“पहिली मंगळागौर”
आगळेवेगळे गेट टुगेदर
लग्नानंतरचा पहिलं वर्ष म्हणजे नववधधुंसाठी सणांची रेलचेल.प्रत्येक सणाचे वेगळे महत्व, तो पारंपरिक पद्धतीने साजरा करणं आणि घरातील, परंपरा समजून घेणे हे तिच्यासाठी महत्त्वाचं! त्यातील मंगळागौरी पूजन म्हणजे सण आणि व्रत यांचा सुरेख संगम! लग्नानंतर आम्ही नवी पनवेल येथे वास्तव्यास होतो. पहिल्या मंगळागौरी साठी मी सासरी आले.मराठीचे आद्यकवी श्री मुकुंदराज व मराठी साहित्याचे नवकोट नारायण संत श्री दासोपंत महाराज यांचे समाधी स्थान व श्री योगेश्वरी देवीचे मंदिर तसेच सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर अंबाजोगाई हे माझे सासर! पहिली मंगळागौर म्हणजे कुतूहल आणि उत्साह अशा दोन्ही भावना एकाच वेळी मनात होत्या. त्यावेळच्या आठवणी मनात अजुनही दरवळतात.
आमचा कन्नडकर परिवार खूप मोठा असल्यामुळे पहिली मंगळागौर हे जणू गेट-टुगेदरच होते. माझ्या सासूबाई सौ. शैला कन्नडकर खूप हौशी असल्याने लग्नानंतरच्या पहिल्या वर्षीचे सर्व सण उत्साहात साजरे झाले. मंगळागौरी पूजन हा तर एक सोहळाच होता.मंगळा गौरी पूजनाची तयारी खूप आधीपासून चालू होती. मला सासुबाईंनी प्युअर सिल्क साडी घेतली होती आणि आईने ही खूप छान साडी घेतली होती. माझ्या बहिणीला आणि आई-बाबांना ही निमंत्रण दिले होते आणि चार नववधुंना पूजेसाठी निमंत्रित केले होते .मी बनारसी शालू आणि पारंपारिक दागिने घालून छान तयार झाले होते .आम्ही पाच जणींनी एकत्रित पूजा केली. चांदीच्या मंगळागौरी वर निरनिराळ्या प्रकारची पत्री ,हळकुंड, खारीक, पूजेचे साहित्य आणि फुले वाहून आम्ही शंकराची मोठी पिंड बनवली .गुरुजींनी आम्हाला या पूजेचे महत्त्व सांगितलं आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करायला सांगितली आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाच वर्षे करायला सांगितले .मंगळागौरीची कहाणी वाचायला सांगितली. सोळा दिव्यानी देवीची आरती केली. पंचपक्वान्नांचा नैवेद्य अजूनही आठवतो. त्यादिवशी चांदीच्या ताटात न बोलता पंचपक्वानांचे साग्रसंगीत जेवण केलं.
मंगळागौरीचे मुख्य आकर्षण म्हणजे जागरण खेळ! आम्ही फुगड्या खेळलो.. उखाणे घेतले. या दिवशी नवीन मैत्रिणीच्या ओळखी झाल्या आणि अशा रीतीने माझ्यासाठी आगळे वेगळे ‘गेट टुगेदर’ ठरलेली माझी पहिली मंगळागौर अत्यंत उत्साहात साजरी झाली.
सौ.साक्षी कन्नडकर, आदई







Be First to Comment