
वांगणी येथील देशमुख कृषी पर्यटन केंद्रात दृष्टीहीनांसाठी राजेंद्र घरत यांच्या ३४ व ३५ व्या ब्रेल लिपीतील पुस्तकांचे प्रकाशन
नवी मुंबई : श्रीलंका हा देश भारताच्या एखाद्या राज्याइतकाच मोठा आहे. परंतु तेथे नेत्रदान करणाऱ्यांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे; तर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या आपल्या भारतात मरणोत्तर नेत्रदान करणारे केवळ १० ते १२ टक्के आहेत. तीच बाब देहदानाचीही असल्याबाबत लेखक पत्रकार राजेंद्र घरत यांनी खंत व्यक्त केली. वांगणी येथील देशमुख कृषी पर्यटन केंद्रात दृष्टीहीनांसाठी घरत यांच्या ३४ व ३५ व्या ब्रेल लिपीतील पुस्तकांचे प्रकाशन २७ जुलै रोजी करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी घरत यांचे एम ए च्या वर्गातील महाविद्यालयीन सोबती प्रा. एकनाथ जाधव, कल्याण येथील विद्यानिकेतन संगीत विद्यालयाच्या संचालिका सुरेखा थिगळे, डॉ. श्रध्दा सोमण, अध्यापिका विभावरी तरटे, शुभदा बोराडे तसेच देशमुख पर्यटन केंद्राचे प्रमुख दिलीप देशमुख उपस्थित होते. मौल्यवान डोळे तसेच यकृत आणि अन्य मानवी अवयव मृत्यूनंतर त्या देहासोबतच जाळून टाकत त्याची राख करण्याऐवजी तेच जर अवयवदानाच्या स्वरुपात देण्यात आले तर कित्येकांना नवजीवन लाभेल असेही घरत यांनी पुढे प्रतिपादन केले.
त्यांच्या ‘लेकुरे उदंड झाली’ या ३४व्या ब्रेल पुस्तकाचे प्रकाशन करताना सुरेखा थिगळे म्हणाल्या की दृष्टीहीनांच्या संगीत साधनेबद्दल आपण जाणून आहोत, त्यांना डोळ्यांच्या उणीवेच्या बदल्यात नियंत्याने जणू एखादे अतिरिवत इंद्रीय सक्रिय केलेले असावे इतके तन्मयतेने ते संगीत सादरीकरण करतात. आपले सारे अवयव निसर्गाने शाबूत ठेवले असल्याने खूप मोठ्या आरोग्यसंपदेचे आपण धनी आहोत.
‘प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि त्यांची भाषा’ या घरत यांच्या ३५ व्या ब्रेल पुस्तकाचे प्रकाशन प्रा. जाधव यांच्या हस्ते पार पडले. त्याबाबत मनोगत व्यवत करताना जाधव यांनी आपले महाविद्यालयीन सोबती चांगल्या ऊंचीवर पोहचत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आपल्यावर समाजाचे कर्ज आहे व त्याची फेड करताना घरत यांना पाहण्यात समाधान वाटते असे सांगत असाच ज्ञानप्रकाश सगळीकडे पसरो अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या. डॉ. श्रध्दा सोमण, शुभदा बोराडे, यांनीही या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. दिलीप देशमुख यांनी घरत यांच्या पुढील वाटचालीसाठी सुयश चिंतीले.




Be First to Comment