मूळ कागदपत्रे वेळेत न मिळणे, गुणपत्रिकांबाबत संभ्रम तसेच विद्यार्थ्यांशी अयोग्य वर्तन अशा गंभीर मुद्द्यांचा समावेश आहे.

युवासेनेने शासन नियम व विद्यापीठाच्या तरतुदींनुसार सर्व मुद्द्यांवर लेखी स्पष्टीकरण आणि तातडीने सुधारात्मक उपाययोजनांची मागणी केली आहे. निर्धारित मुदतीत कार्यवाही न झाल्यास विद्यार्थ्यांच्या सहभागासह लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच संपूर्ण प्रकरण संबंधित विद्यापीठ, उच्च शिक्षण संचालनालय, UGC, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आणि अन्य सक्षम प्राधिकरणांकडे सादर करण्यात येईल.

युवासेनेची भूमिका कोणत्याही संस्थेविरोधात नसून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांशी तडजोड करणाऱ्यांना कायदेशीर व लोकशाही मार्गाने जाब विचारला जाईल.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रीतम सुर्वे, रोशन पुजारी, जिल्हा सचिव रोहन ढोले, विधानसभा संपर्क प्रमुख अभिनय सोमण, तालुका अध्यक्ष ऋषिकेश सोगे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सागर रोकडे, महानगर अध्यक्ष प्रेम ठाकूर, विभाग अध्यक्ष गौरव खांडेकर, शहर उपाध्यक्ष फरहाद शेख, सोशल मीडिया शहर समन्वयक साई म्हाप्सूगु यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.