Press "Enter" to skip to content

नैना विकासाला मोठी चालना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून टाऊन प्लॅनिंगला गती, शेतकऱ्यांच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय  

पनवेल (प्रतिनिधी) नैना (नवी मुंबई एअरपोर्ट इंफ्लूएन्स नोटीफाईड एरिया) विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल, सह व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नैना परिसरातील गावांच्या विकासासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. नैना क्षेत्रातील गावांच्या नगर रचना योजनांना तातडीने मंजुरी द्यावी. तसेच मंजूर असलेल्या योजनांमधील त्रुटी दूर करून ग्रामस्थांना मालमत्ता कार्डाचे वितरण करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून नैना क्षेत्रातील नगर रचना योजना प्रलंबित आहेत. मंजूर केलेल्या योजनांमध्ये त्रुटी असल्याचे नागरिक व लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. यासंदर्भात प्रत्यक्ष स्थळावर जाऊन सर्वेक्षण करून त्रुटी दूर कराव्यात. तसेच जमीन मोजणीसाठी आता शासनाने खासगी यंत्रणांना मंजुरी दिली आहे. त्यांच्या मार्फत या क्षेत्रातील जमिनींची मोजणी करावी. नैना क्षेत्रातील तसेच विविध महानगर प्राधिकरणाच्या क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा, वाहतूक, पार्किंग, रस्ते, विकास आराखडा आणि पायाभूत सुविधांचा एकत्रित विचार करून नियोजन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैना परिसरातील टाऊन प्लॅनिंगच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देत मंजूर आराखड्यातील त्रुटी दूर करून विकास प्रक्रियेला वेग देण्यावर त्यांनी भर दिला.  तसेच स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांचा विचार करून प्रत्यक्ष स्थळपाहणी, अचूक सर्वेक्षण आणि आवश्यक दुरुस्ती करून नियोजन पूर्ण करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामस्थांच्या मालकी हक्कांचा पूर्ण आदर राखत जमिनींचे वाटप आणि विकास प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याची सूचना केली. भविष्यात नैना परिसरात मोठ्या प्रमाणावर शहरी विकास होणार असल्याने जलपुरवठ्याचे नियोजन आतापासूनच करण्यात यावे, असेही त्यांनी नमूद केले. बैठकीत नैना परिसरातील जमिनींच्या अचूक मोजणीसाठी खासगी एजन्सींना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. वाढती लोकसंख्या, रस्ते, जलवाहिन्या, सार्वजनिक सुविधा, उद्याने आणि इतर विकासकामांचा विचार करून सविस्तर नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. या निर्णयांमुळे तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती मिळणार असून, नैना परिसरातील गावांमध्ये नियोजित नागरी विकास, पायाभूत सुविधा आणि ग्रामस्थांच्या मालकी हक्कांना अधिक बळ मिळणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.