Press "Enter" to skip to content

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी पंच प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन, भाजप स्पोर्ट्स सेल व विद्यार्थीराजा बी.पी.एड. कॉलेजचा संयुक्त उपक्रम; ३५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पनवेल (प्रतिनिधी) भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने, भारतीय जनता पार्टी स्पोर्ट्स सेल, रायगड जिल्हा आणि विद्यार्थीराजा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड रिसर्च, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी पंच परीक्षा व प्रशिक्षण शिबिराचा रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. या उपक्रमाला कबड्डी क्षेत्रातील मान्यवर, प्रशिक्षक, पंच, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिराचे उद्घाटन नवीन पनवेल भारतीय जनता पार्टी मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक दशरथ म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी अशा प्रशिक्षण शिबिरांमुळे कबड्डी खेळाला नवे बळ मिळेल आणि प्रशिक्षित पंच तयार होऊन खेळाचा दर्जा अधिक उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमाच्या प्रारंभी स्पोर्ट्स सेल, भाजप रायगड जिल्हा क्रीडा संयोजक तथा आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांनी प्रास्ताविक करत शिबिराच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ उत्सव न साजरा करता समाजोपयोगी आणि क्रीडाविकासाला चालना देणारे उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्यातूनच या कबड्डी पंच प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कबड्डी हा महाराष्ट्राचा पारंपरिक आणि गौरवशाली खेळ असून, दर्जेदार पंचांची निर्मिती ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी बी.पी.एड. कॉलेजचे प्राचार्य श्री. मानमोडे, छत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत ठाकूर, आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच रवींद्र म्हात्रे, पनवेल पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी भालचंद्र पाटील, कबड्डी पंच विश्वनाथ म्हात्रे, बी.पी.एड. कॉलेजचे संचालक पदमसिंह यांच्यासह विविध क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिस्त, नियमांचे ज्ञान आणि निष्पक्ष निर्णयक्षमता या गुणांमुळेच एक उत्कृष्ट पंच घडत असल्याचे सांगितले.

या प्रशिक्षण शिबिरात कबड्डी खेळाचे अद्ययावत नियम, पंचांची भूमिका व जबाबदाऱ्या, मैदानावरील प्रात्यक्षिके, अनुभवी तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन तसेच पंच पात्रता परीक्षा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवावर आधारित प्रशिक्षण देण्यात आले. शिबिरात ३५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभागनोंदविला. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी पंचांच्या निर्णयप्रक्रियेतील बारकावे, खेळातील नियमांचे अचूक पालन, आधुनिक पंचिंग पद्धती तसेच स्पर्धांमध्ये उद्भवणाऱ्या विविध परिस्थितींवर मार्गदर्शन घेतले. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अशा प्रशिक्षण शिबिरांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणारे समाजाभिमुख व क्रीडाविकासाला चालना देणारे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. युवकांना खेळाकडे आकर्षित करण्याबरोबरच प्रशिक्षित पंचांची फळी तयार करण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन, भारतीय जनता पार्टी स्पोर्ट्स सेल, रायगड जिल्हा, विद्यार्थीराजा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड रिसर्चचे प्राध्यापक, पदाधिकारी, स्वयंसेवक तसेच आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात कबड्डी खेळाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.