लाईफ लाईन विरोधातील निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी पराकोटीच्या न्यायालयीन लढ्यास तयार : डॉ. प्रकाश पाटील
सिटी बेल • पनवेल •
ॲड.रवींद्र पाटील यांच्या अत्यंत क्षतीग्रस्त पायावर केलेल्या शस्त्रक्रियेमुळे त्यांचा पाय गमवावा लागल्याच्या ठपका ठेवत लाईफ लाईन हॉस्पिटल ला पंधरा लाखांचा दंड ठोठावला असल्याचे वृत्त निवडक माध्यमात आणि समाज माध्यमांवर पसरवले जात होते. प्राप्त परिस्थितीत सन्माननीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा मान राखत असलो तरीदेखील संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची भूमिका डॉक्टर प्रकाश पाटील यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत विशद केली.
याबाबत सविस्तर हकीकत माध्यमांसमोर मांडत असताना डॉक्टर प्रकाश पाटील म्हणाले की ही घटना 2 डिसेंबर 2009 रोजीची आहे. रवींद्र पाटील हे त्यांच्या बुलेट वरून जात असताना त्यांचा अपघात झाला व त्यांच्या उजव्या पायावरून ट्रकचे चाक गेल्यामुळे मल्टिपल फ्रॅक्चर आणि व्हॅस्क्यूलर डॅमेज यामुळे पाय अक्षरशा लोम्बत होता. भरपूर रक्तस्राव झाला होता तसेच जखमांच्यात खोलवर माती गेल्याचे देखील निदर्शनास येत होते. लाईफ लाईन येथे दाखल करतेवेळी रवींद्र पाटील शुद्धीत होते व डॉक्टरांसमवेत संवाद साधत होते असे लाईफ लाईन प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. त्यानंतर एड. जगे, ॲड. पाटेकर आणि रवींद्र पाटील यांच्या पत्नी असे हॉस्पिटलमध्ये आले. हॉस्पिटल प्रशासनाच्यावतीने क्षतिग्रस्त पाय कापून काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगण्यात आले, तसेच अत्यंत कमी प्रमाणात संधी असली तरी रेकन्स्ट्रक्टेटिव सर्जरी हा देखील पर्याय उपलब्ध असल्याचे त्यांना सांगितले परंतु या शस्त्रक्रियेत कुठल्याही प्रकारे शाश्वती देता येत नाही, तो केवळ एक प्रयत्न असेल, असे सांगण्यात आले.
रविंद्र पाटील यांच्या पत्नी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहमती दिल्यानंतर प्रोटोकॉल प्रमाणे शस्त्रक्रिया पूर्व संमती पत्रावर त्यांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्या. आर्थोपेडिक सर्जन, व्हॅस्क्यूलर सर्जन, अनेस्थेशिया स्पेशलिस्ट अशा मोठ्या टीमने जवळपास सात तास शस्त्रक्रिया केली.
दरम्यान ही शस्त्रक्रिया अत्यंत क्लिष्ट होती,रक्तवाहिन्या क्षतिग्रस्त असल्याने अनेक शुद्ध रक्त वाहून निघणाऱ्या धमन्या काम करण्यास असमर्थ होत्या. अशा वेळेस वस्क्युलर ग्राफ्टिंग करणे गरजेचे असते त्यामुळे डाव्या पायातील काम करणाऱ्या धमन्यांतील काही धमन्या ग्राफ्ट करण्यात आल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने स्पष्ट केले. शस्त्रक्रियेनंतर पुढील दहा दिवसात पायाच्या बोटांपर्यंत रक्तप्रवाह सुरळीत होत असल्याने शस्त्रक्रिया यशस्वी होत असल्याचे पाहून हॉस्पिटल प्रशासन व आप्तेष्ट यांनी समाधान व्यक्त केले. परंतु त्यानंतर जंतू संक्रमण वाढल्यामुळे पायातील रक्तप्रवाह बंद होऊन संक्रमणाचे प्रमाण वाढू लागले.
अर्थातच यानंतर पाय कापून टाकण्याच्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय उरला नव्हता कारण हे संक्रमण पाया व्यतिरिक्त शरीरात अन्य ठिकाणी झाल्यास रुग्णाच्या जीवाला देखील धोका संभवत होता. पाय कापून काढण्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर देखील जंतुंच्या मुळे संक्रमण सुरू होते. त्यानंतर हे जंतू संक्रमण निपटून काढण्यासाठी छोटी शस्त्रक्रिया करावी लागेल असे हॉस्पिटल प्रशासनाने सांगताच रुग्णाच्या आप्तेष्टांनी आक्षेप घेत डॉक्टरी सल्ला झुगारून डिस्चार्ज (DAMA)घेतला व पुढील शस्त्रक्रीया जे जे रुग्णालयात करवून घेतली.

ही घटना 2009 सालची असली तरीदेखील रविंद्र पाटील यांनी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत 2012 साली ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदविली. सदर प्रकरणांमध्ये हलगर्जीपणा झाला आहे की कसे? ते तपासण्यासाठी जेजे रुग्णालयातील 3 तज्ञ डॉक्टरांची समिती नियुक्त करण्यात आली. या तज्ञ समितीने दिलेल्या प्रथमदर्शनी अहवालामध्ये हलगर्जीपणा आढळून येत नसल्याचे स्पष्टपणे नमूद आहे. परंतु सन्माननीय न्यायालयाचा निकाल हा शिरसावंद्य मानून आम्ही केवळ आमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी माध्यमांसमोर आलो असल्याचे डॉक्टर प्रकाश पाटील, डॉक्टर जयश्री पाटील आणि पराग दादा बेडसे यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले.
कुणीही डॉक्टर आपल्या रुग्णाचे नुकसान व्हावे या उद्देशाने उपचार करत नाही. प्राप्त परिस्थितीत शस्त्रक्रियेमध्ये यश मिळण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य असून देखील केवळ अपघात ग्रस्त रुग्णाच्या पत्नीचे आणि डॉक्टर जयश्री पाटील यांच्या भावाच्या पत्नीचे नाते असल्याकारणाने, व त्यांनी परदेशात फोन जोडून एकमेकांशी चर्चा केल्यानंतर. शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटल प्रशासन तयार झाले. इस्पितळ नियोजनाच्या प्रशासकीय शिरस्त्यानुसार वेळोवेळी अनुमत्या घेण्यात आल्या होत्या. जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या नियमानुसार उपचारांच्यात यश येणे न येणे हे अवलंबून असते. आमच्या पेशंटला पाय गमवावा लागला याचे आम्हाला निश्चितच दुःख आहे. परंतु ज्या पद्धतीने माध्यमांच्यात या प्रकरणाचा ऊहापोह होताना दिसत आहे ते पाहता आम्हास असे वाटले की आम्ही माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट करावी.













Be First to Comment