
उरण च्या नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांचे मग्रूर मुख्याधिकारी समीर जाधव विरोधात धरणे आंदोलन
कोणाच्या सांगण्यावरून समीर जाधव अरेरावीपणे वागतोय याची चौकशी झालीच पाहिजे ; आक्रमक भावनाताईंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
उरण : प्रतिनिधी
उरण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांनी नुकतेच महिला नगरसेविकांच्या समवेत पालिकेच्या पायऱ्यांवरती धरणे आंदोलन केले. अत्यंत कळकळीने आणि तळमळीने आपल्या भावना मांडणारा भावनाताईंचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. उरण नगर पालिकेचे मुख्याधिकारी समीर जाधव अत्यंत मग्रूर पणाने वागत असल्यामुळे नाईलाजाने हे आंदोलन करावे लागत असल्याची खंत भावनाताई या व्हिडिओमध्ये मांडताना दिसतात.सदर मुख्याधिकारी पुरुषी अहंकाराने वागत असल्याचा खणखणीत आरोप त्यांनी केला आहे. यामध्ये आपल्या भावना मांडताना भावनाताई घाणेकर म्हणाल्या की नगराध्यक्ष म्हणून कारभार स्वीकारल्यानंतर उरण मधील नागरिकांना भेडसावत असणाऱ्या पिण्याचे पाणी, वीजपुरवठा आणि सांडपाण्याचा निचरा या महत्त्वाच्या विषयावरती बैठका घेण्याचा प्रयत्न केला. परंतु येथील मुख्याधिकारी समीर जाधव या व्यक्तीने मला अशा स्वरूपाचा कुठलाही अधिकार नाही असे ठणकावून सांगत तारस्वरात ओरडत दालनाचा दरवाजा आपटला. तसेच तुम्ही मला प्रश्न विचारू शकत नाही, कुठल्याही विभाग प्रमुखांशी बोलू शकत नाही आणि कुठलीही फाईल मागवू शकत नाही! अशा स्वरूपाचे बेताल वक्तव्य केले. इतकेच नव्हे तर त्यानंतर विविध विभागांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला असता तेथील अधिकाऱ्यांनी देखील आम्हाला मुख्याधिकाऱ्यांनी कुठलीही माहिती देण्यास मज्जाव केला आहे असे उत्तर प्राप्त झाले.नुकत्याच सादर झालेल्या बजेट बद्दल देखील समीर जाधव यांनी माझ्याशी कुठलीही चर्चा केली नाही. गेले तीन महिने हा सगळा मानसिक त्रास सहन केल्यानंतर आता माझा संयम सुटत आहे. प्राप्त परिस्थितीत होणाऱ्या मानसिक खच्चीकरणाचा त्रास सहन होत नसल्यामुळे भावनाताईंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारला आहे की जनतेने भरभरून मते देऊन निवडून आणलेल्या माझ्यासारख्या महिला लोकप्रतिनिधी आपल्या लाडक्या बहिणी नाहीत काय? तसेच त्यांनी नगरविकास खात्याचे सर्वेसर्वा असणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील याच स्वरूपाचा प्रश्न विचारला आहे. भावनाताई घाणेकर यांनी मुख्याधिकाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडताना एक अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा देखील मांडला आहे. त्या नगराध्यक्षा झाल्यानंतर आयोजित केलेल्या पहिल्या बैठकीत १२ धोरणात्मक निर्णय घेण्यात आले होते. परंतु आकस बुद्धीने काम करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांनी त्यातील फक्त तीन धोरणात्मक निर्णयांना मंजुरी दिलेली आहे.समीर जाधव यांच्या अशा वागण्याने उरणची जनता सुविधांपासून वंचित असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. भावनाताई घाणेकर आपली भूमिका मांडताना म्हणाल्या की मी केवळ नगराध्यक्ष या पदाच्या खुर्चीचा आब राखून शांत आहे. परंतु माझ्यासारख्या नगराध्यक्ष असणाऱ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष आणि समाजसेविका असणाऱ्या सक्षम व्यक्तीला जर ही वागणूक मिळत असेल तर उरण मधील सामान्य महिलांचे काय हाल होत असतील? उरण नगरपालिकेतील सर्व कर्मचारी समीर जाधव यांच्या धाकाखाली काम करत असतात असा आरोप देखील त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी सहा विविध ठिकाणी तक्रार अर्ज दाखल केले असून समीर जाधव कोणाच्या सांगण्यावरून मग्रुरी करत आहे याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.या व्हिडिओच्या शेवटी त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना भावनिक आवाहन केले आहे की जर तुम्हाला माझ्यासारख्या महिला लोकप्रतिनिधीला न्याय देता येत नसेल तर ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही जी काय भाषणे ठोकलीत त्यांना कुठलाही अर्थ शिल्लक राहत नाही. उरण नगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीच्या भावनाताई घाणेकर यांनी भारतीय जनता पार्टी प्रणित महायुतीच्या उमेदवाराला आसमान दाखवल्यामुळे त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत होता. राज्यभरात महाविकास आघाडीची पीछेहाट होत असताना उरण महानगरपालिकेत मात्र भावनाताई घाणेकर एखाद्या रणरागिणी प्रमाणे झुंजल्या आणि जिंकल्या देखील. कदाचित याचाच तर बदला घेण्यासाठी मुख्याधिकारी समीर जाधव यांचा वापर तर होत नाही ना? अशी चर्चा दबक्या आवाजात उरणमध्ये होत आहे.



Be First to Comment