
पनवेल : प्रतिनिधी
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधुन लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे रोटरी संचालित विशेष मुलांच्या शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी वर्ग यांना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या सन्मान पत्रामध्ये गुरुची महती सांगणारी मानदा पंडित यांनी लिहिलेली सुंदर कविता होती. यावेळी व्यासपीठावर सरगम क्लबचे अध्यक्ष आदित्य दोशी, शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका शैला बंदसोडे, सरगम क्लबच्या सचिव मानदा पंडित, प्रोजेक्ट चेअरमन स्वाती गोडसे हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ शिक्षिका अरुंधती बंदसोडे यांनी केले. सरगम क्लबचे अध्यक्ष आदित्य दोशी यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू सांगुन सरगम क्लबच्या कार्याची माहिती दिली आणि भविष्यात शाळेतील विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यासाठी उपयुक्त कार्यक्रम घेणार असल्याचे सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका शैला बंदसोडे यांनी या सत्काराबद्दल सरगम लायन्स क्लबचे आभार मानले. या हृद्य सत्काराबद्दल सर्व शिक्षक आणि कर्मचारी अतिशय भारावून गेले होते. याप्रसंगी सन्मान मूर्ती शिक्षकांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
स्वाती गोडसे यांनी हा सन्मान सोहळा आयोजित करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व शिक्षक, कर्मचारी आणि शालेय कमिटीचे आभार मानले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा सरगम क्लबच्या वतीने बिस्किटे वाटण्यात आली.
या कार्यक्रमाला सरगम क्लबचे संजय गोडसे, प्रेमेंद्र बहिरा, सुनील देशपांडे, संध्या महानुभाव, दीपेश नवधरे आणि रोटरी विशेष मुलांच्या शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.



Be First to Comment