माझा बाबा…
ज्याच्या खांद्यावर बसून जायची मी देवदर्शनाला,
जेंव्हा होती मी एक तीन वर्षाची कुक्कुली बाला,
तो खांदा पण एका देवाचाच होता हे समजायला,
खूप वर्षे लागली माझ्या ‘बाबांना’ ओळखायला!
मऊ मन असूनही किती कठोर भाव पांघरायचे,
माझ्यावर संस्कार व्हावे म्हणून तर रागवायचे,
किती क्लेश होत असतील असा आव आणायचे,
म्हणूनच कि काय, लपायला कवच दिले आईचे!
बाबांच्या धाकात, आईच्या मायेत मी फुलत गेले,
कळलेच नाही, शाळा संपवून कॉलेजात कधी गेले,
पाहता पाहता डिग्री घेऊन चक्क मी ग्रॅज्युएट झाले,
डोळे भरून आले, जेंव्हा बाबांना मी हसताना पहिले!
मग मात्र माझा बाबा बदलला, कठोर आव गळला,
आणि माझ्या लग्नात माझा खरा ‘बाबा’ मला गवसला,
माझी पाठवणी करताना त्याच्या डोळ्यांना धारा लागल्या,
आणि भर उन्हाळ्यात मला, श्रावणसरींचा भास झाला!
गिरीश समुद्र, नवीन पनवेल






Be First to Comment