सिटी बेल ∆ आवरे • उरण ∆ अजय शिवकर ∆
देवशयनी आषाढी एकादशी निमित्त शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुलातुन सकाळी ठीक १०.०० वाजता भव्य दिंडीचे प्रयाण झाले. भक्तीभावाने आयोजित केलेल्या दिंडीमध्ये पर्यावरण रक्षण काळाची गरज हा संदेश देण्यात आला. भक्ती व पर्यावरण संवर्धन दिंडी मध्ये शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत संस्कृती रक्षणाचा संदेश दिला.
भगवान विठ्ठलाच्या भक्तीने प्रेरित होऊन विठ्ठलाचे व रुक्मिणी मातेचे साक्षात दर्शन घडविले. अनेक संतांची वेशभूषा करून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत जनाबाई, संत मुक्ताबाई यांच्या उपस्थितीचा प्रत्यय आणून दिला. भक्तिमय दिंडी पालखी सोहळ्यात टाळ, मृदुंग, चिपळ्यांची साथ होतीच शिवाय पारंपारिक वेशभूषा करून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होते. नऊवारी साड्या नेसून मुली व पारंपारिक पुरुषी वेश करून मुलांनी या भक्तिमय दिंडीची शोभा वाढविली. ढोल ताशा व लेझीम नृत्य या दिंडीचे खास आकर्षण होते. त्यामध्ये सहभागी झालेल्या कलाकारांनी नाविन्यतेचा अविष्कार दाखविला. झिम्मा फुगडी यांची ही अधुन मधुन रेलचेल होती.
या भक्तीमय दिंडीत पर्यावरणाचे जतन व संवर्धन या विषयी जनजागृती करण्यात आली. पर्यावरणाची हानी व त्याच्या भीषण परिणामांची ओळख करण्यासाठी घोषवाक्य व चित्रफळक विद्यार्थ्यांनी सादर केले. गावातील चौकाचौकात आषाढी एकादशी व पर्यावरण विषयक माहिती देणारी भाषणे सादर केली. या भव्य दिंडीला गावातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. विठ्ठलाच्या पालखीचे स्वागत केले व दिंडीतील नूत्याविष्काराचा आस्वाद नागरिकांनी घेतला. दिंडीची दुपारी १२.०० वाजता सांगता झाली. व त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे लाभ घेतला.
देवशयनी आषाढी एकादशी व पर्यावरण दिंडीच्या आयोजनाबद्दल ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती पुष्पलता म्हात्रे व संस्थेच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले. ह्या भक्तिमय व प्रकृती रक्षण दिंडीचे आयोजन यशस्वी करण्यासाठी प्राचार्य सुभाष ठाकूर व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विशेष प्रयत्न केले.
Be First to Comment